आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विषेश:कुरआन, हदिसच्या पुस्तकांची २५ लाखांची उलाढाल, शहरातील किमान 25, 30 दुकानांमध्ये धार्मिक पुस्तकांची विक्री वाढली

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पवित्र रमजान महिन्यात पवित्र कुरआन शरीफ, पंचसुरा, छब्बीस सुरे, नमाज, दुवा, रोजे के मसाईल, रमजान के मसाईल, जकात, हदिस अशा धार्मिक पुस्तकांची विक्री मोठ्या प्रमाणावर होत आहे. मागच्या दोन वर्षांत कोरोना व लॉकडाऊनमुळे पुस्तकांची विक्री ठप्प होती. आता त्यात वाढ झाली असून किमान २५ लाखांची उलाढाल होणार आहे. मोबाइलवर ऑनलाइन कुरआन शरीफ वाचणे व ऐकण्याचा युवा पिढीचा कल आहे.

मागील दोन वर्षांपासून मशिदीतील पाऱ्याची पेटी, घरातील कुरआन शरीफ व दुआच्या पुस्तकांचे वाचन करण्यात आले. या वर्षी पूर्णपणे निर्बंध उठल्याने दुकाने सुरू झाली आहेत. मुस्लिम बांधवांनी कुरआन शरीफसह जकात, पंचसुरा, अरबीसह मराठी, इंग्रजी, उर्दू भाषेत अनुवादित झालेले कुरआन शरीफ खरेदीवर भर दिला आहे. शहरातील किमान २५ ते ३० दुकानांमध्ये धार्मिक पुस्तकांची विक्री वाढली आहे. मागच्या वर्षाच्या तुलनेत यंदा पुस्तके मोठ्या संख्येने विक्री होत असून किमान २५ लाखांची उलाढाल होईल, असे विक्रेत्यांनी सांगितले.

पारे की पेटी मशिदीला भेट
रमजान महिन्यात मशिदीत दिवस-रात्र इबादत करण्यात येते. तसेच कुरआन वाचन करण्यात येते. त्यामुळे मशिदीत कुरआन शरीफच्या पाऱ्यांच्या (लहान लहान खंड) पेट्या भेट म्हणून देण्यात येतात. त्यामुळे पाऱ्यांच्या विक्रीतही वाढ झाली आहे. रमजानमध्ये घरोघरी सर्वजण कुरआन शरीफचे वाचन (तिलावत) करतात. त्यामुळे कुटुंबातील सदस्य, मित्र तसेच मशिदीमध्ये भेट देण्यासाठी कुरआन शरीफची खरेदी केली जाते.

मोबाइलवर कुरआन शरीफ ऐकण्याची क्रेझ
युवकांमध्ये अरबी भाषेतून उर्दू, इंग्रजी, मराठी भाषेत अनुवादित कुरआन शरीफ वाचण्यासह ते मोबाइलवर ऐकणाऱ्या तरुणांची संख्या वाढली आहे. यासाठी विविध अॅप्लिकेशन उपलब्ध आहेत.

अनुवादित कुरआन शरीफला मागणी
अरबी भाषेतील कुरआन शरीफसह विविध भाषांमध्ये अनुवादित केलेल्या कुरआनला मोठी मागणी आहे. ज्यात मौलाना अशरफ अली थानवी, मौलाना अब्दुल करीम पारेख, मौलाना मोहंमद तकी उस्मानी, मौलाना अबुल आला मौदुदी, मौलाना अहमद रजा बरेलवी यांचे अनुवादित कुरआन शरीफ जास्त प्रमाणात विकले जाते, अशी माहिती मिर्झा बुक वर्ल्डचे संचालक मिर्झा तालेब बेग यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...