आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:शासकीय रक्त केंद्रातील ब्लड ऑन कॉल योजना बंद; रक्त संक्रमण अधिकारी, वैद्यकीय समाजसेवक, तंत्रज्ञांची सेवा संपली

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रक्ताचा तुटवडा निर्माण होण्याची भीती

शासकीय रक्त केंद्राचे बळकटीकरण करण्यासाठी व गरजू रुग्णांना वेळेवर रक्त मिळावे, यासाठी राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने राज्यभरातील शासकीय रक्त केंद्रात ऑक्टोबर २०१३ पासून सुरू केलेली “ब्लड ऑन कॉल’ (जीवन अमृत सेवा) ही योजना ३१ मार्चपासून बंद करण्यात आली. राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात शासकीय रक्त केंद्रात अत्यल्प वेतनावर एक रक्त संक्रमण अधिकारी, वैद्यकीय समाजसेवक, तंत्रज्ञाची नियुक्ती करून त्यांच्या माध्यमातून रक्तसंकलन केले जात होते. मात्र, ही योजना बंद केल्यामुळे आता कर्मचाऱ्यांना देखील कमी केले आहे. त्यामुळे घाटीसह राज्यात सर्वत्र रक्ताचा तुटवडा निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, सर्व जिल्हा रुग्णालये आणि वैद्यकीय महाविद्यालयांनी ही योजना बंद करू नका, अन्यथा रक्ताचा तुटवडा निर्माण होऊ शकतो, अशी माहिती आरोग्य विभागाला पत्राद्वारे कळवल्याचे घाटीचे पॅथॉलॉजी विभागप्रमुख डॉ. अनिल जोशी यांनी सांगितले.

घाटीत वर्षाकाठी १५ हजार बॅग रक्त संकलन, कोरोनाकाळातही १२ हजार बॅग गोळा
घाटीत रक्त तुटवड्याची समस्या भासणार

याबाबत घाटीतील वैद्यकीय समाजसेवक हनुमान रुळे म्हणाले, शिबिर आयोजकांच्या भेटी घेणे, जनजागृती करणे, लोकांना रक्तदानासाठी प्रवृत्त करून शिबिर आयोजित करणे, रक्त केंद्रात सर्व गटांचा रक्तसाठा उपलब्ध राहील, याची प्रमुख जबाबदारी वैद्यकीय समाजसेवकांची असते. आता शासनाने ही योजना बंद केल्यामुळे आमची सेवा संपुष्टात आली आहे. त्यामुळे सर्व शासकीय रक्त केंद्रांत रक्ताचा तुटवडा निर्माण होईल.

कॅम्प घेण्यात येणार अडचणी
या योजनेंतर्गत प्रत्येक रक्त केंद्रात वैद्यकीय समाजसेवकाची नियुक्ती केली होती. घाटीत या माध्यमातून काम सुरू होते. त्यामुळे वर्षाकाठी घाटीत १५ हजार बॅग रक्त संकलन केले जात होते. विशेष म्हणजे कोरोनाकाळातही बारा हजार बॅग रक्त संकलन केले होते. या कर्मचाऱ्यांमुळे रक्त संकलनात मोठी वाढ झाली होती. मात्र, ही योजना बंद करून कर्मचारी कमी केल्यास आता कॅम्प कोण घेणार आणि रक्त संकलन कसे करणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

खर्चामुळे योजना बंद : या योजनेवर पैसा जास्त खर्च होत असल्यामुळे ३१ मार्चपासून ही योजना बंद केली आहे. त्यामुळे नियुक्त केलेले रक्त संक्रमण अधिकारी, वैद्यकीय समाजसेवक व तंत्रज्ञाची सेवा समाप्त केली आहे. राज्यातील १०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यावर संकट आले आहे.

स्थानिक पातळीवर निर्णय घ्यावा
योजना बंद झाल्यामुळे कर्मचाऱ्यांची सेवाही संपली आहे. त्यामुळे वैद्यकीय महाविद्यालयातील अधिष्ठाता व जिल्हा शल्यचिकित्सकांनी स्थानिक पातळीवर निर्णय घेऊन त्याबाबतची व्यवस्था निर्माण करावी. -डॉ. अरुण थोरात, सहसंचालक राज्य रक्त संक्रमण परिषद

आम्ही पत्र लिहून कळवले
घाटीची रक्तपेढी राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे. याबाबत आम्ही आरोग्य विभागाला योजना बंद करू नका, अन्यथा रक्ताचा तुटवडा निर्माण होईल, असे लेखी कळवले आहे. सर्व वैद्यकीय महाविद्यालये व जिल्हा रुग्णालयांनी ही भूमिका मांडली आहे.
- डॉ. अनिल जोशी, पॅथॉलॉजी विभागप्रमुख घाटी

बातम्या आणखी आहेत...