आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरात येणाऱ्या पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या अनेक वास्तू आहेत. मात्र त्यांची माहिती सहज मिळत नाही. शिवाय स्थानिक नागरिकांनाही बरेचदा त्याची माहिती नसते. मात्र आता ही सगळी माहिती एका मोबाइल क्लिकवर मिळणार आहे. शहरात जी-२० परिषदेच्या पार्श्वभूमीवर स्मार्ट सिटीमार्फत शहरातील ऐतिहासिक स्थळांची माहिती क्यूआर कोडवर उपलब्ध करून दिली जाणार आहे. भडकल गेट, दिल्ली गेट, मकाई गेट, पाणचक्की, सोनेरी महाल यासह विविध ऐतिहासिक स्थळांचे क्यूआर कोड तयार करण्यात आले आहेत.
शहरात फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जी-२० परिषदेंतर्गत महिला परिषद भरवली जाणार आहे. महापालिका आणि स्मार्ट सिटीमार्फत या परिषदेची तयारी केली जात आहे. या परिषदेसाठी विविध ४० देशांतील महिला प्रतिनिधी, पर्यटक मोठ्या संख्येने येणार आहेत. तसेच इतर वेळीही शहरात येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी असल्यामुळे या पर्यटकांना ऐतिहासिक स्थळांची माहिती घेण्यासाठी गाइडला सोबत घ्यावे लागते. पर्यटकांची होणारी गैरसोय टाळण्याच्या दृष्टीने मनपाचे प्रशासक तथा आयुक्त आणि स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी स्मार्ट सिटीच्या माध्यमातून शहरातील ऐतिहासिक स्थळांची माहिती क्यूआर कोडवर उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले.
त्यानुसार स्मार्ट सिटीने क्यूआर कोडवर ऐतिहासिक स्थळांची इंग्रजीसह मराठी आणि हिंदी भाषेत माहिती उपलब्ध करून देण्याची तयारी सुरू केली आहे. स्मार्ट सिटीचे उपायुक्त सौरभ जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्प व्यवस्थापक अली हे त्यावर काम करत आहेत. केंद्र आणि राज्य पुरातत्त्व विभागाकडून वारसा स्थळांची माहिती प्रमाणित करून ती महापालिकेच्या संकेतस्थळावर टाकण्यात येत आहे. क्यूआर कोडवर ही माहिती उपलब्ध करून देताना पुरातत्त्व विभागाचा हवाला दिला जात आहे.
छोट्या वास्तूंचाही केला या योजनेत समावेश
स्मार्ट सिटीमार्फत क्यूआर कोडवर वारसा स्थळांची माहिती उपलब्ध करून दिली जाणार आहे. सध्या भडकल गेट, दिल्ली गेट, मकाई गेट, पाणचक्की, सोनेरी महाल या पाच वारसास्थळांची माहिती क्यूआर कोडवर टाकण्यात आली आहे. उर्वरित ऐतिहासिक स्थळांची माहितीही क्यूआर कोडवर टाकण्याचे काम सुरू असून १५ फेब्रुवारीपर्यंत क्यूआर कोड तयार करून त्या वारसास्थळाच्या ठिकाणी लावण्यात येईल. मोबाइलमध्ये क्यूआर कोड ओपन करताच त्या वारसास्थळाची माहिती मिळणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.