आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंत्री संदीपान भुमरेंनी दिली जीवे मारण्याची धमकी:पैठणच्या तरुणाची ग्रामीण पोलिस अधीक्षकाकडे तक्रार

औरंगाबाद5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंत्री संदीपान भुरे यांनी आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिली आहे, अशी तक्रार युवराज शिवाजीराव चावरे या तरुणाने ग्रामीण पोलिस अधीक्षकांकडे केली आहे. मात्र, यावर अजून गुन्हा दाखल झाला नसल्याचे समजते. याप्रकरणी दिव्य मराठीने संदीपान भुरे यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो उपलब्ध झाले नाहीत.

चावरे हे पैठण तालुक्यातील कोळीबोडखा येथील रहिवासी असून, ते राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ता आहेत. आमच्याविरोधात का राजकारण करतोस म्हणून भुमरे यांनी धमकी दिली आहे. याप्रकरणी योग्य न्याय नाही मिळाल्यास आपण आत्मदहन करू, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

धमकीचा कॉल केला

युवराज चावरे यांनी याबद्दल प्रसारमाध्यमांशीही बोलले. ते म्हणाले की, मला सकाळी नऊ वाजून एकवीस मिनिटांनी आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांचा व्हॉटसअप ऑडिओ कॉल आला होता. त्यांनी त्यामध्ये मला धमकी दिली. काल आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने आदित्य ठाकरे यांच्या जंगी सत्काराचे पाचोड येथे आयोजन केले होते. त्याचाच रोष मनात धरून त्यांनी हा कॉल केला.

अश्लील भाषेत शिवीगाळ

चावरे म्हणाले की, भुमरे यांनी अश्लील भाषेत शिवीगाळ केली. धमकावले देखील. त्यांनी मला विचारले की, तू आमच्याविरोधात का राजकारण करतोस. आमच्याविरोधात का अशा पोस्टी सोडतोस. मी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होतो. मात्र, ते कुठल्याही ऐकायच्या मनस्थितीत नव्हते. त्यांनी मला सरळ अश्लील भाषेत शिवीगाळ करायला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी तू कसे राजकारण करतो, कसा पाचोडला येतो, तुझ्यावर खोटे गुन्हे दाखल करून जेलमध्ये पाठवतो, अशी धमकी मला दिली. तुला बघून घेईल म्हणाले.

काय वावगे ठरले?

चावरे पुढे म्हणाले की, गेल्या पंधरा वर्षांपासून मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्रिय कार्यकर्ता आहे. काम करताना सत्य परिस्थिती समोर आणली, तर त्यात काय वावगे ठरले असे माझे म्हणणे आहे. कार्यकर्ता म्हणून सर्वसामान्य लोकांचे प्रश्न आम्ही सतत उचलत असतो. त्यामुळे की काय म्हणून मंत्री महोदयांना राग आला असेल. त्यांनी मला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली.

माझे बरे-वाईट झाल्यास...

चावरे पुढे म्हणाले की, आम्ही विरोधक म्हणून काही कामे करायचीच नाहीत का, कुठल्याही प्रश्नावर आवाज उठवायचा नाही का, काय चूक केली आम्ही आदित्य ठाकरेंचे स्वागत करून. माझे काही बरे-वाईट झाल्यास त्याला संदीपान भुमरे साहेब आणि त्यांचे कुटुंब जबाबदार राहील. मी एसपी साहेबांना सविस्तर निवेदन दिलेले आहे. योग्य तो न्याय नाही मिळाल्यास आत्मदहन करणार आहे.

बातम्या आणखी आहेत...