आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिंगोली:साखरपुड्यात विवाह अन रक्तदान शिबीरासोबतच रोपांचे वाटप, हिंगोली रक्तपेढीतील कर्मचाऱ्याने दिला सामाजिक संदेश

हिंगोली3 महिन्यांपूर्वीलेखक: मंगेश शेवाळकर
  • कॉपी लिंक

हिंगोली येथील शासकिय रुग्णालयाच्या रक्तपेढीतील कर्मचाऱ्याने रविवारी (ता. ३०) साखरपुड्यातच विवाह उरकून घेतला त्यातून खर्चात बचत केलीच शिवाय या सोहळ्यात रक्तदान शिबीर घेऊन रक्तदानाचेही महत्व पटवून दिले या सोबतच उपस्थितांना रोपांचे वाटप करून वृक्षारोपणाचा सामाजिक संदेशही दिला आहे. रोहिला पिंपरी (ता.जिंतूर) येथे हा सोहळा साजरा झाला आहे.

येथील शासकिय रुग्णालयाच्या रक्तपेढीतील कर्मचारी नितीन लिंबाजी हांडगे (रा. बोबडे टाकळी, जि. परभणी) यांचा विवाह जिंतूर तालुक्यातील रोहिला पिंपरी या गावातील मनिषा कैलास पिसाळ यांच्याशी ठरला होता. आज रोहिला पिंपरी येथे साखरपुडा आयोजित केला होता. मात्र साखरपुड्यातच विवाह सोहळा आटोपून घेण्याचा मतप्रवाह पुढे आला. त्यानुसार कैलास हांडगे, अर्जून हांडगे, लिंबाजी हांडगे, सुभाष खरबडे, कैलास पिसाळ, गोपाल डुकरे, पंडीत आव्हाड यांची बैठक झाली अन त्यामध्ये साध्या पध्दतीने विवाह सोहळा आटोपून घेण्याचा निर्णय झाला. अवघ्या एक तासात विवाह सोहळ्याची तयारी झाली. अन साखर पुड्यातच विवाह सोहळा आटोपण्यात आला. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत विवाह सोहळ्यावरील मोठ्या खर्चात बचत झाली.

या शिवाय या सोहळ्यासाठी हिंगोलीच्या रक्तपेढीतील तंत्रज्ञ गणेश जारे, संतोष ठाकरे, सतीष टाक, ज्ञानेश्‍वर गिरी, बंडू नरवाडे हे उपस्थित राहिले. विशेष म्हणजे त्यांच्या उपस्थितीत रक्तदान शिबीरही घेण्यात आले. यावेळी नवरदेव नितीन हांडगे, नववधू मनिषा हांडगे यांच्यासह अर्जुन हांडगे, कैलास हांडगे, उध्दव गिरी, ज्ञानेश्‍वर आव्हाड, गजानन पिसाळ, ज्ञानेश्‍वर गिणगिणे, काशीनाथ हांडगे, प्रल्हाद पुरी, सागर राठोड यांनी रक्तदान केले.

यासोबतच रक्तदान शिबीरासाठी आलेल्या शासकिय रुक्तपेढीतील कर्मचाऱ्यांचा माजी सरपंच किशोर वसमतकर, पोलिस पाटील विठ्ठल डोकर यांच्या हस्ते विविध प्रजातींच्या वृक्षांची रोपे देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी वृक्षारोपन त्याचे संगोपन करण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले. या विवाह सोहळ्यातून एकाचवेळी खर्चाची बचत, रक्तदानाचे महत्व अन वृक्षारोपनाचे महत्व देखील पटवून दिले आहे. त्यांच्या या उपक्रमाचे कौतूक केले जात आहे.

सध्याच्या परिस्थिती लक्षात घेऊन निर्णय ः नितीन हांडगे, नवरदेव

सध्या कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन साधेपणाने विवाह सोहळा साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. शासकिय रुग्णालयात गरजूंची रक्तबाटल्या साठी होणारी अडचण लक्षात घेऊन रक्तदानाचे महत्व पटवून देण्यासाठी रक्तदान शिबीर घेतले तर वृक्षारोपनाचे महत्व पटवून देण्यासाठी रोपांची भेट दिली आहे.