आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गंभीर बाब:खदानीतील ब्लास्टिंग उठली जिवावर; सिल्लोड तालुक्यातील केऱ्हाळ्यात दगड उडून पक्षी मृत्युमुखी, पिकाचे नुकसान

पिंपळगाव पेठ3 महिन्यांपूर्वीलेखक: सदाशिव फुले
  • कॉपी लिंक
​​​​​​​स्फोटाची तीव्रता इतकी होती की खदानीच्या बाजूला असलेले मोठे झाड उन्मळून पडले व पक्ष्यांना दगड लागून त्यांचा मृत्यू झाला. - Divya Marathi
​​​​​​​स्फोटाची तीव्रता इतकी होती की खदानीच्या बाजूला असलेले मोठे झाड उन्मळून पडले व पक्ष्यांना दगड लागून त्यांचा मृत्यू झाला.
  • एक किमी परिसरातील घरांच्या अंगणात उडून पडले मोठे दगड

सिल्लोड तालुक्यातील केऱ्हाळा येथे स्टोन क्रशरच्या मालकाकडून खदानीत ब्लास्ट केल्याने मोठमोठे दगड एक किमीच्या परिसरात उडून परिसरातील मका पिकाचे, पाइपलाइनचे तसेच महावितरणच्या ११ केव्ही लाइनचे मोठे नुकसान झाले. ब्लास्टमुळे उडालेले दगड पक्ष्यांना लागून त्यांचा मृत्यू झाला. अनेक शेतकरी बालंबाल बचावले. परंतु चार तास वीज खंडित झाल्याने ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागला. सकाळच्या वेळी शेतात कुणीही नव्हते, अन्यथा अनेक शेतकऱ्यांच्या जिवावर हा प्रकार बेतला असता.

“दिव्य मराठी’ने २४ जुलै रोजी याबाबत वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतरही बिनदिक्कतपणे या क्रशरवर काम सुरूच होते. सकाळी ९ वाजेच्या सुमारास अचानक मोठा आवाज झाला व मोठे दगड एक किमी अंतरावरील शेतात व लोकांच्या अंगणात पडले. शेतात पीव्हीसी पाइपचे तुकडे पडले. महावितरणच्या खांबांवरील तारा दगडांच्या माऱ्यामुळे तुटल्या. काही वेळातच खदानीजवळ शेकडो लाेकांचा जमाव जमला हाेता. दरम्यान, आमच्या पाच फूट अंतरावर मोठे दगड येऊन पडले.

नशिबाने आम्ही वाचलो, असे एका वीटभट्टी कामगाराने सांगितले. क्रशर मालकाविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. स्टोन क्रशर मालकाकडे परवानगी नसताना तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणा कारवाईस दिरंगाई का करत आहे, असा प्रश्न ग्रामपंचायत सदस्य सूर्यभान बनसोड यांनी उपस्थित केला. नायब तहसीदार किरण कुलकर्णी, मंडळ अधिकारी धोपटे, तलाठ्यांनी श्री श्री कन्स्ट्रक्शन कंपनीच्या खदान व स्टोन क्रशनजवळ येऊन पंचनामा केला.

महािवतरणची नुकसान भरपाई दिली, शेतकऱ्यांनाही देणार
कुणालाही इजा पोहोचावी असा उद्देश नव्हता. महावितरणच्या नुकसानीची भरपाई करून दिली आहे. ब्लास्टची सूचना देण्यास परिसरात पाच जणांना पाठवले होते. आम्ही केवळ चार महिन्यांसाठी येथे आहोत. शेतकऱ्यांच्या नुकसानीचीही भरपाई करून देऊ. औरंगाबाद-जळगाव महामार्गाच्या कामासाठी नियमाप्रमाणे शासनाचा महसूल भरून परवानगी घेतली आहे.- सोनू महाजन, खडी क्रशर मालक.

एक्स्पर्ट व्ह्यू
मोबाइल टॉवरमुळे आधीच पशुपक्ष्यांची संख्या कमी झाली आहे. त्यात अशा प्रकारांमुळे पक्षी मारले जात असतील तर हे फारच गंभीर आहे. पुढील काळात आपल्यालाच याचा गंभीर परिणाम भोगावा लागेल. - किरण पवार, निसर्गप्रेमी.

महिन्यापासून दखल नाही
स्टोन क्रशरबद्दल ३० जूनला शेतकऱ्यांनी तहसीलदार, उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे कळवले. “दिव्य मराठी’ने सर्वप्रथम ३ जुलै रोजी वृत्त प्रकाशित केले. ६ जुलै रोजी ग्रामपंचायत सदस्य सूर्यभान बनसोड यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार केली. २० जुलै रोजी त्या तक्रारीची शहानिशा करण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाने पाहणी अहवाल सादर केला. त्या अनुषंगाने “दिव्य मराठी’ने पुन्हा सविस्तर २४ जुलै रोजी वृत्त प्रकाशित केले. पण कारवाई अद्याप झालेली नाही.

इथे राहायचीही भीती वाटते
खदानीत स्फोट होतो तेव्हा भूकंप झाल्यासारखी स्थिती असते. आता येथे राहायलाही आम्हाला भीती वाटते. घराला सर्वत्र तडे गेले आहेत. घर कोसळेल याचीही भीती वाटते. -विजय देहाडे, रहिवासी.

क्रशरसाठी परवानगी नाही
महावितरणच्या ११ केव्ही लाइनचे मोठे नुकसान झाले आहे. लाइनच्या परिसरात ब्लास्ट करण्यासाठी महावितरणची परवानगी घ्यावी लगाते. अद्याप अशी मागणी करण्यात आलेली नाही. - सईद खान, सहायक अभियंता, सबस्टेशन, महावितरण.

कारवाईचा प्रस्ताव पाठवू
सिल्लोड तालुक्यातील केऱ्हाळा येथील शेतकऱ्यांच्या तक्रारीची दखल नक्कीच घेतली जाईल व संबंधित स्टोन क्रशरचा प्रस्ताव याआधीही वरिष्ठांना पाठवला आहे. आता परत प्रस्ताव पाठवू. ब्रिजेश पाटील, उपविभागीय अधिकारी, सिल्लोड.

...तर बरेवाईट झाले असते
खत टाकण्यासाठी शेतात गेलो असता पिकात दगड विखुरल्याचे दिसले. शेतात अक्षरश: दगडांचा खच पडलेला होता. सकाळी आम्ही शेतात राहिलो असतो तर आमचे बरेवाईट झाले असते. - सुभाष बोर्डे, शेतकरी.

बातम्या आणखी आहेत...