आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धक्कादायक:भिकाऱ्यांच्या रॅकेटने दीड लाखात विकत घेतली दोन मुले, भीक मागण्यास नकार देताच लाकडी पट्टीने केली मारहाण

औरंगाबाद21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

खेळण्या-बागडण्याच्या वयात आई-वडिलांच्या कुशीत निर्धास्त असलेल्या दोन चिमुकल्यांना भिकाऱ्यांच्या रॅकेटने अवघ्या दीड लाख रुपयांत विकत घेतल्याची धक्कादायक घटना बुधवारी (१ सप्टेंबर) रात्री साडेनऊच्या सुमारास उघडकीस आली. एक पाच वर्षांच्या, तर दुसरा दोन वर्षांच्या मुलाच्या पालकांना पैशाचे आमिष दाखवत १०० रुपयांच्या बाँडवर हा व्यवहार करण्यात आला. ही मुले मी दत्तक घेतल्याचा दावा या प्रकरणातील महिला आरोपींनी केला. मात्र, मुकुंदवाडी पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. समाजसेवक देवराज नाथाजी वीर (४७, रा. मुकुंदवाडी) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली.

रामनगर येथील कांताबाई खंडागळे यांनी वीर यांना फाेन करून जनाबाई उत्तम जाधव ही तिच्या घरी असलेल्या लहान मुलास अमानुषपणे मारहाण करत आहे असे सांगितले. त्यानंतर वीर घटनास्थळी गेले असता जनाबाई आणि तिची मुलगी सविता संतोष पगारे या दोघी मिळून मुलास लाकडी पट्टी आणि हाताने मारहाण करत होत्या. हा प्रकार बघताच वीर यांनी पाच वर्षांच्या मुलास त्यांच्या ताब्यातून सोडवले. त्यानंतर ओळखीचे पोलिस कर्मचारी खान यांना या घटनेची माहिती दिली. पोलिस दोन महिलांसह त्या बालकाला मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात घेऊन गेले. घटनेचे गांभीर्य ओळखून बालकल्याण संरक्षण कक्षाच्या अधिकारी अॅड. सुप्रिया इंगळे, सामाजिक कार्यकर्ते दीपक बाजारे, कैलास पंडित यांना बोलावून घेतले. या मुलास विश्वासात घेऊन विचारपूस केली असता मला भीक मागण्यासाठी आणले असून भीक मागितली नाही तर मला मारहाण केली जाते असे त्याने सांगितले. यानंतर महिला आरोपी सविता पगारे हिची विचारपूस केली असता ५ वर्षीय मुलास बुलडाणा जिल्ह्यातून त्याच्या आई-वडिलांकडून मी ५५ हजार रुपयांत विकत घेतले, तर दुसऱ्या २ वर्षीय मुलास जालना जिल्ह्यातून १ लाख रुपयांमध्ये १०० रुपयांच्या बाँडवर दत्तक घेतले,असे तिने सांगितले.

दरम्यान, दोन्ही मुलांची रवानगी सध्या बालसुधारगृहात करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक मनोज पगारे यांनी दिली. या प्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक भराटे करत आहेत.

कापून नाल्यात टाकून देण्याची धमकी : पाच वर्षीय मुलाशी संवाद साधला असता त्याने मला जनाबाई ही भीक मागायला लावत होती. जर मी तिचे ऐकले नाही तर तुला कापून नाल्यात फेकून देऊ, तुझ्या आई-वडिलांनी विचारले तर कोरोनाने मेला असे सांगत लाथाबुक्क्यांनी मारहाण करत होती. रात्री मला बाथरूममध्ये झोपायला लावत होती, तासन््तास पाण्यात बसवून ठेवत असल्याने माझ्या पायाला जखमा झाल्याचेही त्याने सांगितले. सविता पगारे हिच्या लहान मुलांचे कपडेदेखील मला धुवायला लावत हाेती. कुटुंबीयांबाबत त्याला विचारले असता आजी-आजोबा अकोल्याला, तर आई-वडील देऊळगावात राहत असल्याचे त्याने सांगितले.

बातम्या आणखी आहेत...