आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोलीच्या तरुणाचा गूढ मृत्यू:गृहसचिव, पोलिस महानिरीक्षक, पोलिस अधीक्षकांना खंडपीठाने बजावली नोटीस

औरंगाबाद18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली येथील २६ वर्षीय तरुणाच्या गूढ मृत्यू प्रकरणी दाखल फौजदारी याचिकेमध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती सारंग व्ही. कोतवाल आणि न्यायमूर्ती भारत पी. देशपांडे यांनी प्रतिवादी राज्याचे गृहसचिव, विशेष पोलिस महानिरीक्षक, नांदेड परिक्षेत्र, पोलिस अधीक्षक, हिंगोली यांना नोटीस देत याचिकेतील आरोपांविषयी जबाब दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. याप्रकरणी हिंगोली येथील मस्तान शाहनगरचे राहिवासी पठाण इस्माईलखान यांनी ॲड. सईद एस. शेख यांच्यामार्फत खंडपीठात फौजदारी याचिका दाखल केली आहे.

प्रकरण काय?

याचिकाकर्ते यांचा विवाहित मुलगा इरफान खान यास दिनांक ३० सेप्टेंबर २०२१ रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास त्याच भागात राहणारे भरत शंकर यादव, रोहित राजू यादव, सोमनाथ उर्फ अक्षय अशोक चंदनशिव आणि विठ्ठल विष्णू चंदनशिव हे पार्टी करण्यासाठी घेवून गेले. मात्र, इरफान घरी परतला नाही. त्यामुळे एक ऑक्टोबर २०२१ रोजी याचिकार्त्यांनी पोलिसांत हरवल्याची तक्रार दाखल केली.

थेट मृतदेह सापडला

हिंगोलीपासून २० किलोमीटर लांब सोडेगाव / सालेगाव भागात कायाधू नदीमध्ये २ अक्टूबर २०२१ रोजी इरफानचा जळालेला मृतदेह सापडला. मृतदेहावर जखमा होत्या. तेव्हांपासून याचिकाेर्ता हे पोलिसांना तोंडी आणि लेखी तक्रार करून संबंधित व त्यांच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची विनंती करीत आहेत. मात्र, राजकीय दबावापोटी आरोपींना वाचविण्याकरिता पोलिस गुन्हे दाखल न करता प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करीत असल्याचे याचिकेत म्हटले आहे.

अखेर नोटीस

सदरील प्रकरणावर सुनावणीनंतर खंडपीठाने प्रतिवादींना नोटीस बजावत सहाय्यक सरकारी वकिलांना याचिकेतील आरोपांविषयी खुलासा करण्यासाठी जबाब दाखल करण्याचे आदेश दिले. प्रकरणाची पुढील सुनावणी ११ जुलाई २०२२ रोजी ठेवली आहे. याप्रकरणी याचिकाकर्ताच्या वतीने अ‌ॅड. सईद एस. शेख यांनी काम पाहिले. तर शासनाच्यावतीने सहाय्यक सरकारी वकील एस. डी. घायाळ यांनी बाजू मांडली.

बातम्या आणखी आहेत...