आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिक्षकांमध्ये पेन्शन विषयी असलेला रोष हा या निवडणुकीत माझ्या पराभवाचा मुख्य मुद्दा ठरला. त्यामुळे माझ्या पराभवास सर्वाधिक शिक्षकांमध्ये पेन्शन बाबत असलेली नाराजी कारणीभूत ठरल्याची प्रतिक्रिया भाजपचे उमेदवार किरण पाटील यांनी 'दिव्य मराठी'शी बोलताना दिली.
मराठवाडा शिक्षक मतदार संघाचे निवडणुकीत विक्रम काळे यांना 23 हजार 577 मते मिळाली 13 व्या फेरीअखेर विक्रम काळे यांना दुसऱ्या पसंतीची मते पूर्ण झाल्यानंतरही कोटा पूर्ण झाला नाही. मात्र, सर्वाधिक मते मिळाल्यानंतर त्यांना विजयी घोषित करण्यात आले.
विश्वासरावांमुळे फटका
पहिल्याच फेरीत विजयाचे दावे करणारे किरण पाटील यांना दुसरे स्थान मिळणे देखील अवघड झाले होते. याबाबत नेमकी रणनीती कुठे चुकली याबाबत विचारले असता सूर्यकांत विश्वासराव यांना गेलेली वाढीव मते ही विक्रम काळे यांच्यावर असलेल्या रोषापोटीची होती. मात्र ती भाजपकडे येण्याऐवजी सूर्यकांत विश्वासराव यांच्याकडे गेली. त्यामुळे देखील आमचा पराभव झाल्याचे किरण पाटील यांनी सांगितले. भाजपकडे नेत्याची फौज असली तरी शिक्षकांचे मतदान आमच्याकडे नसल्याचे पाटील यांनी मान्य केले.
3 टर्मच्या कामाचा फायदा
विक्रम काळे च्या विजयानंतर 'दिव्य मराठी'शी बोलताना सतीश चव्हाण म्हणाले की, गेले तीन टर्म विक्रम काळे यांनी केलेल्या कामामुळे त्यांचा विजय झाला आहे. शिक्षक पेन्शन मुद्दा निवडणुकीत महत्त्वाचा ठरला आहे देवेंद्र फडणवीस यांनी शिक्षकांना पेन्शन देणार असल्याचे सांगितले होते. आता आम्ही त्याचा पाठपुरावा करणार असे सतीश चव्हाण यांनी सागितले.
विक्रम काळेंंना तासभर पाहावी लागली वाट
मराठवाडा शिक्षक मतदार संघाची मतमोजणी पावणे बाराच्या सुमारास संपली होती. मात्र निवडणूक आयोगाकडून विजयाचे प्रमाणपत्र येण्यास उशीर लागला. त्यामुळे निवडणूक मधला विजयी उमेदवार घोषित करण्यास देखील एक तास अधिकचा वेळ लागला. त्यामुळे सकाळी सहा वाजता आलेले अधिकारी देखील कंटाळले होते. त्यांना देखील एक तास निकाल घोषित होण्याची वाट पाहावी लागली.
सर्व अधिकाऱ्यांची उपस्थिती
अखेर पावणे एक वाजता विक्रम काळे यांना विजयाचे प्रमाणपत्र विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी सुनील केंद्रेकर यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी निवडणूक निरीक्षक शेखर चन्ने यांची उपस्थिती होती. तर औरंगाबादचे जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडेय, परभणी जिल्हाधिकारी आंचल गोयल, हिंगोली जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, निवडणूक निर्णय अधिकारी जगदीश मणियार, अतिरिक्त जिल्हाधिकारी शिवाजी शिंदे, नांदेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर, लातूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल औरंगाबादचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, जालन्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांच्यासह साडेतीनशे कर्मचारी हजर होते.
किरण पाटील दुसऱ्या क्रमांकावर राहिले
भाजपचे उमेदवार किरण पाटील हे या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर राहिले. पहिल्या पसंतीच्या मतमोजणीत सूर्यकांत विश्वासराव यांनी किरण पाटील यांचे पेक्षा 54 मध्ये अधिक मिळवली. पहिल्या पसंतीमध्ये सूर्यकांत विश्वासराव यांना 13543 किरण पाटील यांना 13489 मत मिळाली होती. मात्र बाराव्या फेरीत अखेर किरण पाटील यांनी सूर्यकांत विश्वासराव यांना पाठीमागे टाकले. त्यामुळे सूर्यकांत विश्वासराव यांच्या दुसऱ्या पसंतीची मते मोजण्यात आली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.