आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेलका समाचार:भाजपचा आक्रोश सत्तेसाठी, शिवसेनाप्रमुखांनी मुस्लिम द्वेष शिकवला नाही, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

औरंगाबाद25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाजपचा आक्रोश सत्तेसाठी आहे. यापूर्वी कोणी तरी आक्रोश की जलआक्रोश मोर्चा काढला होता. मात्र, तो भाजपचा सत्तेचा आक्रोश होता. शिवसेनाप्रमुखांनी आम्हाला कधीही मुस्लिम द्वेष शिकवला नाही, अशा शब्दांत बुधवारी औरंगाबादमध्ये झालेल्या स्वाभिमान सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपचा शेलक्या शब्दांतून समाचार घेतला. शिवाय तुमचं कार्टं व्हायात झाले आहे. त्याला आवरा, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला केले. यावेळी ठाकरे यांना ऐकण्यासाठी हजारो लोकांनी गर्दी केली. मराठावाडा सांस्कृतिक मैदानात पाय ठेवायलाही जागा नव्हती.

भाजपच्या वर्मावर बोट

उद्धव ठाकरे म्हणाले की, असे आम्ही काय केलं, हिंदुत्व सोडल्याचे बोंबलत फिरताय. शिवसेनेने हिंदुत्वासाठी काय केले आणि भाजपने हिंदुत्वासाठी काय केले, हे खुल्या सभेत होऊन जाऊ द्या. आमचे हिंदुत्व मोजणारे तुम्ही कोण, असा सवालही त्यांनी केला. आम्ही दुसऱ्या धर्माचा द्वेष करत नाही. शिवसेनाप्रमुखांनी सांगितले आहे, घराबाहेर पडल्यास देश हाच धर्म माना. बाळासाहेबांनी कधीच मुस्लिमांचा द्वेष केला नाही. आपल्या देवदेवतांचा अपमान करायचा नाही. तसा त्यांच्याही देवाचा अपमान करायचा नाही. तो अपमान केल्यानंतर सगळे देश एकत्र झाले. त्यांनी आपल्या देशाला गुडघ्यावर आणले, असा उल्लेख करत त्यांनी भाजपच्या वर्मावर बोट ठेवले.

फडणवीसांची केली कोंडी

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, भाजपच्या टिनपाटांमुळे देशाची जगभर नाचक्की झाली आहे. त्यामुळे सरकारला माफी मागावी लागली, हे दुर्दैवी असून, देशाच्या पंतप्रधानांचा फोटो कचराकुंडीवर लावला जातो, हे योग्य वाटते का असा सवाल त्यांनी केला. देवेंद्र फडणवीस म्हणतात बाबरी पडताना मी तिकडे गेलो होतो. संभाजीनगरकरांना विचारा आमचे मोरेश्वर सावे तिकडे गेले नव्हते का? फडणवीस म्हणतात सावे तिकडे गेले नव्हते, तर त्यांच्याच पक्षात आलेले मोरेश्वर सावे यांचे चिरंजीव अतुल सावेंनाच विचारा की, त्यांचे वडील बाबरी पाडायला गेले नव्हते का, असा सवाल करून त्यांनी फडणवीसांची कोंडी केली.

तोफेची गरज नाही...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, शस्त्रक्रिया झाल्यानंतर मुंबईबाहेर पहिले पाऊल संभाजीनगरमध्ये टाकले. औरंगाबादची पहिली महापालिका शिवसेनेने जिंकली, त्यावेळी मी व्यासपीठावर सोडा, बाजूच्या गच्चीवरून सभा पाहात होतो. माझा विश्वास बसत नाही, आजही तोच जल्लोश, तोच भगवा. काहीही कमी नाही. सारे वाढते आहे. ढेकणे चिरडायला तोफेची गरज नसते ही ढेकणे आम्ही अशीच चिरडतो. त्यासाठी सैनिकांचीही शक्ती वाया घालवत नाही. हिंदुत्व हा आपला श्वास आहे. याच मैदानात शिवसेनाप्रमुखांनी सांगितले. मुद्दामहून मी संभाजीनगरच्या पाणीप्रश्नावर बोलणार आहे. बाकीचे सगळे प्रश्न मोठे आहेत. मीच मूर्ख राजकारणी आहे की, इथे पाणीप्रश्न असताना जनतेला प्रामाणिकपणे जनतेला सामोरे जातोय.

अधिकारी, कंत्राटदारांना तंबी

उद्धव ठाकरे म्हणाले, गेल्या आठ दिवसांपूर्वी औरंगाबादमध्ये दहा दिवसांनी पाणी यायचे. तुमच्या मनात असेल, तुम्ही सांगतो ते ऐकतो. पण आमच्या नळाला पाणी नाही. तुमच्या वकृत्वाने पाण्याचा हंडा भरणार नसेल, तर उपयोग काय? आता त्यात सुधारणा झाली आहे की नाही, हे तुम्ही सांगायचे. विभागीय आयुक्त केंद्रेकर आणि महापालिका आयुक्त भेटले. त्यांना सांगितले की, पाण्याच्या झारीतले शुक्राचार्य उचलून बाहेर फेका आणि संभाजीनगरला पाणी द्या. जुन्या गंजून सडून गेलेल्या योजनेलाही पैसे देतोय. समांतर योजनेचा पाठपुरावा मी करेन असे वचन दिले. केंद्रेकरांना सांगितले की, हातात दंडा घ्या, जे वाकडे-तिकडे समोर येतील त्यांना सरळ करा. मग प्रश्न निर्माण झाला. किमती वाढल्या. त्याचे काय. परवाच्या कॅबिनेटमध्ये पैसे देण्याची व्यवस्था केली. एक पैसा या योजनेला कमी पडू देणार नाही.

कंत्राटदारांना तुरुंगात टाकू

उद्धव ठाकरे म्हणाले की, समांतर योजनेचा पाठपुरावा मी करणार हे औरंगाबादकरांना वचन दिले आहे. हातात दंडा घ्या, पण औरंगाबादसाठी पाणी द्या असा मी अधिकाऱ्यांना ठणकावले आहे, एक पैसाही मी योजनेला कमी पडू देणार नाही. कंत्राटदाराने हयगय केल्यास तुरुंगात टाकू.

बातम्या आणखी आहेत...