आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकीय चिमटा:मुख्यमंत्री व्हायची इच्छा व्यक्त केली तर भाजपत राजकीय एन्काउंटर होतो, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांची भाजपवर टीका

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय जनता पक्षामध्ये मुख्यमंत्री व्हायची इच्छा व्यक्त केली की त्यांचा राजकीय एन्काउंटर होतो. पंकजा मुंडे यांनी आपण जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असल्याचे म्हटले होते, तर एकनाथ खडसेंच्या बाबतीतही काय झाले हे सर्वांनाच माहिती असल्याचे सांगत विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी भाजपच्या कारभारावर टीका केली. पंकजा मुंडे यांना भाजपने संधी देणे गरजेचे असल्याचे त्या म्हणाल्या.

आठ जूनला मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची औरंगाबादेत सभा होणार आहे. याचा आढावा घेतल्यानंतर गोऱ्हे पत्रकारांशी बोलत होत्या. पत्रकार परिषदेला विनोद घोसाळकर, आमदार अंबादास दानवे, रेणुकादास वैद्य, विभागीय सचिव अशोक पटवर्धन आदी पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

कामगारांची नोंदणी करण्यास प्राधान्य द्या : गोऱ्हे यांनी सांगितले की, सर्व जिल्ह्यांतील श्रमिक नोंदणीबाबतचा आढावा घेऊन येत्या १० ते १५ जूनपर्यंत अधिक संख्येने कामगारांची नोंदणी करण्यास प्राधान्य द्यावे. त्यासाठी विभागीय आयुक्तांचा आवाहन करणारा व्हिडिओ प्रसारित करावा. त्यामध्ये प्रामुख्याने शेतीतील महिला, असंघटित क्षेत्रातील कामगार महिला यांची नोंदणी करून घ्यावी. ज्येष्ठ एकल महिलांसाठीदेखील मदत कक्ष सुरू करावा, जेणेकरून ज्येष्ठ महिला नागरिकांच्या अडचणी तत्परतेने सोडवता येतील, असे त्या म्हणाल्या.

नऊवारी नेसून लोकांना बोलवत इव्हेंट करायचा नाही
शिवसेनेच्या सभेला गर्दी जमणार का? याबाबत गोऱ्हे यंाना विचारले असता त्यांनी भाजपच्या जलआक्रोश मोर्चावर खोचक टीका केली. त्या म्हणाल्या की, आम्हाला नऊवारी नेसून लोकांना बोलवत इव्हेंट करायचा नाही. लोक स्वत:हून आमच्या सभेला येणार असल्याचे त्यांनी सांगितले. शिवसेनेच्या नेतृत्वावर येथील जनता प्रेम करते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना ऐकण्यासाठी लोक येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच ठाकरे सरकारकडून औरंगाबाद शहरातील रस्त्यासाठी निधी, हैदराबाद मुक्तिसंग्राम संग्रहालय, रोझ गार्डन अशी अनेक कामे करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले.

विधवा भगिनींसाठी मदत आराखडा तयार करा
कोरोनात पतीच्या निधनानंतर विधवा भगिनींना मालमत्ता हस्तांतरण प्रक्रियेसह सुरक्षित आणि सक्षम आयुष्य जगण्याच्या संधी सुलभतेने उपलब्ध होणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने महसूल आणि इतर सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वयातून मदत आराखडा तयार करण्याचे निर्देश डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले. विभागीय आयुक्त कार्यालयात त्यांनी रविवारी आढावा बैठक घेतली. या बैठकीस विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे, प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, महसूल उपायुक्त पराग सोमणे आदींची उपस्थिती होती.

आमचा उमेदवार निवडून येणार : राज्यसभेला आमचाच उमेदवार निवडून येणार असल्याचा दावा गोऱ्हे यांनी केला. तसेच जेलमध्ये असणाऱ्यांनाही न्यायदेवता मतदानाची संधी देईल, अशी आशा व्यक्त करताना त्यांनी रमेश कदम, अरुण गवळी यांना यापूर्वी जेलमध्ये असताना मतदानासाठी संधी मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...