आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शिवसेनेत उभी फूट:भुमरे, सत्तार, अंबादास दानवेंची भाजपशी हातमिळवणी ‘माताेश्री’ला अमान्यच; नवख्यांना अस्मान दिसेल : खैरे

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • जिल्हा बँक निवडणुकीत चंद्रकांत खैरेंचे काँग्रेसच्या पॅनलला समर्थन, स्वपक्षीय नेत्यांनाच आव्हान

‘औरंगाबाद जिल्हा बँकेची निवडणूक महाविकास आघाडीतील तिन्ही घटक पक्षांनी एकत्रित लढवावी, असे आपले मत हाेते. मात्र शिवसेनेचे मंत्री संदिपान भुमरे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार व अंबादास दानवे यांनी पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची परवानगीही न घेता भाजपच्या पॅनलकडून उमेदवारी दाखल केली. मी पक्षाचा मराठवाड्याचा नेता असताना आपणासही त्यांनी विचारात घेतले नाही,’ असा आराेप शिवसेनेचे नेते तथा माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी गुरुवारी एका पत्रकार परिषदेत स्वपक्षीय नेत्यांवर केला. ‘शिवसेनेतील नवख्यांना अजून ‘मातोश्री’ काय आहे हे माहीतच नाही,’ असा इशाराही त्यांनी नामोल्लेख टाळत दिला.

औरंगाबाद जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक २१ मार्च रोजी आहे. या निवडणुकीत भाजपचे नेते आमदार हरिभाऊ बागडे, माजी आमदार नितीन पाटील यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास पॅनल व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डाॅ. कल्याण काळे यांच्या नेतृत्वात शेतकरी सहकार विकास पॅनल समाेरासमाेर आले. गेल्या वेळी ही बँक भाजपच्या ताब्यात हाेती. त्यामुळे त्यांच्या हातातून सत्ता काढून घेण्यासाठी या वेळी महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस या तिन्ही पक्षांनी एकत्रित निवडणूक लढवावी असा सुरुवातीपासून मतप्रवाह हाेता. मात्र एेनवेळी शिवसेनेेचे दिग्गज नेते मंत्री संदिपान भुमरे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, आमदार अंबादास दानवे, राष्ट्रवादीचे आमदार सतीश चव्हाण यांना आपल्या पॅनलकडे वळवण्यात भाजपला यश आले. त्यामुळे काँग्रेसचा गट मात्र नाराज झाला. या पार्श्वभूमीवर आता या नाराज गटाने शिवसेनेेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांचे समर्थन मिळवले आहे.

खैरेंनी गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेला अंबादास मानकापे, माजी आमदार सुभाष झांबड, जगन्नाथ काळे, किरण पा. डोणगावकर, नंदू घोडेले उपस्थित होते. काेराेनाबाधित असल्याने डॉ. कल्याण काळे यांनी आॅनलाइन हजेरी लावली.

खैरे म्हणाले, ‘बागडेंना अजून किती काळ पदे उपभाेगायची आहेत. भाजपच्या धोरणानुसार ७५ वर्षांपेक्षा जास्त वय झाल्याने त्यांनी आता निवृत्त व्हावे. मात्र, नितीन पाटील यांच्या माध्यमातून ते कामे काढून घेत आहेत. मात्र या निवडणुकीत ‘चमत्कार’ हाेणार आहे. आमदार अंबादास दानवे हे पक्षात माझ्यापेक्षा सीनियर नाहीत. मला ‘मातोश्री’ आणि शिवसेना चांगली ठाऊक आहे. नवख्यांना ती माहिती नाही. त्यांना कधी अस्मान दिसेल हे समजणारही नाही,’ असा टोलाही त्यांनी सत्तार यांचे नाव न घेता लगावला.

विराेधी पॅनलचे प्रमुख घाेटाळ्यात बुडालेले : काळे
डाॅ. कल्याण काळे म्हणाले, ‘बँक वाचवण्यासाठी प्रस्थापितांच्या विरोधात आमचे पॅनल उभे आहे. बागडे जिल्हा दूध संघाचे चेअरमन असताना त्यांनी जिल्हा बँकेतील ठेवी काढून जनता सहकारी बँकेत ठेवल्या हाेत्या. आघाडी सरकारमुळे जिल्हा बँकेला साडेआठ कोटी नफा मिळाला आहे. मात्र विराेधी पॅनलचे चेअरमनपदाचे उमेदवार घोटाळ्यात बुडालेले आहेत,’ असा आरोप त्यांनी केला. अंबादास मानकापे यांनी बँक नफ्यात असल्याचे केवळ ढाेल बडवले जात असल्याचा आराेप केला.’ तर माजी आ. झांबड यांनी आमच्या पॅनलमध्ये नेते नसून दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांना संधी दिल्याचे सांगितले.

बातम्या आणखी आहेत...