आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राज्यात अलर्ट:परदेशी पक्ष्यांनी आणला परभणीमध्ये ‘बर्ड फ्लू’, रहाटी बंधाऱ्यावरील स्थलांतरित पक्ष्यांमुळे शिरकाव

नांदेड (शरद काटकर)3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोकणात सहा कावळे मृतावस्थेत, राज्यात तूर्तास धोका नसल्याचे तज्ज्ञांचे स्पष्टीकरण

हिमाचल प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेशनंतर राज्यातही बर्ड फ्लूचा धोका वाढला आहे. परभणीतील मुरुंबा गावात ८०० कोंबड्या मृतावस्थेत आढळल्या होत्या. त्यांचा अहवाल बर्ड फ्लू पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली. मराठवाड्यात जायकवाडीसह अनेक पाणथळ जागा आहेत, जेथे स्थलांतरित परदेशी पक्षी मोठ्या संख्येने येतात. मुरुंबा गावापासून दोन ते अडीच किमी अंतरावर असलेल्या रहाटी बंधाऱ्यावर येणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांनी बर्ड फ्लू येथे आणल्याचा अंदाज परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील पशुवैद्यकीय व पशुविज्ञान महाविद्यालयाचे सहयाेगी अधिष्ठाता तथा प्राचार्य डॉ. नितीन मार्कंडेय यांनी व्यक्त केला.

परभणीच्या जिंतूर तालुक्यात येलदरीसह येनोली, कहळा, रायखेडा, बोरी, चारठाणा, नवळी तसेच पिंगळगड नाला, उजळंबा, रहाटी बंधाऱ्यातील पूर्णा नदी, गंगाखेडमधील गोदावरी नदी परिसरात दरवर्षी मोठ्या संख्येने स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन होत असते. यंदा मात्र कमी प्रमाणात स्थलांतरित पक्षी येथे आले असल्याचे जिंतूर येथील पक्षिमित्र अनिल उरटवाड यांनी म्हटले. दरम्यान, बर्ड फ्लूचा प्रसार हा नेहमीच स्थलांतरित पक्ष्यांमार्फत झाल्याचा आजपर्यंतचा अभ्यास आहे. आपल्याकडे काही ठिकाणी याचा प्रसार होताना दिसत आहे. आजवर या राज्यात कधी, तर त्या राज्यात बर्ड फ्लू झाल्याचे घोषित करण्यात येते. आता परभणीतील मुरुंबात कोंबड्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने येथे दक्षता घेण्याची गरज डॉ. मार्कंडेय यांनी व्यक्त केली. यापूर्वी २००६ मध्ये नवापूर, नंदुरबार, धुळे आदी ठिकाणी बर्ड फ्लू आला होता.

नंदुरबार जिल्ह्यात चिकन, अंडी विक्रीवर परिणाम
नवापूर | सहा राज्यांत बर्ड फ्लूचा धोका वाढला आहे. परभणीत पक्ष्यांना बर्ड फ्लूची लागण झाल्याने तालुक्यात पोल्ट्री फार्म चालकांना खबरदारीचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. तालुक्यात अद्याप बर्ड फ्लूचा धोका नसला तरी अंडी, चिकन विक्रीवर परिणाम झाला आहे.

सर्वेक्षणासाठी नाशकात २८ पथके तैनात
नाशिक| बर्ड फ्लू या पक्ष्यांवरील संसर्गजन्य आजाराने शिरकाव केल्यानंतर राज्यात अलर्ट जारी करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेची यंत्रणाही सतर्क झाली असून पक्ष्यांच्या सर्वेक्षणासाठी २८ रॅपिड रिस्पाॅन्स पथके तयार ठेवली आहेत.

परभणी : स्थलांतरित पक्षी तलवार बदक (नॉर्थन पिनटेल), पिवळा धोबी (यलो वॅगटेल), भुवई बदक, हिरवा टिलवा (कॉमन ग्रीनशँक), सामान्य तुतारी (कॉमन सँडपायपर), पांढरा धोबी (व्हाइट वॅगटेल), गुलाबी मैना ( रोजी स्टारलिंग), सामान्य खरुची (कॉमन केस्ट्रेल), ठिपकेवाला तुतारी (वूड सँडपायपर), पिवळ्या डोक्याचा धोबी (सिट्रीन वॅगटेल), करडा धोबी (ग्रे वॅगटेल) थापट्या बदक (नॉर्थन शॉवलेर)

सोलापुरात धोका नाही
सोलापूर शहर व जिल्ह्यात अद्याप एकही संशयित पक्ष्याचा मृत्यू झाला नाही. पशुसंवर्धन विभागातर्फे नियमितपणे जिल्ह्यातील पाणवठे व कुक्कुटपालन प्रकल्पांना भेटी देण्यात येत असल्याचे कळवण्यात आले आहे.

राज्यात २००६ पासून तब्बल २८ वेळेस बर्ड फ्लू
नगर :
प्रशासन सतर्क अहमदनगर शहरात ७८ पथकांची स्थापना करण्यात आली आहे. अद्याप जिल्ह्यात बर्ड फ्लूची नोंद नाही. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिव्य मराठीशी बोलताना केले.

रायगड | जिल्ह्यात “बर्ड फ्लू’चा शिरकाव झाला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शनिवारी दापोलीत डम्पिंग ग्राउंडजवळ सहा कावळे मृतावस्थेत आढळून होते. हे सर्व मृत कावळे तपासाकरिता भोपाळच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते.

अकोला | विदर्भात सध्या बर्ड फ्लूचे संकट आले नाही. सध्या बर्ड फ्लूचा कोणताही धोका नाही.दहिगाव गावंडे परिसरातीले पाच कावळे ७ जानेवारी रोजी मृतावस्थेत आढळले होते. अमरावती, वाशीम, बुलडाणा, यवतमाळ येथे तूर्तात बर्ड फ्लूचा धोका नाही. दरम्यान, राज्यात २००६ पासून आतापर्यंत २८ वेळेस बर्ड फ्लू येऊन गेला आहे. भारतात शिजवलेले चिकन खातात. त्यामुळे चिकन खाण्यास हरकत नसल्याचे संघटनेचे अध्यक्ष उद्धव अहिरे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...