आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी परीक्षेचा सावळागोंधळ थांबता थांबत नाहीये. शेंद्रा गावच्या दळवी कॉलेजमधील परीक्षा केंद्राच्या गैरप्रकाराची माहिती देण्यासाठी ‘दिव्य मराठी’ प्रतिनिधीने विद्यापीठाच्या भरारी पथक प्रमुखांना फोन केला तर त्यांना कॉलेजचे प्राचार्य सोडत नसल्याची गंभीर बाब पुढे आली आहे. या पथकांच्या अभावामुळे सर्वत्र कॉप्यांचा सुळसुळाट सुरू आहे. भरारी पथकात प्राध्यापकांना काम न करू देणाऱ्या प्राचार्यांना नोटीस बजावणार असल्याचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी स्पष्ट केले. शेंद्रा येथील वाल्मीकराव दळवी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना पेपर संपल्यानंतर पुन्हा सायंकाळी ४ वाजता उत्तरपत्रिका लिहिण्यासाठी दिली जाते. या गैरप्रकाराची एका विद्यार्थिनीने चिकलठाणा पोलिसांकडे लेखी तक्रारही केली आहे. ‘दिव्य मराठी’ प्रतिनिधी याच केंद्रावर सकाळी ११ ते दुपारी ३.३५ पर्यंत ठाण मांडून होते. हा गैरप्रकार भरारी पथकाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी पथकप्रमुख तथा वसंतराव नाईक कॉलेजचे प्रा. डॉ. जगदीश भराड यांना प्रतिनिधीने फोन केला. तर ते म्हणाले, ‘मला विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने रविवारी सायंकाळी ५.०६ वाजता भरारी पथकात नेमणूक केल्याची सांगितले.
मेलद्वारे मला व माझ्या टीमच्या सदस्यांना कळवले. पण त्यानंतर कॉलेजच्या प्राचार्यांनी भरारी पथकात काम करण्यास मनाई केली. ‘नॅक’साठी माझ्यावर महत्त्वाची जबाबदारी आहे. त्यामुळे इच्छा असतानाही आपण कॉलेज सोडू शकत नाही,’ असे डॉ. भराड यांनी म्हटले आहे. त्यामुळे सोमवारी शेंद्रा, बाळापूर, सातारा तांडा, करमाड, आडूळ आणि पाचोड येथील केंद्रावर कॉप्यांचा प्रचंड सुळसुळाट होता. शेंद्रा येथील दळवी कॉलेजच्या उत्तरपत्रिका तातडीने का उचलल्या जात नाहीत, असा प्रश्न कुलगुरूंना विचारला तर ते म्हणाले, ‘तातडीने उचलण्याचे सांगितले आहे. पण विद्यापीठाकडे वाहनांची संख्या खूप कमी आहे. प्राचार्यांनी काही तरी नैतिकता ठेवावी,’ अशी अपेक्षाही कुलगुरूंनी व्यक्त केली.
परीक्षा विभागाने आम्हाला ऐनवेळी पत्र दिले कुलगुरू डॉ. येवले यांनी ‘दिव्य मराठी’च्या पाठपुराव्यामुळे भरारी पथकांची संख्या वाढवण्याचे निर्देश परीक्षा व मूल्यमापन मंडळाला दिले होते. त्यानुसार परीक्षा संचालक डॉ. भारती गवळी यांनी रविवारी काही नवे पथके दिली. नाईक कॉलेजच्या प्राध्यापकांना भरारी पथकात नियुक्त केल्याचा मेल सायंकाळी ५.०६ वाजता पाठवला. त्यात लोकसेवा कॉलेजचे डॉ. प्रकाश वाणी, डॉ. संतोष काकडे, कोहिनूर कॉलेजचे डॉ. प्रकाश लहाने यांचा समावेश आहे. नाईक कॉलेजचे प्राचार्य डॉ. आनंद चौधरी यांनी डॉ. भराड यांना ‘नॅक’मुळे जाऊ नका, असे म्हटले. तसे विद्यापीठाला पत्र पाठवूनही डाॅ. चौधरी यांनी कळवले आहे.
हलगर्जीपणा अजिबात सहन केला जाणार नाही परीक्षेचे कामकाज अतिशय गरजेचे असते. सर्वांनीच त्यात सहभाग घेणे आवश्यक आहे. पण प्राचार्य जर प्राध्यापकांना या कामापासून रोखण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यांच्यावरही आम्ही कारवाई करू. प्रारंभी त्यांना कारणे दाखवा नोटीस देऊ. हलगर्जीपणा अजिबात सहन केला जाणार नाही. - डॉ. प्रमोद येवले, कुलगुरू
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.