आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बदनापूरच्या कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालयाच्या कारवाईवर खंडपीठाचे शिक्कामोर्तब:तपासणीत मोठ्या प्रमाणावर त्रुटी

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बदनापूर येथील निर्मल क्रीडा व समाज प्रबोधन ट्रस्ट संचलित दत्ताभाऊ पाथ्रीकर संस्थाचालक असलेल्या महाविद्यालयात त्रुटी असल्याबाबत त्यांना नोटीस बजावण्यात आली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने डॉ. वाल्मिक सरोदे अध्यक्ष असलेल्या समितीने महाविद्यालयाची तपासणी केली. तपासणीत मोठ्या प्रमाणावर त्रुटी आढळून आल्या. याविरोधात महाविद्यालय प्रशासनाच्या वतीने औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करून कारवाईस विरोध करण्यात आला.

खंडपीठाचे न्या. रवींद्र घुगे व न्या. अरूण पेडणेकर यांनी विद्यापीठाने केलेली कारवाई योग्य असल्याचे स्पष्ट केले. महाविद्यालयाने दाखल केलेली याचिका खंडपीठाने फेटाळत विद्यापीठाच्या कारवाईवर शिक्कामोर्तब केले.

अहवालात नमूद

बदनापूर येथील महाविद्यालयाच्या चौकशीसाठी सहा सदस्यीय समिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने नियुक्त केली होती. समितीने महाविद्यालयात अनेक त्रुटी असल्याचा अहवाल सादर केला होता. अध्यापक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी अद्यावत नव्हते. इमारत, प्रयोगशाळा, वर्गखोल्या, ग्रंथालय, क्रीडा साहित्य आदी सुविधा नसल्याचे अहवालात नमूद केले.

संख्या पन्नास टक्यांनी कमी

प्राध्यापकांची नियुक्ती स्थानिक समितीद्वारे करण्यात आली होती. विद्यापीठ कायदा आणि शासनाच्या अधिसूचनेनुसार विद्यापीठ नियुक्त समितीच्या माध्यमातून प्राध्यापकांची नियुक्ती करणे बंधनकारक आहे. अशा प्रकारे केलेली भरती प्रक्रिया वैध असून त्याआधारेच अनुदानास पात्र ठरविले जाते. कुलगुरूंनी संबंधित अहवालाच्या अनुषंगाने महाविद्यालयाकडून खुलासा मागविला. महाविद्यालयाकडून सूचनांचे पालन झाले नाही. विद्यापीठाने विद्यार्थ्यांची संख्या पन्नास टक्यांनी कमी केली.

दोन लाख रूपये दंड

पायाभूत सुविदा नसल्याने विनाअनुदानित अभ्यासक्रमाच्या काही तुकड्या बंद केल्या. नवीन शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांचे प्रवेश बंद केले. कुलगुरूंनी विद्यापीठ कायदा कलम 12, 14 (च) नुसार महाविद्यालयास दोन लाख रूपये दंड केला. पंधरा दिवसांत दंडाची रक्कम भरली नाही तर त्यावर सात टक्के व्याज वसुल करावे असेही आदेश देण्यात आले. याविरोधात महाविद्यालयाने अॅड. अमोल काकडे यांच्यावतीने खंडपीठात आव्हान दिले. त्रुटींची पूर्तता केल्याचे खंडपीठात सांगण्यात आले.

विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात

अध्यापक पुरेशा प्रमाणात असल्याचे सांगण्यात आले. विद्यापीठातर्फे अॅड. संभाजी टोपे यांनी स्थानिक समितीमार्फत प्राध्यापकांची भरती मान्य नसल्याचे खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले. चालू वर्षी प्रवेशास बंदी असताना विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्याचे निदर्शनास आणून दिले. जवळच जालना 18 कि.मी अंतरावर महाविद्यालय असून तेथे विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात असे सांगितले.

भरतीसाठी निवड समिती

प्रवेश एमकेसिएल वरून केले जातात परंतु संबंधित महाविद्यालयाचे एकही प्रवेश त्यावरून झाला नसल्याचे निदर्शनास आणून दिले. खंडपीठाने हस्तक्षेपास नकार देत कुलगुरूंचे आदेश वैध ठरविले. संबंधित महाविद्यालयाने प्राध्यापक भरतीसाठी निवड समितीची विद्यापीठाकडे मागणी केल्यास अशा प्रकारे समिती देण्यात यावी अशेही खंडपीठाने निर्देश दिले. शासनाच्या वतीने अॅड. शिरीष सांगळे यांनी काम पाहिले.

बातम्या आणखी आहेत...