आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टाळूवरचे लोणी खाणारे सक्रिय:रेमडेसिविरपाठोपाठ आणखी एका इंजेक्शनचा काळाबाजार तेजीत

औरंगाबाद(प्रवीण ब्रह्मपूरकर)एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • म्यूकरमायकोसिसच्या रुग्णांनाअँफोटेरिसिन इंजेक्शन मिळेना
  • मूळ किंमत 7 हजार, सध्या विक्री होतेय 30 ते 60 हजारांना

औरंगाबादेतील एका कंपनीत इंजिनिअर म्हणून कार्यरत असलेले ४८ वर्षांचे कडुबाळ लांडे यांना कोरोना झाला. त्यातून ते बाहेरच पडताच त्यांना म्यूकरमायकोसिस या जीवघेण्या आजाराने वेढले. हा आजार इतका वाढला की महिनाभर सिग्मा हॉस्पिटलमध्ये उपचार घ्यावे लागले. संसर्ग वाढल्याने त्यांचा उजवा डोळा काढून टाकावा लागला. अत्यंत घातक असलेल्या या आजाराचे सर्व मोठ्या खासगी रुग्णालयांतही रुग्ण वाढत आहेत. महत्त्वाचे म्हणजे या रुग्णांना दिलासा देऊ शकेल, अशी क्षमता असलेल्या अँफोटेरिसिन इंजेक्शनचा महाराष्ट्रात भयंकर तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे ते कोलकाता, बंगळुरू येथून मागवावे लागत आहे. एका रुग्णाला साधारणतः ३० ते ५० इंजेक्शन लागतात. एक इंजेक्शन साडेपाच ते सात हजार रुपयांचे आहे. मागणी जास्त आणि पुरवठा कमी यामुळे इंजेक्शनच्या किमती ३० ते ६० हजार रुपयांपर्यंत गेल्या आहेत.

कोरोनामुक्त झालेल्या मात्र ज्यांना अनियंत्रित मधुमेह आहे अशा रुग्णांमध्ये म्यूकरमायकोसिस या बुरशीजन्य आजाराचे प्रमाण झपाट्याने वाढू लागले आहे. यात रुग्णाला साधारण दोन आठवडे ते चार आठवडे रुग्णालयात उपचार घ्यावे लागतात. संसर्ग दुसऱ्या टप्प्यात पोहोचला तर त्याचा परिणाम डोळ्यावर होतो. काही जणांचा डोळा काढून टाकावा लागतो. काही रुग्णांचे जबडे काढण्याची वेळ आली. अनेकांनी प्राणही गमावले.

इंजेक्शनची वाट : सिग्मा हॉस्पिटलमध्ये म्यूकरमायकोसिसचे २० रुग्ण आहेत. सिग्माचे सीईओ डॉ. अजय रोटे यांनी सांगितले की, अँफोटेरिसिन बुरशीचा संसर्ग थांबवण्याचे आणि शरीराच्या इतर भागात फैलाव रोखण्याचे काम करते. एका रुग्णाला साधारण ५० ते ६० व्हायल लागत आहेत. दररोज तीन इंजेक्शन द्यावे लागत आहेत. मात्र रुग्ण वाढत असल्याने अँफोटेरिसिन इंजेक्शन मिळत नाही. एक इंजेक्शन सात हजार रुपयांना आहे. चार आठवडे उपचार झाल्यास ६० इंजेक्शन लागतात.

बंगळुरू, कोलकाता येथून पुरवठा
विनायक लाइफ केअर मेडिकलचे आशिष भारुका म्हणाले की, भिवंडी, नागपूर, मुंबई येथील सिप्ला, मायलॉन कंपनीच्या प्रकल्पांतून अँफोटेरिसिन मिळत नाही. त्यामुळे कोलकाता, बंगळुरू येथील स्टॉकिस्टकडून २५०० मागवले आहोत. तेथे सध्या म्यूकरमायकोसिसचे रुग्ण नाहीत. औरंगाबादेतील काही रुग्णांचे नातेवाईक १५ दिवसांचा साठा खरेदी करण्यास तयार आहेत. पण आम्ही दोन दिवस पुरेल एवढीच इंजेक्शन्स देत आहोत.

खासगीत वाढली रुग्णांची संख्या
एमजीएमचे सीईओ डॉ. प्रवीण सूर्यवंशी म्हणाले की, आमच्याकडेही ५० रुग्ण असून इंजेक्शनचा तुटवडा आहे. हेडगेवारचे सीईओ डॉ. अश्विनीकुमार तुपकरी म्हणाले, ३० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यांना इंजेक्शनची गरज आहे. बजाजच्या सीईओ डॉ. नताशा कौल म्हणाल्या, तेथे दोनच रुग्ण असले तरी इंजेक्शनचा मुबलक साठा नाही. धूत हॉस्पिटलमध्येही अशीच स्थिती असल्याचे सीईओ डॉ. हिमांशू गुप्ता म्हणाले.
सिग्मा हॉस्पिटलमध्ये म्यूकरमायकोसिसच्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

कोरोनापूर्वी दरमहा १०० व्हायलची गरज, सध्या मागणी हजारापेक्षा जास्तच
नाकाच्या पोकळीतून सुरू होतो आजार : नाक-कान-घसा संघटनेचे अध्यक्ष डॉ. श्रीकांत सावजी म्हणाले, कोरोनानंतर मधुमेह वाढला, प्रतिकारशक्ती कमी झाली तर म्यूकरमायकोसिसचा त्रास होतो. नाकाच्या पोकळीतून संसर्ग होतो. दुर्गंधी सुरू होते. चिपडे, रक्तही येते. संसर्ग डोळ्यात गेल्यास डोळा काढावाच लागतो. अन्यथा बुरशी मेंदूपर्यंत पोहोचण्याची शक्यता असते. औरंगाबादमध्ये किमान ३०० रुग्ण असावेत. त्यांच्यासाठी मुबलक प्रमाणात इंजेक्शन उपलब्ध नाही.

घाटीत सध्या ८ रुग्ण भरती
घाटीत सध्या म्यूकरमायकोसिसचे ८ रुग्ण आहेत. आत्तापर्यंत ४० रुग्णांवर उपचार झाले आहेत. मधुमेह पातळी ३०० ते ४०० असणाऱ्यांना हा आजार होण्याची शक्यता असते. रुग्ण बरा होण्यास सुमारे ३ आठवडे लागतात. घाटीतही इंजेक्शनचा तुटवडा असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

जीव वाचला, डोळा गेला
कडुबाळ लांडेंवर महिनाभर उपचार झाले. त्यातील ५ दिवस ते आयसीयूमध्ये होते. संसर्ग वाढल्याने त्यांचा डोळा काढावा लागला. पण जीव वाचला, याचे समाधान आहे. डॉ. अजय रोटे, सीईओ, सिग्मा हॉस्पिटल

पुरवठा अत्यंत कमी
कोरोनापूर्वी महिन्याला लागत शंभर इंजेक्शन लागत होते. आता दीड ते दोन हजार लागतात. त्या तुलनेत पुरवठा अत्यंत कमी आहे. विनोद लोहाडे, सचिव, मे. असोसिएशन

...तरी तपासणी करा
कोरोनामुक्त झाल्यानंतर मला डोळ्याचा त्रास सुरू झाला. मात्र, मी पहिला दिवस दुर्लक्ष केले. दुसऱ्या दिवशी त्रास वाढला. महिनाभर उपचारानंतर डोळा गमावला. कोरोनामुक्त झाले तरी तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करून घ्या, अशी माझी सर्वांना विनंती आहे. कडुबाळ लांडे, बरे झालेले रुग्ण

बातम्या आणखी आहेत...