आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पडद्यामागची योद्धा:रोज 5 किमी पायी शासकीय रुग्णालय गाठून सेवा देणाऱ्या सुमन म्हणतात- साफ सफाई का असेना आम्ही रुग्णांची सेवा करतोय याचा अभिमान वाटतो

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्यावर्षी लॉकडाऊनची घोषणा झाली तेव्हा अनेक प्रवासी मजूर आपल्या घराच्या दिशेने शेकडो किमी पायी निघाल्याचे चित्र जगाने पाहिले. त्यांना झालेल्या वेदनांची तुलना निश्चितच करता येणार नाही. पण, एका शासकीय रुग्णालयात सेविका असलेल्या सुमन यांच्यासाठी रोज 10 किमीचा पायी प्रवास एक कर्तव्यच बनले आहे. त्या रोज घर ते रुग्णालय आणि रुग्णालय ते घर असे 10 किमीचे अंतर पायी सर करतात.

कोरोनाकाळात लिफ्ट सुद्धा मिळेना
औरंगाबादच्या बिडकीन शासकीय रुग्णालयात सफाई कामगार म्हणून सुमन मोघे ह्या गेल्या पाच वर्षांपासून काम करतात. कामाच्या ठिकाणापासून त्यांच्या घराचं अंतर पाच किलोमीटर लांब आहे. मात्र जाण्या-येण्याची कोणतेही सोय नसल्याने त्यांना रोज 10 किलोमीटरचा पायी प्रवास करावा लागतो. कोरोनाच्या आधी रस्त्यावर ये-जा करणारे दुचाकीस्वार त्यांना मदत म्हणून लिफ्ट द्यायचे. मात्र आता कोरोनात रुग्णांना सेवा देत असल्याचे कळाल्यानंतर त्यांना लोक लिफ्ट देण्यासाठीही घाबरतात.

आपल्या कामावर अभिमान
पण सुमन यांना त्याचे काहीच दुख नाही. आपल्या कामावर अभिमान असल्याचे त्या सांगतात. कोरोना संकटात कोरोना योद्धे आप-आपल्या पद्धतीने देशाची आणि रुग्णांची सेवा करत आहेत. यात मी एक सफाई कामगार म्हणून का असेना कोरोना रुग्णांना मी पण सेवा देत आहे. ईश्वराने यासाठी आपली निवड केली याचा आपल्याला अभिमान वाटतो असे त्यांनी सांगितले.

रुग्णालय गाठण्यासाठी लागतो दीड तास
सुमन यांना पायीच 5 किमी चालून रुग्णालय गाठावे लागते. पायी चालण्यातच एक ते दीड तास लागतो. त्यामुळे, वेळेवर रुग्णालय गाठण्याच्या प्रयत्नात त्या सकाळी 7 वाजताच घरातून बाहेर पडतात. यासाठी त्यांना रोज भल्या पहाटे उठण्याची सवय झाली आहे. रोज 10 किमी पायपीट करत असल्या तरीही क्वचितच उशीर होतो. रुग्णालयात सेवा देणाऱ्या सुमन एक उत्कृष्ठ गृहिणी सुद्धा आहेत. कुटुंबियांचे जेवण आणि घरातील इतर कामे सुद्धा त्या तेवढ्याच जबाबदारीने पार पडतात. घरी गेल्यानंतर लगेच कुणाला भेटू शकत नाहीत. कधी-कधी मनाला भीती सुद्धा वाटते. पण हे आपले काम असून आपण करत असलेल्या कामाबद्दल अभिमान वाटत असल्याचे त्या पुन्हा सांगतात.

इनपुट - रोहित देशपांडे

बातम्या आणखी आहेत...