आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:स्व. बाळासाहेब ठाकरे स्मारकाचे काम ‘जैसे थे’ ठेवण्याचे खंडपीठाचे आदेश, दैनिक दिव्य मराठीच्या पुढाकारातून सुरू झाली हाेती 'प्रियदर्शिनी उद्यान' बचाव मोहीम

औरंगाबाद11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ‘प्रियदर्शिनी उद्यान’ बचाव माेहीम

सिडकाेतील प्रियदर्शिनी उद्यानात मनपाच्या वतीने उभारण्यात येणारे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे काम तूर्त ‘जैसे थे’ ठेवण्याचे अादेश अाैरंगाबाद खंडपीठाचे न्या. सुनील देशमुख व न्या. आहुजा यांनी साेमवारी दिले. या उद्यानातील अनेक झाडे ताेडून स्मारक उभारण्याची मनपाची याेजना अाहे. दैनिक दिव्य मराठीने सातत्याने हा विषय लावून वृक्षताेडीला विराेध केला हाेता. त्यानंतर अनेक पर्यावरणप्रेमींनीही ‘प्रियदर्शिनी बचाव’ माेहीम सुरू केली हाेती. त्याची न्यायालयानेही दखल घेत कामाची पाहणी करून शुक्रवारपर्यंत अहवाल देण्याचे अादेश जनसहयोग संस्थेला दिले अाहेत. या अहवालानंतर खंडपीठ पुढील निर्णय देणार अाहे.

प्रियदर्शिनी उद्यान सिडकोने २०१६ मध्ये महापालिकेकडे हस्तांतरित केले. मनपाने तेथे ठाकरे स्मारक उभारण्याची याेजना तयार केली. मात्र शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या उद्यानातील झाडे ताेडण्यास पर्यावरणप्रेमींनी विराेध केला हाेता. दैनिक दिव्य मराठीने ‘डीबी स्टार’च्या माध्यमातून हा विषय सातत्याने लावून धरला. त्याअाधारे २०१९ मध्ये योगेश बाळसाखरे व सोमनाथ कराळे यांनी अॅड. सनी खिंवसरा यांच्यामार्फत वृक्षताेड राेखण्यासाठी जनहित याचिका दाखल केली हाेती. शहरातील ऑक्सिजनची गरज या उद्यानामुळे पूर्ण हाेत अाहे. इंटरनॅशनल सर्व्हे ऑफ एन्व्हाॅयर्नमेंट यांनी केलेल्या सर्वेक्षणात प्रियदर्शिनी उद्यान परिसरात शहराच्या इतर भागांच्या तुलनेत सर्वात कमी प्रदूषण असल्याचेही सिद्ध झाले आहे. त्यामुळे येथील झाडे ताेडू नयेत, अशी याचिकाकर्त्यांची मागणी अाहे. जनसहयाेग संस्थेतर्फे अॅड. शुभम अग्रवाल, मनपातर्फे अॅड. आनंद भंडारी, तर सिडकोतर्फे अॅड. अनिल बजाज यांनी बाजू मांडली.

१२१५ झाडे गेली कुठे?
२०१६ मध्ये प्रियदर्शनी उद्यानात ९८८५ झाडे असल्याची नाेंद हाेती. मनपाने १० ऑक्टोबर २०१९ राेजी खंडपीठात दिलेल्या शपथपत्रात ८६७० झाडे असल्याचे नमूद केले होते. त्यामुळे १२१५ झाडे गेली कुठे, असा प्रश्न निर्माण झाला. झाडांना पाणी मिळत नसल्याने झाडे वाळून आणि जळून जात असल्याची गंभीर बाब समोर आली आहे.

झाडे वाचवण्यासाठी लाेकांचे प्रयत्न : याचिका दाखल झाल्यानंतर खंडपीठाने जनसंयोग सेवाभावी बहुउद्देशीय सामाजिक संस्थेकडे उद्यानाची पाहणी करण्यासाठी नेमणूक केली हाेती. त्यांनी यापूर्वी दाखल केलेल्या शपथपत्रात पाण्याअभावी उद्यानातील झाडे वाळत असल्याचे, झाडांची चाेरी हाेत असल्याचे निरीक्षण नाेंदवले हाेते. उद्यानाला सुरक्षा भिंत नाही, सुरक्षा रक्षकही नाही. सिडकोतील पर्यावरणप्रेमींसाेबत ही संस्था झाडांना पाणीपुरवठा करीत असल्याचे नमूद केले होते.

स्मारकासाठी १० काेटींचा खर्च अपेक्षित : दहा काेटी रुपये खर्च करून मनपा या उद्यानात ठाकरे स्मारक उभारत अाहे. यात म्युझियम, फूड कोर्ट आणि एएमसी थिएटर उभारणीच्या कामाला प्रारंभही केला अाहे. बांधकाम करताना मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड केली जात असून इतरत्र त्याचे पुनर्रोपणही केले जात नसल्याचे याचिकाकर्त्यांनी न्यायालयाच्या लक्षात अाणून दिले.

उद्धव ठाकरे, शरद पवारांचे अाश्वासनही हवेतच
प्रियदर्शिनी उद्यान बचाव चळवळ सुरू झाल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही त्याची दखल घेतली हाेती. ‘या उद्यानातील एकही झाड ताेडणार नाही,’ असा जाहीर शब्द मुख्यमंत्र्यांनी पर्यावरणप्रेमींना दिला हाेता, तर ‘तुमचे दैवत बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी अशा प्रकारे उद्यान तोडून स्मारक बांधण्यास विरोध केला असता,’ अशा कानपिचक्या शरद पवारांना शिवसेना नेत्यांनी दिल्या हाेत्या. पालकमंत्री सुभाष देसाईंनीही एक स्वतंत्र बैठक घेऊन झाडे ताेडणार नसल्याची व व्यावसायिक कारणासाठी जागेचा वापर हाेणार नसल्याची ग्वाही दिली हाेती. मात्र प्रत्यक्ष काम सुरू झाल्यानंतर मनपाने यापैकी काेणाच्याही शब्दाचा मान राखलेला दिसत नाही.

अाॅक्सिजन झाेनवरच मनपाकडून कुऱ्हाड : प्रियदर्शिनी उद्यानाच्या देखभालीची जबाबदारी २०१६ पर्यंत जेएनईसी महाविद्यालयाकडे होती. त्यांचा करार संपल्यानंतर सिडकोने उद्यान महापालिकेकडे साेपवले. या जागेचा वापर व्यावसायिक कारणासाठी करण्यात येऊ नये, असे त्या वेळी करारात नमूद करण्यात अाले हाेते. हा भाग ऑक्सिजन झोन असून त्यात बदल करणार नसल्याची हमी मनपानेही लेखी दिली हाेती. परंतु आता स्मारकाचे काम करताना मनपा करार माेडीत काढत असल्याचा याचिकाकर्त्यांचा अाराेप अाहे.

बातम्या आणखी आहेत...