आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घणाघात:महाविकास आघाडीने मराठा समाजाचा कोल्ड ब्लडेड मर्डर केला; भाजप नेते आशिष शेलार यांचा आरोप

बीड18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शिवसंग्रामच्या मोर्चाला भाजपचा पाठिंबा

सध्या महाराष्ट्रात मराठा आरक्षणावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी पाहायला मिळत आहे. यावरुन भाजप नेते आशिष शेलार यांनी सत्ताधारी सरकारवर जोरदार टीका केली. आशिष शेलार बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी बीडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत असताना शेलार यांनी महाविकास आघाडीने मराठा समाजाचा कोल्ड ब्लडेड मर्डर केल्याचा आरोप केला आहे.

यावेळी बोलताना शेलार म्हणाले की, शिवसेनेने भावनाशून्यपणे मराठा मोर्चाची खिल्ली उडवली होती. गायकवाड आयोगाची बाजू मांडली नाही. यावरुन ते कर्तव्यशून्य होते हे सिद्ध झालंय. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण स्थगिती नाकारली. त्या गायकवाड आयोगाला तुम्ही गाळात टाकले. आता मराठा समाजाला आर्थिक मागासलेपणमध्ये टाकले असले, तरी सामाजिक मागासलेपण गाळू नका, अशी मागणी शेलार यांनी यावेळी केली.

मातोश्रीचे निमंत्रण स्वीकारले
मराठा हिताचा खून ठाकरे सरकारने केलाय, मराठा समाजाला पूर्ण आरक्षण पाहिजे आहे. तर ब्रिटिश सरकार प्रमाणे ठाकरे सरकार चले जाव असा इशाराच शेलार यांनी यावेळी दिला. देवेंद्र फडणवीस आधी सिल्वर ओक वर गेले, त्या नंतर ते खडसेंच्या घरी गेले, आता मातोश्रीवर ही येतील असे संजय राऊत म्हनाले होते. यावर आशिष शेलार यांना प्रश्न विचारला असता, मातोश्रीचे निमंत्रण स्वीकारले असल्याचे उत्तर शेलारांनी दिले.

मेटेंच्या मोर्चाला भाजपचा पाठिंबा
दरम्यान 5 जून रोजीच्या बीड मधील मराठा मोर्चाला भाजपने पाठिंबा दर्शवला आहे. शिवसंग्रामचे नेते आमदार विनायक मेटे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा होतोय. मेटे यांच्या मोर्चाला स्थानिक भाजपकडून विरोध दर्शविण्यात आला होता. मात्र मराठा आरक्षणासाठी मेटे यांच्या मोर्चाला भाजपचा पूर्णपणे पाठिंबा असल्याची घोषणा आशिष शेलार यांनी केली. त्यामुळे भाजपमधील स्थानिक फळी या मोर्चात कितपत सहभागी होतेय. हे 5 जूनच्या मोर्चा दिवशीच दिसून येईल.

इनपुट- रोहित देशपांडे

बातम्या आणखी आहेत...