आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहकारमंत्र्यांचे मत:व्यापाऱ्यांचे सर्व राजकीय पक्षांतील नेते-कार्यकर्त्यांसोबत स्नेहाचे बंध

औरंगाबाद11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील व्यापाऱ्यांनी सर्व राजकीय पक्षांतील नेत्यांशी-कार्यकर्त्यांसोबत स्नेहबंध रुजवलेले आहेत, असे गौरवोद्गार पालकमंत्री, सहकारमंत्री, आजी-माजी आमदारांनी रविवारी दिवाळी स्नेहसंमेलन सोहळ्यात काढले. सर्व मिळून तुमचे प्रश्न सोडवू आणि प्रेमाचे ऋणानुबंध अधिक दृढ करण्याचा संकल्प या वेळी करण्यात अाला. दि. जनरल किराणा मर्चंट असोसिएशनतर्फे २० नोव्हेंबर रोजी जुना मोंढा येथील बाथ्री तेली समाजाच्या सभागृहात दिवाळी स्नेहसंमेलन झाले.

या वेळी अध्यक्षस्थानी महाराष्ट्र चेंबर्सचे अध्यक्ष मानसिंग पवार, पालकमंत्री संदिपान भुमरे, सहकारमंत्री अतुल सावे, आमदार हरिभाऊ बागडे, माजी आमदार डॉ. कल्याण काळे, नीलेश सेठी, संजय कांकरिया, तनसुख झांबड, आदेशपालसिंग छाबडा, राजू शिंदे, जगन्नाथ काळे, मनसुखलाल बांठिया अादी उपस्थित होते. नीलेश सेठी यांनी प्रास्ताविक केले. शिवशंकर स्वामी यांनी आभार मानले. या वेळी मान्यवरांच्या हस्ते उल्लेखनीय कामगिरीबद्दल व्यापाऱ्यांचा सत्कार केला.

कोरोनामुळे दोन वर्षे दिवाळी स्नेहसंमेलन झाले नाही. आपण सर्व त्यावर मात करत आज पुन्हा स्नेहसंमेलन घेत आहोत. या माध्यमातून व्यापारी, राजकीय नेते एकत्रित येतात. व्यापारी भवनसाठी आम्हाला क्रांती चौकात ७ हजार स्क्वेअर फूट जागा दिली होती. आम्ही एलबीटी १०० टक्के भरला. जागेचे पैसेही दिले. पण अद्यापि जागा मिळाली नाही. याबाबत तत्कालीन मनपा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांची भेट घेऊन चर्चा केली होती. मात्र, त्यांची बदली झाली. नवनियुक्त डॉ. अभिजित चौधरी यांची भेट घेऊन मागणी केली आहे. मात्र, सहकार व पालकमंत्र्यांनी लक्ष देऊन हा प्रश्न मार्गी लावावा. २०२४ च्या निवडणुकीपूर्वी त्या जागेवर व्यापारी भवन बांधून तुम्हाला उद््घाटनाला बोलवतो, असे पवार म्हणाले.

तुम्ही बाजार समितीत व्यापारी भवनसाठी जागा मागितली असती तर लगेच दिली असती. तुम्ही सर्वांनी आता जाधववाडी नवीन मोंढ्यात जाऊन सर्वांनी एकत्रित यायला हवे, असे आवाहन आमदार बागडे यांनी केले. तर मी सदैव तुमच्या पाठीशी अाहे, अशी ग्वाही पालकमंत्री भुमरे यांनी दिली.

प्रस्ताव द्या, बैठक बोलावून हा प्रश्न निकाली काढू माझे वडील खासदार होते तेव्हा व्यापाऱ्यांच्या घरी जाऊन दिवाळीच्या शुभेच्छा देत होते. व्यापारी भवनाच्या जागेबाबत चार महिन्यांत मला एकदाही भेटून चर्चा केली नाही. तरीदेखील तुम्ही मला एक निवेदन द्या. हा प्रश्न नक्कीच सोडवला जाईल. अतुल सावे, सहकारमंत्री

व्यापारी पक्षाच्या नेत्याला झुकते माप देत नाहीत आपल्या येथील व्यापाऱ्यांचे सर्वांशी स्नेहपूर्ण संबंध आहेत. सत्ता असो अथवा नसो. ते कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्याला झुकते माप देत नाहीत. त्यामुळे जागेचा प्रश्न पालकमंत्री भुमरे आणि सहकारमंत्री अतुल सावे यांनी सोडवावा. -डॉ. कल्याण काळे, माजी आमदार

बातम्या आणखी आहेत...