आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबालविवाहांचे वाढते प्रमाण, अल्पवयीन मुलींवर होणारे अत्याचार, रस्त्यावर भीक मागणारी बालके आणि बालकामगार यासारख्या प्रकरणांमध्ये पोलिस, डॉक्टर आणि बालकल्याण समितीचा कस लागतो. बालविवाह कायद्याने गुन्हा आहे आणि पोलिस, डॉक्टरच्या माध्यमातून प्रकरण बालकल्याण समितीसमोर येते. कायद्याच्या तरतुदींच्या अधीन राहून निर्णय घ्यावा लागतो. अनैतिक संबंधातून झालेल्या बाळाच्या संगोपनासाठी कायदा नाही. भीक मागणाऱ्या मुलांसाठी स्वतंत्र संस्था निर्माण करण्याची आवश्यकता आहे, असे मत औरंगाबाद जिल्हा बालकल्याण समितीच्या अध्यक्ष अॅड. आशा कटके-शेरखाने यांनी व्यक्त केले. ‘दिव्य मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी विविध मुद्द्यांवर चर्चा केली.
बालकल्याण समितीच्या अध्यक्षा म्हणून शेरखाने यांनी २ जून २०२२ रोजी पदभार स्वीकारला. त्या नॅशनल लॉ स्कूलमध्ये अध्यापनासोबत बालकल्याण समितीच्या अध्यक्ष म्हणून काम करतात. पीडित घटकांसाठी काम करण्याची त्यांची लहानपणापासून इच्छा होती. भीक मागणाऱ्या मुलांना पोलिस बालकल्याण समितीसमोर हजर करतात. आधार कार्ड पाहून आई-वडिलांचा प्रथम अधिकार म्हणून त्यांना सुपूर्द केले जाते. ही मुले पुन्हा भीक मागण्याचे काम करतात. त्यांच्यासाठी स्वतंत्र संस्था हवी. दारिद्ऱ्य रेषेखालील लोक कामाला जातात. १६ वर्षांच्या मुलीस घरी सोडावे लागते.
घरी राहिलेल्या मुलीचा शारीरिक, मानसिक आणि लैंगिक छळ होतो. त्यामुळे तिचे लग्न करण्यात आई-वडिलांना सुरक्षितता वाटते. अशा मुलींची शासकीय रुग्णालयात प्रसूती झाल्यास वय लक्षात येते. डॉक्टर अल्पवयीन मुलीचा विवाह म्हणून पोलिसांना कळवतात. पोलिस बालकल्याण समितीसमोर हजर करतात. पतीवर पॉस्को आणि आई-वडिलांवर बालविवाहाचा गुन्हा दाखल होतो. अशा मुलींच्या शिक्षणाची व्यवस्था झाली तर पुढचा अनर्थ टळेल. गाव-खेड्यात शिक्षणाच्या सुविधा नसल्याने अल्पवयीन विवाह होतात, असेही त्यांनी सांगितले.
अनैतिक संबंधातून जन्मलेल्या बाळाच्या संरक्षणासाठी कायदा हवा अनैतिक संबंधातून जन्मलेले अपत्य सोडून दिले जाते. अशा बाळांच्या संरक्षणासाठी कायदा हवा. समाजात अशा मुलांसाठी टोळी फिरत असते. भविष्यात भीक मागणे, वेश्याव्यवसाय करून घेणे, मानवी तस्करी आदी प्रकारांसाठी वापर होतो. त्याला आळा घालण्यासाठी प्रबोधन तर हवेच, शिवाय कठोर शिक्षेची तरतूद करावी. बालकामगार कोणी स्वखुशीने होत नाही. त्यांना संस्थेत ठेवता येत नाही. त्यांचे आई-वडील असतात. पोलिस पकडतात म्हणून अशी मुले काम करीत नाहीत आणि व्यसनाकडे वळतात. त्यांच्यासाठी संस्कार वर्ग आणि व्होकेशनल प्रशिक्षण शिबिरांच्या आयोजनाची आवश्यकता असल्याचे अॅड. शेरखाने यांनी स्पष्ट केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.