आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोली:बर्ड फ्लुमुळे कोंबड्यांचा मृत्यू, भोपाळच्या प्रयोगशाळेचा अहवाल प्रशासनाला प्राप्त, ७६० कोंबड्यांची विल्हेवाट लावली जाणार

हिंगोली6 महिन्यांपूर्वीलेखक: मंगेश शेवाळकर
  • कॉपी लिंक

कळमनुरी तालुक्यातील पिंपरी खुर्द येथे अचानक मृत झालेल्या कोंबड्यांचा अहवाल पशुसंवर्धन विभागाला प्राप्त झाला असून बर्ड फ्लु मुळेच या कोंबड्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे गुरुवारी ता. २१ पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी गावात भेट देऊन पाहणी केली असून परिसरातील एक किलो मिटर अंतरावरील ७६० कोंबड्यांची विल्हेवाट लावली जाणार आहे.

कळमनुरी तालुक्यातील पिंपरी खुर्द येथील पंडित मारोती धांडे यांच्याकडे २४ कोंबड्या होत्या. शनिवारी ता. १६ या सर्व कोंबड्यांचा अचानक मृत्यू झाला. या प्रकाराची माहिती पशुसंवर्धन विभागाला मिळाल्यानंतर पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. एल. एस. पवार. सहाय्यक आयुक्त डॉ. एस. पी. पवार यांच्या पथकाने गावात भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर मृत झालेल्या कोंबड्यांचे नमुने तपासणीसाठी भोपाळ येथील राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग प्रयोगशाळा या ठिकाणी पाठविण्यात आले होते. तसेच यावेळी या भागात सर्वेक्षणाचे कामही हाती घेण्यात आले.

दरम्यान, भोपाळ येथील प्रयोगशाळेचा अहवाल बुधवारी ता. २० रात्री उशीरा पशुसंवर्धन विभागाला प्राप्त झाला असून या कोंबड्या बर्ड फ्लु नेच मृत झाल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्यानंतर आज पशुसंवर्धन विभागाच्या पथकाने गावात जाऊन पाहणी केली. तसेच परिसरातील एक किलो मिटर अंतरावर असलेल्या कुकुट पालन व इतर कोंबड्यांची माहिती घेतली. यामध्ये ७६० कोंबड्या असल्याचे स्पष्ट झाले असून जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या आदेशानंतरच या कोंबड्यांची शास्त्रीय पध्दतीने विल्हेवाट लावली जाणार असल्याचे पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. पवार यांनी स्पष्ट केले आहे.

त्यानंतर आज जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी तातडीची बैठक घेतली. प्राण्यांमधील संक्रमण रोखणे व प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी आज स्पष्ट आदेश काढले आहे. त्यामध्ये पिंपरी खुर्द च्या परिसरातील एक किलोमीटर अंतरावर क्षेत्र संक्रमित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. तसेच दहा किलोमीटर परिसरातील क्षेत्र सर्वेक्षण क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. संक्रमित क्षेत्रामधून कुक्कुट पक्षी तसेच पोल्ट्री फार्म मधील पक्षी यांचे सर्वेक्षण करून त्यांना मारण्यात बाबतची कार्यवाही करण्याचे आदेश जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी पशुसंवर्धन विभागाला दिले आहेत. तसेच पुढील 90 दिवसापर्यंत परिसरातील दहा किलोमीटर अंतरावरील गावांमधून कोंबड्या व अंडे यांच्या वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले आहेत.

बातम्या आणखी आहेत...