आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
राज्यात एकीकडे ग्रामपंचायत बिनविरोध झाल्यास विकास कामांसाठी निधी देण्याचे आश्वासन दिले जात असतांना दुसरीकडे कळमनुरी तालुक्यातील भुरक्याचीवाडी गावाने रविवारी ता. २० झालेल्या गावकऱ्यांच्या बैठकीत ग्रामपंचायत निवडणुक बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला आहे. गावातील आपसातील एकोपा टिकून रहावा या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.
सध्या राज्यात सुमारे १४००० ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. कडाक्याच्या थंडीत गावाचे राजकारण चांगलेच तापले असून गावपातळीवर पॅनल तयार करण्यासाठी गावपुढाऱ्यांची धावपळ सुरु झाली आहे. तर काही ठिकाणी निवडणुक बिनविरोध पार पडल्यास विकास कामांसाठी भरीव निधी देण्याचे आश्वासन लोकप्रतिनिधीकडून दिले जात आहे.
दरम्यान, कळमनुरी तालुक्यातील भुरक्याचीवाडी हे संपूर्ण आदिवासी गाव आहे. गावाची लोकसंख्या १२०० एवढी असून गावात सात सदस्यीय ग्रामपंचायत आहे. यापुर्वी गावात कधीही बिनविरोध निवडणुक झाली नाही. मात्र गावात मतदान पध्दतीमुळे तसेच निवडणुकीमुळे आपसातील हेवेदावे तयार होऊन गावात एकता राहात नाही. त्यामुळे यावेळी ग्रामपंचायत निवडणुक बिनविरोध पार पडण्यासाठी माजी सरपंच संतोष भुरके यांच्यासह तरुणांनी पुढाकार घेतला. त्यासाठी दहा दिवसांपुर्वी पॅनल प्रमुखांचीच बैठक घेऊन त्यांच्यासमोर बिनविरोध निवडीचा प्रस्ताव मांडण्यात आला. त्यामध्ये सर्वांनी होकार दिल्यानंतर गावात दवंडी देऊन रविवारी ता. २० बैठकीचे आयोजन केल्याचे जाहिर करण्यात आले.
त्यानुसार आज गावातील मारोती मंदिरा जवळ बैठक सुरु झाली. यावेळी माजी सरपंच संतोष भुरके, सुदाम खोकले, लक्ष्मण खोकले, विश्वनाथ भुरके, जगदेव भुरके, तंटामुक्ती अध्यक्ष गणपत वानोळे, हनुमंत वानोळे, देवराव कुरुडे, शेषराव आम्ले यांच्यासह युवक मंडळी उपस्थित होती.
यावेळी सर्व प्रभागातून निवडण्यात येणाऱ्या सात सदस्यांची नांवे घेण्यात आली. मात्र जूना एकही चेहरा नको सर्व सदस्य नवीन द्यावेत अशी भुमीका युवकांनी घेतली. त्यानंतर सर्व सात सदस्यांमध्ये नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली. या बैठकीत प्रत्येक प्रभागातील सदस्यांची एकमताने निवड होऊन गावातील ग्रामपंचायतची निवडणुक बिनविरोध करण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. यावेळी सर्वांनी गुलाल उधळून जल्लोषही केला.
दरम्यान, निवडणुकीसाठी ता. २३ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहे. मात्र ता. २५ डिसेंबर रोजी सर्व सदस्य एकत्रीत सातच अर्ज दाखल करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, आदिवासी बहुल गावाने सर्वात प्रथम बिनविरोध निवडीची घोषणा करून इतर गावांसमोर आदर्श उभा केला आहे.
एकमतानेच होणार विकास कामे ः संतोष भुरके, माजी सरपंच
गावाने बिनविरोध निवडण्ुक करण्यावर एकमत झाले आहे. त्यानंतर आता गावात नवीन चेहऱ्यांना समाजसेवेची संधी देण्यात आली आहे. तर गावातील विकास कामाचे निर्णय देखील एकमतानेच घेतले जाणार आहेत. गावकऱ्यांच्या या निर्णयामुळे गावातील एकोपा कायम राहणार आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.