आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद पंचायत समितीत राडा:भाजपचे उपसभापती अर्जुन शेळके यांना दालनात घुसून मारहाण, काँग्रेसवर आरोप; हरिभाऊ बागडेंनी दिली घटनास्थळाला भेट

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वीलेखक: विद्या गावंडे
  • कॉपी लिंक

औरंगाबादच्या पंचायत समितीमध्ये काँग्रेस आणि भाजप सदस्यांत तूफान राडा झाला. पंचायत समितीचे नवनिर्वाचित उपसभापती अर्जुन शेळके यांच्या दालनात घुसून सोमवारी मारहाण करण्यात आली. काँग्रेस सदस्यांनीच ही मारहाण केल्याचा आरोप भाजपने केला आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, अर्जुन शेळके यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. यानंतर 4 दिवसांपूर्वीच झालेल्या निवडणुकीत ते उपसभापती म्हणून निवडून आले. काँग्रेसने त्याचाच राग काढल्याचा आरोप केला जात आहे.

काँग्रेसमध्ये अनेक दिवसांपासून नाराज होते. त्यांनी नुकतेच काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. त्यातच उपसभापतीची निवड झाली, त्यामध्ये ते विजयी झाले आणि काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला. 29 जुलै रोजी औरंगाबाद पंचायत समितीच्‍या कार्यालयात झालेल्या उपसभापती पदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे अनुराग शिंदे यांना 9 मते तर नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या अर्जुन शेळके यांना 10 मते मिळाली.

हरिभाऊ बागडेंनी दिली भेट

काँग्रेसच्या सदस्यांना हा पराभव सहन झाला नाही. त्यामुळेच त्यांनी सोमवारी अचानक आपल्या दालनात घुसून हल्ला केला असा आरोप शेळकेंनी केला आहे. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच आमदार हरिभाऊ बागडे यांनी पंचायत समितीला भेट दिली. घटनास्थळावरून समोर आलेल्या छायाचित्रांमध्ये कार्यालयात झालेली धुमश्चक्री आणि खुर्च्या भिरकावल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. काही खिडक्यांच्या काचा देखील फोडण्यात आल्या आहेत.

असे आहे पंचायत समितीचे चित्र

औरंगाबाद पंचायत समितीत एकूण 20 सदस्य पैकी काँग्रेसचे 8, भाजप-7, सेना-3 अपक्ष-2 असे पक्षीय बलाबल आहे. गेल्या अनेक वर्षापासून पंचायत समितीवर काँग्रेसची सत्ता आहे. यात युतीच्या काळात 2015 ला शिवसेनेने काँग्रेसशी हातमिळवणी करत सत्ता स्थापन केली व उपसभापती पद मिळवले. यात गेल्या काही दिवसापासून काँग्रेसच्या सदस्यांत पक्षाअंतर्गत मतभेदामुळे तसेच सेनेच्या उपसभापतींचा राजीनामा घेऊन काँग्रेसच्या मर्जीतील सदस्यांना उपसभापती पद देण्याच्या हालचाली सुरू होत्या. यात काही दिवसापूर्वी सेनेच्या उपसभापती मालती पडुल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने औरंगाबाद पंचायत समितीचे उपसभापती पद रिक्त होते.

बातम्या आणखी आहेत...