आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारतीय जनता पक्षाने समृद्धी महामार्गाचा लोकार्पण समारंभ ‘इव्हेंट’ म्हणून साजरा केला. नागपूर ते मुंबई मार्गातील शिर्डीपर्यंतच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी नागपुरात झाले. माळीवाडा येथील इंटरचेंजवर या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. भाजपने समृद्धी महामार्गाच्या कार्यक्रमाला इव्हेंटचे स्वरूप देऊन एका अर्थाने ‘राजकीय समृद्धी’ लाटली, अशी चर्चा होती. राज्याचे सहकारमंत्री अतुल सावे यांच्या मतदारसंघातून मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्ते सहभागी झाले होते. शहराध्यक्ष शिरीष बोराळकर, पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्ते मोठ्या संख्येने कार्यक्रमाला हजर राहतील याची काळजी घेतली.
भाजपने जिल्ह्याच्या हद्दीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कटआऊट लावले होते. भाजपने या कार्यक्रमाला इव्हेंटचे स्वरूप दिले. सकाळपासूनच माळीवाडा इंटर चेंजवर गर्दी होण्यास सुरुवात झाली. केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ.भागवत कराड ११ वाजेपूर्वी तर राज्याचे सहकारमंत्री अतुल सावे ११ वाजता आले. त्यानंतर पालकमंत्री संदिपान भुमरे, आमदार प्रदीप जैस्वाल दाखल झाले. गंगापूरचे आमदार प्रशांत बंब सर्वात शेवटी दाखल झाले. एलईडी स्क्रीनवर नागपूर, अकोला, जालना, औरंगाबाद, शिर्डी येथे आयोजित कार्यक्रम दाखविले जात होते.
पंतप्रधान मोदी यांचे नागपूर येथे कार्यक्रमस्थळी आगमन झाल्यानंतर इतर ठिकाणचे प्रसारण बंद करण्यात आले होते. कार्यक्रमाला महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, आमदार हरिभाऊ बागडे, आमदार संजय शिरसाठ, भाजप शहराध्यक्ष शिरीष बोराळकर, प्रदेश सरचिटणीस संजय केणेकर, माजी महापौर भगवान घडमोडे, अनिल मकरिये, भाजप महिला आघाडी शहराध्यक्ष अमृता पालोदकर, माधुरी अदवंत, दिलीप थोरात, फुलंब्रीचे नगराध्यक्ष सुहास शिरसाठ, बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष भरतसिंग राजपूत, शहराध्यक्ष राजेंद्र जंजाळ, मध्य विभागाचे प्रमुख विश्वनाथ राजपूत, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडे उपस्थित होते.
‘समृद्धी’चे उद्घाटन मुद्दाम पुढे ढकलले : शिवसेनेचा आरोप शिवसेना पक्षप्रमुख व तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रयत्नामुळे समृद्धी महामार्ग वेळेत तयार झाला. त्यांच्याच हस्ते त्याचे उद्घाटन होणार होते. मात्र, अनिल गायकवाड या अधिकाऱ्याने मुद्दाम काही तांत्रिक चुका झाल्याचे सांगितले. त्यामुळे उद्घाटन सोहळा पुढे ढकलला गेला. काही अधिकारीही असे राजकारण करतात याचे वाईट वाटते, अशी टीका शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.