आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजपासून तीन दिवस पूजन:गाैरीपूजेसाठी 12,000 हारांची बुकिंग, किमत 300 ते 1500 ; 200 ते 300 क्विंटल फुलांची आवक

औरंगाबाद / गिरीश काळेकरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गणपती बाप्पांच्या मागोमाग आलेल्या गौरींच्या स्वागत- पूजनाची घराघरात तयारी सुरू आहे. भाद्रपद सप्तमी, अष्टमी व नवमी असे तीन दिवस म्हणजे ३ ते ५ सप्टेंबरदरम्यान हा महालक्ष्मी पूजनाचा सोहळा होत आहे. यासाठी वेगवेगळ्या पदार्थांप्रमाणे गौरीला सजवण्यासाठी फुलांची मागणी दरवर्षी मोठ्या प्रमाणावर होत असते. त्यामुळे या दिवसात फुलांचे दरही वाढतात. औरंगाबादच्या बाजारात शुक्रवारी जालना, अहमदनगर जिल्ह्यांतून झेंडू, शेवंती फुलांची तब्बल २०० ते ३०० क्विंटल आवक झाल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली. जटवाडा, फुलंब्री, पोखरी, गोपाळपूर, खोडेगाव, कन्नड, करंजखेडा, हतनूर, कालीमठ, वानेगाव, त्यासोबतच जालना, बीड, गेवराई आणि अहमदनगर या भागातून फुलांची आवक झाली आहे. शुक्रवारी किरकोळ विक्रेत्यांनी खरेदी केली. यंदा चांगला पाऊस झाल्याने झेंडू आणि शेवंती या फुलांचे उत्पादन चांगले झाले आहे. याच फुलांना चांगली मागणी आहे, अशी माहिती होलसेल विक्रेता कृष्णा बनकर यांनी दिली.

पावसामुळे दर वाढले
एका घरात किमान चार हार लागतातच. एका विक्रेत्याकडे किमान ५० हारांची बुकिंग झालेली आहे. या हारांचे दर ३०० रुपयांपासून ते १५०० रुपयांपर्यंत आहेत. दोन दिवसांपासून पाऊस पडत असल्याने दर वाढत आहेत.
- सतीश सरकटे, फूल विक्रेता

२०० ते २५० विक्रेते
माझ्याकडे ५० जोडी हारांची बुकिंग झाली आहे. शहरात किमान २०० ते २५० फूल विक्रेते आहेत सर्वांकडेही सरासरी ५० ते ७५ हारांची बुकिंग आहे. म्हणजेच जवळपास १२ हजारांहून अधिक बुकिंग शुक्रवारपर्यंत झाली आहे.
- प्रमोद शिंदे, होलसेल फूल विक्रेते

बातम्या आणखी आहेत...