आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजीवनात वाटचाल करत असताना संयम, सहनशीलता, त्याग व त्याचबरोबर साहस या चार गोष्टी आवश्यक आहेत. कोणताही गड असो, त्या ठिकाणी भाविक श्रद्धेने जोडलेले असतात. त्यामुळे मी गडात कधीही राजकारण आणणार नाही, माझ्याबद्दल नेहमीच मी स्पष्ट बोलते, असे सांगितले जाते. मात्र मी स्पष्ट नाही तर सत्य बोलते, मग ते कुणाला आवडो अथवा न आवडो. सत्य बोलण्यात मी कोणतीही तडजोड करू शकत नाही, असे भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी सांगितले.
संत मीराबाई आईसाहेब यांच्या २५ व्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त महासांगवी येथे अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता शुक्रवारी संस्थानच्या मठाधिपती महंत राधाताई महाराज सानप यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली. या वेळी मठाधिपती महंत राधाताई महाराज, रामकृष्ण रंधवे महाराज यांच्या हस्ते संत मीराबाई कर्मयोगिनी या पहिल्या पुरस्काराने पंकजा मुंडे यांना गौरवण्यात आले. व्यासपीठावर आमदार सुरेश धस, आमदार बाळासाहेब आजबे, माजी आमदार भीमराव धोंडे, डॉ.सारिका क्षीरसागर आदी उपस्थित होते. पुढे बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, राजकारणाची वाट काटेरी वाट असून ज्या वेळी मी राजकारणात नवीन होते, त्या वेळी मुंडे साहेबांनी मायेने माझी काळजी घेतली. या वेळी पंकजा मुंडे या भावुक झाल्या होत्या. मला कोणत्याही गडावर वर्चस्व ठेवायचे नाही. गोपीनाथगडदेखील तुम्हा-आम्हा सर्वांचाच गड आहे, असे पंकजा म्हणाल्या. संस्थानच्या मठाधिपती महंत राधाताई महाराज सानप यांनी धर्मसत्ता व राजसत्ता यांनी एकत्रित येऊन समाजोद्धारासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे सांगितले.
पंकजाताईंचे भविष्य उज्ज्वल आहे
^राजकारणामध्ये काम करत असताना इंदिरा गांधी, अटलबिहारी वाजपेयी यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांचादेखील कधीकाळी पराभव झाला होता. मात्र त्यानंतर त्यांनी कशा प्रकारे झेप घेतली हे सर्वांना माहीत आहे. त्याचप्रमाणे पंकजाताईंचे भविष्यदेखील उज्ज्वल असून यामध्ये कोणतीही शंका नाही.
- सुरेश धस, आमदार, भाजप.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.