आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्राचे उद्योग क्षेत्र गतिमान:परप्रांतीय कामगार गावी परतल्यामुळे 8 लाखांवर रिक्त जागांवर भूमिपुत्रांना कामाच्या संधी उपलब्ध

औरंगाबाद2 वर्षांपूर्वीलेखक: महेश जोशी
  • कॉपी लिंक
  • गेलेले कामगार परततील की नाही याबाबत शंकाच

कोरोना आणि लॉकडाऊनमध्ये तब्बल महिनाभर बंद पडलेल्या उद्योग क्षेत्राने जोरदार भरारी घेतली आहे. दीड महिन्यात राज्यात सुमारे ५५ हजार उद्योग सुरू झाले आहेत. या ठिकाणी १३ लाख कामगारांनी काम सुरू केले आहे, तर परप्रांतीय कामगार गावी परतल्याने ८ लाखांच्या वर जागा रिक्त झाल्या आहेत. या ठिकाणी भूमिपुत्रांना रोजगाराची मोठी संधी आहे. उद्योगाला कुशल कामगार पुरवण्यासाठी सरकारनेही प्रयत्न सुरू केले आहेत. उद्योजक, तज्ञ आणि कामगार नेत्यांनी परिस्थिती सामान्य होण्यासाठी अजून ५-६ महिने लागण्याचा अंदाज वर्तवला आहे.

महाराष्ट्र हे देशातील ऑटोमोबाइल हब म्हणून नावारूपाला आले आहे. विशेषत: पुणे परिसर, औरंगाबाद आणि नाशिक येथे ऑटोमोेबाइल आणि ऑटो कम्पोनंट उद्योगांचा मोठा विस्तार झाला आहे. राज्यात या क्षेत्रातील १५ हजारांहून अधिक उद्योग असून त्यात १० ते ११ लाख लोक काम करतात. लॉकडाऊनमुळे अत्यावश्यक सेवा क्षेत्राशी संबंधित उद्योग वगळता अन्य बंद होते. सरकारने २० एप्रिलपासून रेड झोन वगळता अन्य भागात उद्योग सुरू करण्यासाठी सशर्त परवानगी दिली. मात्र, परप्रांतीय कामगार गावी परतल्याने कामगारांची कमी जाणवू लागली.

सरकार उद्योग क्षेत्र गतिमान झाल्याचे दावे करत असले तरी प्रत्यक्षात एकूण उद्योगाच्या केवळ ७.४८ % उद्योग सुरू झाले आहेत. ३ जून रोजी येथे काम करण्यासाठी २० लाख ६५५ कर्मचाऱ्यांची आवश्यकता असताना प्रत्यक्षात १३ लाख ३८९ कर्मचारी कामावर आले. म्हणजेच ८,१९,२६६ कर्मचाऱ्यांची कमतरता भासली. या वेल्डर, फिटर, फॅब्रिकेटर, सीएनसी मशीन ऑपरेटर, डेटा एंट्री ऑपरेटर, पेंटशॉप ऑपरेटर, सुपरवायझर अशा कुशल-अकुशल श्रेणीतील कामगारांना संधी आहे.

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे राज्याचे उपाध्यक्ष आणि ऋचा इंजिनिअरिंगचे व्यवस्थापकीय संचालक उमेश दाशरथी म्हणाले, गावी परतलेले कामगार कदाचित २-३ महिन्यांत परततील. तरी या परिस्थितीकडे तरुणांनी संधी म्हणून बघावे. बाजार अजून ३०-३५ टक्केच सामान्य झाला आहे. नेमक्या परिस्थितीचा अंदाज येण्यासाठी ६-८ महिने जाऊ द्यावे लागतील.

कामगारांना ५० लाखांचा विमा द्यावा

सरकारचा अचानक लॉकडाऊनचा निर्णय चुकीचा होता. हातावर पोट असणाऱ्यांना यातून सावरण्यासाठी वेळच मिळाला नाही. इतर शहरात कामासाठी अडकून पडलेल्या कामगारांना घरी परतता आले नाही. अर्थव्यवस्था डबघाईला आल्याने शासनाने घाईगडबडीत उद्योग सुरू करण्याचा निर्णय घेतला. मात्र, हे करताना नियमांचे पालन होत नाही. सरकारने त्यांना ५० लाख रुपयांचे विमा कवच द्यावे. तसेच, हाताला काम नसणाऱ्या कामगारांना महिना ७५०० रुपये भत्ता द्यावा. -उद्धव भवलकर, महाराष्ट्र उपाध्यक्ष, सिटू कामगार संघटना

गेलेले कामगार परततील की नाही याबाबत शंकाच

उद्योजकांची संघटना लघुउद्योग भारतीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष रवी वैद्य म्हणाले, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात आणि कर्नाटकने कामगार कायद्यात सुधारणा केल्याने तेथील उद्योगांसाठी सकारात्मक वातावरण तयार झाले आहे. यामुळे गेलेले कामगार परततील की नाही याबाबत शंका वाटते. यावर तोडगा म्हणून उद्योगांना तातडीने ऑटोमेशनकडे वळावे लागेल. परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी नेमका किती वेळ लागेल सांगता येत नाही.

बातम्या आणखी आहेत...