आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजैवविविधतेने नटलेल्या, शहराचा नैसर्गिक ऑक्सिजन प्लँट असलेला हिमायतबागेचा तीनशे एकरांचा परिसर वारसा स्थळ म्हणून जपायचा की महिला कृषी महाविद्यालयाच्या सिमेंटच्या इमारतींसाठी संपुष्टात आणायचा, हा अतिमोलाचा निर्णायक प्रश्न खं़डपीठातील एका याचिकेच्या सुनावणीनिमित्ताने शहरवासीयांसमोर उभा ठाकला आहे. या तीनशे एकर भूखंडाचे संवर्धन जैवविविधता वारसा स्थळात व्हावे यासाठी वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाच्या रजिस्ट्रारने स्थानिक जैवविविधता समितीकडे पाठवला होता.
मात्र, अचानक यू टर्न घेत या प्रस्तावात नजरचुकीने ३०० एकरांचा उल्लेख झाल्याचा व प्रत्यक्ष संवर्धन केवळ ४० एकर जमीन पुरेशी असल्याची मखलाशी विद्यापीठाने केली आहे. विद्यापीठाच्या या भूमिकेवर खंडपीठाने आश्चर्य व्यक्त करीत, विद्यापीठाची शेकडो एकर पर्यायी जमीन उपलब्ध असताना, येथील शेकडो वर्षांच्या वृक्षांची तोड करण्याचा आग्रह का धरला जात आहे, असा प्रश्न विचारत तूर्तास, शासनाने या ठिकाणी महिला कृषी महाविद्यालयासंबंधी कोणतीच घोषणा करू नये, असे निर्देश न्या. रवींद्र घुगे आणि न्या. संजय देशमुख यांच्या खंडपीठाने दिले.
हिमायतबागेतील खोदकाम आणि वृक्ष कटाई थांबवावी यासाठी अॅड. संदेश हांगे यांनी पार्टी इन पर्सन याचिका दाखल केली आहे. संबंधित याचिकेवर शुक्रवारी सुनावणी सुरू झाली. मध्यंतरी महापालिकेच्या वतीने हिमायतबागेतील विहिरीचे काम थांबवण्यात आले होते. हिमायतबागेत अनेक वर्षे जुनी वृक्षसंपदा आहे. दुर्मिळ जातींच्या वनस्पती असून त्यांचे संवर्धन व्हावे, अशी विनंती याचिकेत करण्यात आली होती. शहरात हिमायतबाग आणि सलीम अली परिसर एकच जैवविविधतेचा भाग असून यास वारसा स्थळ म्हणून घोषित करण्याची विनंती करण्यात आली होती.
तीनशे एकरचा प्रस्ताव पाठवला संबंधित परिसर वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ परभणीअंतर्गत येतो. कृषी विद्यापीठाच्या वतीने सलीम अली सरोवर आणि हिमायतबागेचा समावेश जैवविविधता वारसास्थळात करण्यात यावा यासाठी स्थानिक समितीकडे प्रस्ताव पाठवला होता. समितीने संबंधित प्रस्ताव मान्य करून अंतिम मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठवला होता. संबंधित प्रस्ताव मान्यतेसाठी प्रलंबित असताना कृषी विद्यापीठाने अचानक यू टर्न घेतला. या प्रस्तावात आपल्याकडून नजरचुकीने ३०० एकरचा उल्लेख करण्यात आला असून संवर्धनासाठी केवळ ४० एकर पुरेसे असल्याचा दृष्टांत कृषी विद्यापीठाला झाला आहे. उर्वरित क्षेत्र विद्यापीठाला महिला कृषी विद्यापीठ उभारण्यासाठी वापरायचे असल्याने त्यांनी हा यू टर्न घेतला आहे.
पुरातत्त्व विभागाचा महसूल विभाग, कृषी विद्यापीठाशी पत्रव्यवहार अॅड. संदेश हांगे यांनी सलीम अली सरोवर आणि हिमायतबाग हे एकाच जैवविविधता संस्थेचे घटक असल्याने त्यांचे एकत्रित संवर्धन गरजेचे असल्याने या तीनशे एकर जागेला जैवविविधता वारसा स्थळ म्हणून मान्यता द्यावी या मागणीसाठी ही याचिका केली आहे. राज्य पुरातन विभागाने त्यासाठी महसूल विभाग व कृषी विद्यापीठाशी अनेकदा पत्रव्यवहार करून त्यास प्रतिसाद मिळालेला नाही. त्यांची चार स्मरणपत्रे याचिकाकर्ते अॅड. हांगे यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिली. पैठण रस्त्यावर महाविद्यालय उभारता येण्याच्या पर्यायाकडे त्यांनी लक्ष वेधले.
अतिक्रमण काढण्याची कारवाई हिमायतबागेच्या २५ एकर जागेवर वक्फ बोर्डाचा फलक आहे.ही कृषी विद्यापीठाची जागा असल्याचे अॅड. सत्यजित बोरा यांनी निदर्शनास आणून दिले. महापालिकेचे ज्येष्ठ विधिज्ञ राजेंद्र देशमुख यांना संबंधित प्रकरणात माहिती घेऊन अतिक्रमण काढण्याबाबत योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश खंडपीठाने दिले. शैक्षणिक संकुल उभारताना झाडांचे काय करणार, अशी विचारणा खंडपीठाने केली असता संबंधित झाडे स्थलांतरित केली जातील, असे सांगण्यात आले. तेव्हा मोकळ्या जागा वापरून शैक्षणिक संकुल उभारणे शक्य होणार नाही का, अशी विचारणाही केली. परभणी कृषी विद्यापीठाच्या मालकीची किती जागा शहरात आहे, अशी विचारणा विद्यापीठाचे विधिज्ञ अॅड. सत्यजित बोरा यांच्याकडे केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.