आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओबीसी जागर मेळावा:ओबीसी आरक्षणाच्या आडून षडयंत्र रचणाऱ्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, भाजप राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांचा इशारा

औरंगाबाद13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ओबीसी समाजाला भविष्यात सर्व लाभांपासून वंचित ठेवण्यासाठी आरक्षणाच्या आडून षड‌्यंत्र रचण्याचे काम केले जात आहे. मात्र असा प्रयत्न करून ओबीसींना हक्कांपासून वंचित ठेवण्याचा जे प्रयत्न करत असतील त्यांना आम्ही रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशारा भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी मंगळवारी (१२ ऑक्टोबर) औरंगाबादेतील मेळाव्यात दिला. ओबीसी आरक्षणाचा निर्णय घेतल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्णयाचे त्यांनी स्वागतही केले.

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचे रद्द झालेले आरक्षण पुन्हा मिळवण्यासाठी भाजपच्या वतीने राज्यभर ओबीसी जागर मेळ्याव्याचे आयोजन करण्यात येत आहे. पंढरपूर येथून या मेळाव्याला सुरुवात झाली. मंगळवारी मराठवाडा विभागाचा मेळावा औरंगाबादेत झाला. या वेळी मुंडे यांच्यासह केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड, विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे, माजी मंत्री संजय कुटे, ओबीसी माेर्चाचे प्रदेशाध्यक्ष याेगेश टिळेकर, आमदार अतुल सावे आदींची उपस्थिती हाेती.

उपस्थितांना मार्गदर्शन करताना पंकजा मुंडे म्हणाल्या, ‘वंचित समाजाला सत्तेवर बसवण्याचे काम गोपीनाथ मुंडे यांनी केले. जेथे जन्म घेतला त्या गावाची व मातीची लाज बाळगायची नाही असा विचारही मुंडे यांनी दिला. फुले, शाहू, आंबेडकरांचे नाव घेणाऱ्या महाराष्ट्रात बहुजन समाजाची मोठी परवड होत आहे. राज्यात बहुसंख्येने असलेल्या बहुजन समाजाला नोकरी, न्याय, आरक्षण व संरक्षणासाठी झगडावे लागत आहे. राज्यात अत्याचार झालेल्या व्यक्तीची जात बघून त्यांचे सांत्वन करण्याची चुकीची पद्धत रूढ हाेत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना अनेकांनी त्यांची जात काढली; परंतु त्यांनीच मराठा समाजाला आरक्षण दिले आणि उच्च न्यायालयात ते टिकवलेही. मात्र आता ओबीसींच्या डोक्यावर आरक्षणाची टांगती तलवार आहे. मराठा समाजाची शिक्षण व नोकरीत आरक्षणाची तर ओबीसींची राजकीय आरक्षणाची मागणी आहे. सरकारने याबाबत आश्वासन दिले आहे, मात्र आरक्षणाचा अध्यादेश टिकवून दाखवला तर त्यांचे आम्ही स्वागत करू, असेही मुंडे म्हणाल्या.

मला भावना जास्त समजतात
केंद्रीय मंत्री डाॅ. भागवत कराड भाषणात म्हणाले, ‘आपण मुलांचे डॉक्टर आहाेत, त्यामुळे मला मुलांची भावना समजते.’ हा धागा पकडत पंकजा म्हणाल्या, ‘तुम्ही डाॅक्टर असाल तरी मी एका मुलाची आई आहे. आईपेक्षा कुणीही मुलांच्या भावना जास्त समजू शकत नाही,’ असा टाेला त्यांनी डाॅ. कराड यांना लगावला.

फडणवीसांचा दाैरा रद्द, एेनवेळी पंकजांना मान
विधानसभेचे विराेधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मेळाव्याचे आयाेजन केले हाेते, मात्र एेनवेळी फडणवीस यांचा दाैरा रद्द झाला. त्यामुळे स्थानिक आयोजकांनी पंकजा मुंडे यांना उपस्थित राहण्याची विनंती केली. मुंडे यांनीही सुरुवातीला उपस्थित राहण्यास असमर्थता दर्शवली हाेती, परंतु खुद्द फडणवीस यांच्याकडूनच पुन्हा गळ घालण्यात आल्यानंतर पंकजा तयार झाल्या, असे भाजपमधील सूत्रांनी सांगितले. आपण मराठवाड्याच्या मातीमधील असल्याचे सांगत पंकजांनी पुढील मेळाव्यासही हजेरी लावणार असल्याचे माध्यमांशी बोलताना सांगितले.

बातम्या आणखी आहेत...