आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीएचआर पतसंस्था घाेटाळ्यात आरोपी:सहकार खात्यात लिपिक ते ‘सहकारमहर्षी’ अशी झेप घेणारे अंबादास मानकापे कोठडीत; पुण्याच्या आर्थिक गुन्हे शाखा पथकाने केली अटक

औरंगाबाद2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शहरातील आदर्श उद्योगसमूहाचे सर्वेसर्वा, आज एका बँकेसह चाैदा सहकारी संस्था ताब्यात

जळगाव येथील भाईचंद हिराचंद रायसाेनी (बीएचआर) पतसंस्थेतील बहुचर्चित घाेटाळ्यात औरंगाबादच्या आदर्श उद्याेगसमूहाचे सर्वेसर्वा व सहकार क्षेत्रातील बडे प्रस्थ अंबादास मानकापे पाटील यांना गुरुवारी पुण्यातील आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. पुण्याच्या न्यायालयाने त्यांची पाच दिवस काेठडीत रवानगीही केली आहे. मानकापे पाटील यांचा प्रवास अचंबित करणारा आहे. सहकार विभागात कनिष्ठ लिपिक म्हणून नोकरीस लागलेल्या मानकापे पाटलांनी सेवानिवृत्तीनंतर तब्बल चौदा सहकारी, खासगी संस्था स्थापन केल्या. गेल्या २२ वर्षांत ते औरंगाबाद जिल्ह्यातील बडे प्रस्थ म्हणून उदयास आले. मात्र आता त्यांच्या अटकेमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे.

१३ मार्च १९६३ रोजी मानकापे पाटील सहकार विभागात कनिष्ठ लिपिक म्हणून विभागीय सहनिबंधक (सहकार) कार्यालयात रुजू झाले हाेते. पुढे पदोन्नतीने ते वरिष्ठ लिपिक, प्रमुख लिपिक, विशेष वसुली अधिकारी (श्रेणी १) झाले. सुमारे ३६ वर्षे शासकीय सेवा केल्यानंतर ३० सप्टेंबर १९९९ रोजी विशेष वसुली अधिकारी (श्रेणी १) या पदावरून ते सेवानिवृत्त झाले. निवृत्तीनंतर त्यांनी सहकार खात्यात संस्थांच्या माध्यमातून नव्याने प्रवेश केला. ‘आदर्श’ नावाने सहकारी बँक, पतसंस्था, दूध डेअरी, रुग्णालये, महिला बँक, कॉटन जिनिंगच्या माध्यमातून त्यांनी अल्पावधीत ‘सहकाररत्न’ म्हणून ख्याती मिळवली. बचत गटांच्या माध्यमातून त्यांनी राज्यभरात जवळपास एक लाख महिला सदस्यांचे जाळे तयार केले.

शिवाय काही वर्षांपूर्वी एक वर्तमानपत्र सुरू करून त्यांनी त्याचे संपादकपदही मिळवले हाेते. या अनेक सहकारी संस्था, कर्मचारी, ठेवीदार, कर्जदार असे शहरात जवळपास १० हजार लोक त्यांनी जोडले. मोठे नेटवर्क तयार झाल्याने राजकीय वर्तुळातही त्यांची ऊठबस हाेती. नुकत्याच झालेल्या औरंगाबाद जिल्हा बँकेच्या निवडणुकीतही त्यांनी प्रस्थापितांना आव्हान देण्याचा प्रयत्न केला हाेता. मात्र आता घाेटाळ्यात नाव आल्याने त्यांच्यावर काेठडीत जाण्याची वेळ आली.

ठेवीदारांना फसवून ७ काेटी कर्ज फेडल्याचा आराेप
बीएचआर पतसंस्था अवसायनात निघाली हाेती. त्यामुळे अनेक ठेवीदारांना पैसे बुडण्याची भीती हाेती. त्याचा फायदा घेऊन काही बड्या लाेकांनी घाबरलेल्या ठेवीदारांशी एजंटांमार्फत संपर्क साधला. तुमचे अडकलेले पैसे काढून देताे, त्यापैकी २५ ते ३० टक्के रक्कमच तुम्हाला मिळेल. मात्र सर्व पैसे मिळाले असे लिहून द्यावे लागेल, असे सांगून काही संशयितांनी या पद्धतीने ठेवीदारांकडून एफडीच्या पावत्यांवर सह्याही घेतल्या हाेत्या. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अंबादास मानकापे यांनी बीएचआर पतसंस्थेकडून १० काेटी कर्ज घेतले हाेते. त्यापैकी सात काेटी रुपयांचे कर्ज त्यांनी अशा प्रकारे ठेवींच्या पावत्या मिळवून फेडल्याचा संशय आहे. यात त्यांना पतसंस्थेशी संबंधित बड्या लाेकांची मदत झाली. त्यामुळे फसवणुकीचा गुन्हा दाखल करून मानकापेंना अटक करण्यात आली. आता त्यांची सखाेल चाैकशी हाेईल.

पुण्याचे पथक पहाटेच घरी धडकले
पुणे पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखेतील दोन पथके गुरुवारी पहाटेच साडेपाच वाजता शहरात धडकली. एक पथक क्रांती चौक परिसरात दुसऱ्या आरोपीच्या शोधात लागले, तर दुसरे पथक सहा वाजेपर्यंत सिडको पोलिस ठाण्यात गेले. निरीक्षक अशोक गिरी यांच्याशी संपर्क करून त्यांना सर्व प्रकाराची माहिती देण्यात आली. पथकाने रीतसर तशी ठाण्यात नोंद केली. त्यानंतर गिरी यांच्या आदेशावरून सिडको पोलिसांचे एक पथक पुण्याच्या पथकासोबत मानकापे यांच्या सिडकाे एन-५ येथील निवासस्थानी दाखल झाले. पोलिसांनी त्यांना कल्पना देऊन ताब्यात घेतले व सिडको ठाण्यात नेत त्यांना अटक केल्याची नोंद केली. लगेच नऊ वाजता पथक पुण्याकडे गेले. दुसरीकडे हॉटेलमध्ये लपून बसलेल्या पाटील नामक संशयिताला दुसऱ्या पथकाने अटक केली. मानकापे यांना अटक करताच काही मिनिटांमध्ये त्यांचे वकील पुण्याकडे रवाना झाले होते.