आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभाजपच्या औरंगाबाद शहर अध्यक्षपदी शिरीष बोराळकर यांची निवड झाली आहे. प्रत्येक शहर आणि जिल्ह्याला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागले आहेत. भाजप प्रदेशाध्यक्षपदी चंद्रशेखर बावनकुळे यांची निवड झाल्यानंतर त्यांनी ही बोराळकरांची निवड केली आहे.
2019 मध्ये औरंगाबाद ग्रामीणच्या जिल्हाध्यक्षपदी विजय औताडे यांची निवड करण्यात आली होती. यावेळी शिरीष बोराळकर यांची शहराध्यक्षपदी निवड झाल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र ती केवळ चर्चाच ठरली होती. यानंतर आता ते समीकरण 2022 मध्ये पुढे आले आहे. शिरीष बोराळकर यांची निवड करून पक्षाला नवी ताकद देण्याचा प्रयत्न असेल. तसेच आगामी मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नूतन कार्यकारणी निवडण्यामागे स्वबळावर निवडणूक लढविण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
फडणवीसांचे समर्थक
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे समर्थक अशी ओळख असलेल्या बोराळकर यांनी शहराध्यक्षपदावर वर्णी लागल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मात्र फडणवीसांचा आदेश अंतिम मानत सर्वांना आगामी मनपा निवडणुकीसाठी त्यांना मदत करावी लागणार आहे.
संघटन मजबूत करू - बोराळकर
आज भारतीय जनता पार्टी औरंगाबादच्या शहर-जिल्हा अध्यक्षपदी माझी नियुक्ती करण्यात आली. औरंगाबादच्या शहरात पक्ष संघटन अजुन मजबुत करण्यासाठी, नागरिकांचे प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी मी सदैव कटीबद्ध आहे. अनेक जेष्ठांची, युवकांची व महिलांची सेवा करण्याची संधी मिळेल. पक्षातील वरिष्ठांनी माझ्यावर दिलेल्या ह्या नवीन जबाबदारीला व विश्वासाला पूर्ण क्षमतेने न्याय देण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. पक्षातील सहकाऱ्यांची व आपली साथ माझ्या पाठीशी सदैव आहे व राहील याची मला खात्री आहे. ही सर्व ऊर्जा घेवुन यापुढेही जोमाने काम सुरू ठेवण्याचा निश्चय आहे. आपल्या सर्वांचे प्रेम नेहमी असेच वृद्धींगत होत राहो, हीच एक अपेक्षा असल्याचे बोराळकरांनी म्हटले आहे.
ही नावे होती चर्चेत
भाजपच्या औरंगाबाद शहराध्यक्ष पदासाठी अनेक नेत्यांनी तयारी सुरू केली होती. यात अनिल मकरिये, समीर राजूरकर, किशोर शितोळे, बापू घडामोडे, राजू शिंदे, प्रमोद राठोड, कचरू घोडके, दिलीप थोरात, यांची नावे चर्चेत होती. अनेकांनी मंत्री अतुल सावे, केंद्रीय मंत्री भागवत कराड, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंच्या माध्यमातून आपली वर्णी लागावी यासाठी प्रयत्न केले होते. शिरीष बोराळकरांवर याआधी प्रदेश प्रवक्ते पदाची जबाबदारी देण्यात आली होती. तर त्यांनी मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढवली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.