आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​​​​​​​जयंती उत्सव:शहरातील 115 वाॅर्डांमध्ये ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका’ उघडणार

छत्रपती संभाजीनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त १४ एप्रिल रोजी शहरासह जिल्हाभरात मोठ्या जल्लोषात मिरवणुका काढण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त कार्यालयाच्या वतीने साेमवारी तापडिया नाट्यमंदिरात शांतता समितीची बैठक घेण्यात आली. या वेळी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी डॉ. आंबेडकरांची जयंती वाचन करून साजरी होणे गरजेचे आहे, त्यासाठी शहरातील प्रत्येक वाॅर्डात एक अभ्यासिका असावी, असे मत व्यक्त केले. त्यावर पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी सर्वच ११५ वाॅर्डांत ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका’ सुरू केल्या जातील, असे आश्वासन दिले. जयंती उत्साहात व शांततेत साजरी करावी, असे आवाहन या वेळी करण्यात आले.

काेठे डोळेझाक करायची आणि काेठे ठोकायचे हे पोलिसांनी ओळखून घ्यावे : जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय म्हणाले, आम्ही कायदा-सुव्यवस्था सुरळीत ठेवण्याचे काम ‘घटनेनुसार’ करताे. त्यात नागरिकांची मदत व सकारात्मक प्रतिसाद अपेक्षित असतो. पोलिसांनीसुद्धा काेठे ठोकायचे आणि काेठे डोळेझाक करायची हे समजून घेतले पाहिजे. म्हणूनच पोलिसांना सद‌्रक्षणाय खलनिग्रहणाय म्हटले जाते.

सोशल मीडियावर बारकाईने लक्ष : पोलिस आयुक्त पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी मागील वर्षीप्रमाणे यंदाही मुस्लिम बांधवांच्या अजानच्या वेळी डीजे व इतर वाद्यांचे आवाज बंद होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली. शहरात झालेल्या दंगलीचा प्रचंड दबाव आहे. त्यामुळे पोलिस प्रशासन सोशल मीडियावर बारकाईने लक्ष ठेवून आहे. एखाद्याने आक्षेपार्ह पोस्ट केली तर त्या व्यक्तीसोबतच ग्रुपच्या अॅडमिनवरसुद्धा गुन्हा दाखल केला जाईल. या वेळी आमदार संजय शिरसाट, प्रदीप जैस्वाल यांच्यासह उत्सव समितीचे अध्यक्ष राजू शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. पोलिस प्रशासनाला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.

बैठकीस उपस्थित मान्यवरांच्या सूचना {मागील वर्षी जयंती मिरवणुकीची परवानगी असणाऱ्यांनाच यंदा परवानगी मिळेल. त्या-त्या पोलिस ठाण्यांकडून नव्याने परवानगी घेण्यासाठी येणाऱ्यांना परत पाठवले जात आहे. सरसकट सर्वांना मिरवणुकीची परवानगी द्यावी. {महिला, वृद्धांसाठी मोबाइल स्वच्छतागृहाची व्यवस्था करावी. {ज्या मार्गांवर अंधार आहे, तेथे विजेची व्यवस्था करावी. {पिण्याचे थंड पाणी उपलब्ध करावे. {महापुरुषांच्या पुतळ्याभोवती स्वच्छता व विद्युत रोषणाई करावी. {दोन तास वेळ वाढवून द्यावा. शहरासह ग्रामीण भागात डीजेला परवानगी द्यावी. {शहरातील बंद सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी व दुरुस्ती करावी. {अवैध दारू अड्डे बंद करावेत.

खा. इम्तियाज जलील, आमदार अंबादास दानवे गैरहजर खासदार इम्तियाज जलील, माजी खासदार चंद्रकांत खैरे, आमदार तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार सतीश चव्हाण बैठकीस गैरहजर होते. दानवे मुंबईत असल्याने येऊ शकले नाहीत, असे सांगण्यात आले. हे मान्यवर अनुपस्थित असल्याने ‘विरोधकांशिवाय बैठक’ अशी कुजबुज सुरू होती. आयोजकांनी सर्वांना निमंत्रण पाठवले होते, पण कामाच्या व्यग्रतेमुळे उपस्थित राहता आले नसावे, असे पोलिस प्रशासनाकडून सांगण्यात आले.