आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादिवाळी संपली की तेलंगणा, कर्नाटकच्या गावातून पाणी आणावं लागतं. आमच्या गावाला असे रस्ते आहेत की, त्यामुळं एक बाळांतिन, दोन - तीन शेतकरी, एका गावकऱ्यांसह एकूण पाच-सात जणांचा केवळ उपचाराविना जीव गेला. शेताला द्यायला पाणी नाही. वीज नाही. कुठं-कुठं ठिगळ लावायचं. मग गर्जा महाराष्ट्रासाठी कशासाठी? असा सवाल तेलंगणा - कर्नाटक सीमेवरच्या महाराष्ट्रातल्या मानूर बुद्रुकच्या (जि. नांदेड) गावकऱ्यांनी केला.
देगलूर तालुक्यातल्या मानूर बुद्रुकपासून अगदी हाकेच्या अंतरावर असणाऱ्या तेलंगणा आणि कर्नाटकाचा अक्षरशः कायापालट झालाय. मात्र, महाराष्ट्राच्या हद्दीतली गावे रस्त्याच्या कडेला चुरगळून फेकून दिलेल्या कागदासारखी पडलीयत. त्यांची व्यथा इथे संपत नाही, तर इथून सुरू होते.
आम्ही नांदेड सोडलं. गाडी देगलूरच्या दिशेनं निघाली. महाराष्ट्रातलं शेवटचं टोक. तेलंगणा, कर्नाटक, महाराष्ट्र या तिन्ही सीमा जिथं मिळतात ते गाव. मानूर बुद्रुक गाठायचं ठरलं. शंकरनगर आलं. तिथला बंद पडलेला साखर कारखाना दिसला. फक्त आमचे चालक ईश्वर सुरेशे यांच्याकडं नजर टाकलं. त्यांनी न बोलता ओळखलं. हळहळ व्यक्त केली. म्हणाले, परिसरसातल्या हजारो लोकांचे कुटुंब या कारखान्यावर होते. मात्र, चालवला नाही. सगळ्यांनी मिळून बंद पाडला. कारखाना सुरू झाला तेव्हा किती प्लॉटिंग झालेलं. कुठवर प्लॉटिंग झालेलं. वस्ती कशी वाढलेली. हे सारं त्यांनी गाडीचा वेग कमी करून दाखवलं. आता प्लॉटिंगच्या खुणा पुसलेल्या. अनेकांनी तिथं मांडलेला बाडबिस्तारा गुंडाळलेला. त्या जागेवर धड पीक नव्हतं. धड दुसरं काही. शेतजमीन पडीक झालेली. रखरखीत खरबाड इथल्या बेरोजगारीचं प्रतीक म्हणून जणू येणाऱ्या जाणाऱ्याकडे बघून कुत्सितपणे हसतं होती. ईश्वर सुरशे का हळहळले ते आत्ता कळालं. ही सुरुवात होती. एका भयाण प्रवासाची.
पुढे या भागातल्या एका मित्राला सोबत घेतलं. त्यांनी सुरुवातच धक्कादायक केली. गाडी हानेगावच्या बाहेरून चाललेली. म्हणाले, तुम्हाला एक गंमत दाखवतो. त्यांनी गाडी हानेगावमधून घ्यायला सांगितली. काही आडतीची दुकाने होती. त्याच्या शेजारी काही नव्या कोऱ्या पत्र्यांनी मारलेले शेड. शेडमध्ये गाद्या. पंखे. खुर्च्या टाकलेल्या. येणाऱ्या जाणाऱ्याची शाही बडदास्त. जवळपास अशा दहा एकदम चकचकीत पत्र्याच्या खोल्या. इथे आलेले अनेक शेतकरी या आडतीत माल विकतात. त्याचा पैसा इथे फस्त करतात. ही होती पंचक्रोशीतली दहा मटक्याची केंद्रं. काही दिवसांपूर्वीची घटना. एका ऊसतोड कामगारानं गुत्तेदाराकडून 1 लाख 20 हजारांची उचल घेतली. पैसा घेऊन थेट मटक्याच्या केंद्रावर आला. तास-दोन तासांमध्ये कंगाल. आता त्याला वर्षभर बायकोसह ऊसतोड करावी लागणारंय. त्याचं कुटुंब काय खाणार, तो काय करणार. मित्रानं सांगायच्या आधीच डोक्यात प्रश्नांचं गिरमीट सुरू झालेलं. हाताला रोजगार नाही. जो रोजगार आणि तुटुपुंजा पगार मिळतो, त्याचा पैसाही असा उडून जातो. हा फेरा होता. नियतीचा की आणखी कशाचा. सगळ्यांना दिसत होतं. मात्र, ही उघडी मटक्याची केंद्रं पोलिसांनी आणि इथल्या प्रशासनाला दिसत नव्हती. हा कसला योगायोग म्हणायचा?
गाडीनं वेग पकडला. काहीच वेळ. काहीच किलोमीटर झाले असतील. आता गाडीचा आणि बैलगाडीचा वेग सारखाच अशी परिस्थिती. सकाळपासून आमची वाट पाहत बसणाऱ्या मानूरकरांचे फोनवर फोन सुरू होते. त्यांना माहित होतं. आम्हाला उशीर लागणारच. ते फोन यासाठी होते की, आम्ही कदाचित अर्ध्यातून वापस तर फिरणार नाही ना, याची भीती त्यांना होती. त्यामुळं थोड्या - थोड्यावेळानं फोन करायचे. आम्ही कुठवर आलो, याची माहिती घ्यायचे. असं करत - करत एकदा मानूर बुद्रुक आलं. गाडी ग्रामपंचायतीसमोर थांबली. पन्नास जणांचा घोळका समोर आला. सगळ्यांनी हात जोडलेले. आमच्या मनात कोण एक अपराधीपणाची भावना दाटून आलेली. यांच्या अपेक्षा, आकांक्षा कशा पूर्ण होतील? ही भावना आतून पोखरत होती.
ग्रामपंचायतीत शिरलो. सगळ्यांना विचारलं, तुम्हाला तेलंगणात जायचं का? सरपंचासह सगळ्यांनीच एकमेकांच्या सुरात सूर मिसळला. उत्तर फक्त हो. आपला महाराष्ट्र, संयुक्त महाराष्ट्राचा लढा, हुतात्मे. सगळं खरंय. भावनेवर किती दिवस जगायचं? पोलिस पाटील विष्णुकांत गणपतराव पाटलांचा रोखठोक सवाल. त्यांना सगळ्याच ग्रामपंचायत सदस्यांनी दुजोरा दिला. एकेक गाठ सुटत चाललेली. एकेक जण बोलत होता. आधी साऱ्यांना नावं सांगायला लावली. रामदास गोविंदराव नागनपल्ले, दिनेश मोगलरेड्डी पंगे, शिवाजी वसंतराव शिंदे, गणपत सुरेश पाटील, विनोद मन्मथअप्पा वनगाडे, राजेश सोपान भंडे ही यादी खूप मोठी होणाराय. पन्नास नाव लिहिली तरी थांबणार नाही. कारण पन्नासची संख्या केव्हाच वाढलेली. आता गर्दी फुल्ल झालेली. एकेक जण सांगत होता. मानूर बुद्रुकची लोकसंख्या पाच हजार. इथून कर्नाटकची बॉर्डर एक किलोमीटरवर. तिथंच खेटून मानूर खुर्द कर्नाटकात. तेलंगणाची बॉर्डरही फक्त साडेचार किलोमीटरवरय. त्याला खेटून सोपूर तेलंगणात. मानूर (बु) पासून तेलंगणातलं गुंटूर साडेचार किलोमीटर दूर. आणि महेबापूर पाच किलोमीटर दूर. मात्र, ही गावं समृद्ध आहेत. आम्ही काहीच नाही. रस्ते नाही. वीज नाही म्हणजे लोडशेडिंग सुरूय. सिंचनाच्या नावानं बोंबय. गावात फक्त एक बोअरवेलय. दिवाळीपासून कर्नाटकातून डोक्यावर पाणी आणावं लागतं. कारण रस्ता चांगला नाही. असं करताय का, तुम्ही चलाच आमच्यासोबत. या गावांना भेट देऊन येवू. चला, आमची कळकळीची हात जोडून विनंतीय. त्या साऱ्यांच्या डोळ्यांतली आगतिकता प्रश्न नेहमीचा असला, तर खूप गंभीरय याची जाणीव करून देत होती.
आम्ही सारेच उठलो. ग्रामपंचायतीच्या बाहेर पडलो. त्यांनी आम्हाला स्पष्ट सांगितलं, चारचाकी घेऊच नका. कारण तिथं चालणारच नाही. आम्ही सारेच जण दुचाकीवर डबल सिट निघालो. एकामागे एक गावातून निघणाऱ्या दुचाक्या पाहून अनेक घरातील महिला वर्ग धावत रस्त्यावर. त्यांना काही कळत नव्हतं. नेमकं झालंय काय? सुरुवातीला अवघ्या एका किलोमीटरवर कर्नाटकात असणाऱ्या मानूर खुर्दकडे निघालो. दुचाकी चालवणंही प्रचंड कठीण जात असलेलं. इतकं की अनेकदा गाडीवानाचा तोल जायचा. असं वाटायचं आता गाडी पुढे तरी जाणार नाही, नाही तर दगडावरून स्लीपतरी होईल. किलो किलो, दोन-दोन किलो वजनाचे गोटे. जणू दगडांचा रस्ता. सध्या डिसेंबर सुरूय. पावसाळ्यात काय परिस्थिती असेल, टू व्हीलरवर धक्के तर बसतच होते. मात्र, आत बसणारे धक्के कितीतरी भयंकर होते. त्याची लगेच प्रचिती आली. समोर सुरू असलेलं पुलाचं काम आम्ही ओलांडलं. ते पहा कर्नाटकातलं मानूर खुर्द. आता रस्ता चांगला - चांगला होत असलेला. मानूर खुर्दची हिरवी पाटी आली. आता इथून रस्ता एकदम गुळगुळीत. जणू तेल सांडलं, तरी हातानं भरून घ्यावा असा. आता गाडीवरील गावकरी पुन्हा म्हणाले, आमची चूक नेमकी काय? एवढं बोलून त्यांनी पुन्हा गाडी मागे वळवली. सगळ्याच गाड्या एकामागोमाग एक. आता प्रश्नही विचारावं वाटत नव्हतं. कारण सगळं समोर दिसत होतं.
आम्ही पुन्हा मानूर बुद्रुक गाठलं. त्यांनी न सांगता आता दुचाकी तेलंगणाकडे वळवली. सोपूर तिथून तीन किलोमीटरवर. तिथंही यापेक्षा भयंकर अनुभव आला. फक्त दगडांचा रस्ता कसा असू शकतो, हे पाहायचं असेल, तर आपल्या पुढ्याऱ्यांना इकडं यावंच लागेल. त्यांनाही हे आश्चर्य पाहिल्याचं समाधान तरी नक्कीच मिळेल. आता टू व्हीलर चालवणाऱ्या पाटलांनी किस्सा सांगितला. नवी दुचाकी घेतली, तरी वर्षभरात खिळखिळी होते. पुन्हा धक्के. धक्क्यामागून धक्के. धक्के. आता दुरूनच तेलंगणाची पाटील दिसली. सोपूर नावाच्या हिरव्या पाटीजवळ पोहचलो, तर पुन्हा एकदा गुळगुळीत रस्ता सुरू झाला. सोपूरच्या शाळेसमोर सगळ्याच गाड्या थांबल्या. ज्या मानूर बुद्रुकवासीयांना दिवाळी झाली की, डोक्यावरून कर्नाटकातून पाणी आणावलं लागतं. तिथंच कर्नाटक आणि तेलंगणामध्ये कसं मुबलक पाणी मिळतं, हे गावकऱ्यांनी दाखवलं. शाळेजवळ हौद बांधलेला होता. तो भरत आलेला. पाइपमधून पाणी पडत असलेलं. जणू पिच्चरमधलं गाव असावं. पाण्याकडं पाहण्यात बराच वेळ गेला. पुन्हा गाड्या काढल्या. महाराष्ट्रात निघालो. महाराष्ट्र आणि तेलंगणा. महाराष्ट्र आणि कर्नाटक. महाराष्ट्र इतका मागास का, उत्तर पुन्हा मिळालं नाही.
ग्रामपंचायतीत आलो. आता सगळ्यांनी एकेक करून बोलायला सुरुवात केली. अंतापूरकर साहेब निवडून आलेत. प्रचारानंतर ते एकदाही इकडे फिरकले नाहीत. अशोक चव्हाण उभ्या हयातीत फक्त एकदाच येऊन गेले. त्याही पराभव दिसल्याने कॉर्नर मिटींग घेतल्या. आमचे रस्ते इतके भीषणयत की, भारत स्वातंत्र्य झाल्यापासून एकदा काय तो रस्ता झाला. नंतर इथे कोणीही, काहीही केलं नाही.तेलंगणाची राजधानी हैदराबादला जायला तीन तास लागतात. आम्हाला इथून नांदेडला जायलाही तीन तास लागतात. विशेष म्हणजे हैदराबादपेक्षा नांदेड अंतर जवळपास निम्म्यानं कमी. आता बोला, दिनेश पंगे यांनी गावकऱ्यांची व्यथा मांडली.
आमच्या गावात अनेकांनी दोन वर्षांपूर्वी शेतात पाइपलाइन केलीय. मात्र, अजूनही त्यांना वीज कनेक्शन मिळालेलं नाही. दुसरीकडं आठ तास लोडशेडिंग. पिकांना पाणी कसं देणार? त्यात भरमसाठ वीजबिल वुसली. त्याचं गणित काही केल्या कळत नाही. शेजारच्या तेलंगणात तर शेतकऱ्यांना मोफत वीज मिळते. इतकंच नाही. शाळेतल्या मुलांना सुद्धा ते फिल्टरचे पाणी पाजतात. इथे दूषित पाणीही मिळत नाही. शुद्ध पाण्याचे तर बोलूच नका, दिनेश पंगे यांनी खंत व्यक्त केली.
मुलभूत सोयीच नाहीत. देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतोय. आपले मुख्यमंत्री - उपमुख्यमंत्री समृद्धीवरून महागडी गाडी घेऊन टेस्ट ड्राइव्ह करतायत. बिलकुल करा. आपल्या महाराष्ट्राचा असाच विकास होऊ द्या. आमचं काही म्हणणं नाही. फक्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी त्यांची तीच गाडी घेऊन यावं. आमच्या या रस्त्यावरून ड्राइव्ह करावी. मग त्यांना आमच्या वेदना कळतील. शिवाजी शिंदेंनी तावातावानी बोलणं सुरू केलं. त्यांची कळकळ प्रत्येक शब्दांतून व्यक्त होत असलेली. म्हणाले, आमच्या गावात आरोग्य केंद्र नाही. आमच्या गावात दहावीच्या पुढं शाळा नाही. अकरावीपासून कॉलेजला पाठवायचं म्हटलं, तर रस्ते चांगले नाहीत. एसटी असून उपयोग नाही. कारण ती कॉलेजच्या वेळेत येत नाही. प्रत्येकाला परगावी आपली मुलं रूम करून ठेवून शाळेत पाठवणं परवडत नाही. गावात कुठलिही बँक नाही. एटीएम नाही. पैसे काढायला सुद्धा वीस किलोमीटर दूर असलेल्या हानेगावला जावं लागतं. त्यामुळं अनेक शेतकरी माल विकून आणलेला पैसा घरात ठेवतात. त्यामुळं वारंवार चोऱ्या होता. शेतकरी पुन्हा लुबाडला जातो. नांदेड जिल्ह्यात सर्वात मोठा साठवण तलाव आहे. मात्र, बेंबऱ्यापासून पुढं पाणी नाही. आमचं गाव उंचावर आहे. पाणी पातळी खोल आहे. येडूरचा साठवण तलाव आहे. मात्र, त्याचं पाणी फक्त दोन - तीन गावांनाच मिळतं, आम्ही करावं काय? दिवाळीनंतर कर्नाटकातून आम्हाला रोजचं प्यायचं आणि सांडायचं पाणी आणावं लागतं. तिथले अनेकजण म्हणतात, तुमच्या असल्या राहण्याला अर्थ तरी काय, त्यांना द्यायलाही आमच्याकडं उत्तर नसतं. आता शिंदे खाली मान घालून गप्प बसले.
पोलिस पाटलांनी पुन्हा बोलणं सुरू केलं. ते म्हणाले, तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि तेलंगणा राष्ट्र समितीचे (टीआरएस) अध्यक्ष के. चंद्रशेखर राव यांना राष्ट्रीय राजकारणात यायचंय. त्यामुळं त्यांनी आपल्या 'टीआरएस' पक्षाचं नाव 'बीआरएस' भारत राष्ट्र समिती केलंय. बरं ते इतक्यावरच थांबले नाहीत. त्यांनी चांगल्या योजना सुरू केल्यात. आता हेच बघा तिथं कुटुंबातील एका व्यक्तीला 6 किलो तांदूळ, डाळ, तेल, गहू, फुकट मिळतंय. धोबी, न्हावी, दुकानदारांना मोफत वीजय. विधवा महिला, निराधारांना महिन्याला 2 हजार रुपये. अपंगाला महिन्याला 3 हजार रुपये. रायथू बंधू योजनेतून शेतकऱ्यांना हेक्टरी 10 हजार रुपये. शेतकरी मृत्यू पावला, तर पाच लाख रुपयांचा विमा वेगळाच. शेतकऱ्यांना वीज फुकट. शादी मुबारक योजनेतून मुलीच्या लग्नाला 1 लाख 116 रुपये देतात. बाळंतपणानंतर 'केसीआर किट' योजनेअंतर्गत मुलगा झाल्यास 12 हजार आणि मुलगी झाल्यास 13 हजार रुपये मिळतात. अहो इतकेच नाही, तर दलित बंधू योजनेअंतर्गत अनुसूचित जातीसाठी उद्योग करण्यासाठी 10 लाखांचं कर्ज मिळतं. मिशन भगीरथ योजनेअंतर्गत प्रत्येक गावात फिल्टरचं शुद्ध पाणी फुकट द्यायचा प्रयत्नही सरकार करतंय. आम्हाला निदान पाणी, रस्ते, आरोग्य, शिक्षण सुद्धा मिळू नये? पाटलांच्या संतापाचा पारा चढलेला. त्यांनी या सगळ्या योजनांची यादीच केलेली. त्यांनी बोलणं संपल्यानंतर त्या यादीच्या कागदाची घडी करून खिशात ठेवली. आता प्रत्येकाला बोलायचं होतं. प्रत्येकाला सांगायचं होतं. किती - किती फाटलंय. ठिगळ कुठं - कुठं लावणार? सगळं डोक्याबाहेरचं. हे सरकारला कितपत माहितीय देव जाणो.
आता पंगेंनी बोलायला सुरुवात केली. हे पंगे म्हणजे सरपंच राधाबाई चंदा रेड्डी-पंगे यांचे पती. ते म्हणाले, आम्हाला जर मुलभूत सोयी-सुविधा देता येत नसतील, तर आम्हाला सरळ तेलंगणात जाऊ द्यावं. आता आमचा येणाऱ्या निवडणुकीवर बहिष्कारच असणाराय. सगळ्यांनी सुरात सूर मिसळला. गावात शेतीला पाणी नाही. वीज नाही. हाताला काम नाही. त्यामुळं पाचशे कुटुंब ऊस तोडीसाठी कर्नाटकात गेलेत. आमच्या गावाची अशी अवस्थाय म्हणून मुलांना लग्नासाठी कोण गावात मुली द्यायला तयार नाही. शेवटी कंटाळून दहा ते पंधरा जण दुसऱ्या गावात घरजावई म्हणून गेलेत. काय - काय सांगणार आमच्या घरातलं? घराची कळा अंगण सांगतं म्हणतात. तसं गावाची कळा रस्ता सांगतो. आम्हाला कापूस पिकला, तर चाळीस - चाळीस किलो दुचाकीवर आणावा लागतो. अनेकांच्या शेताकडं बैलगाड्याच जात नाहीत. तुम्ही रस्ता बघितालयच. अहो इतकंच नाही. रस्त्या चांगला नसल्यामुळं एक बाळांतिन बाई उपचाराविना मेली. तिला त्रास व्हायला सुरुवात झाली. अशा अवस्थेत दुचाकीवर नेणं शक्यच नाही. मोठ्या वाहनाची व्यवस्था केली. मात्र, आम्ही उपचारासाठी पोहचवू शकलो नाही. अर्ध्या रस्त्यातून बाळासह आईचं प्रेत घरात आणावं लागलं. एकानं विष घेतलेलं. त्यालाही आम्ही वाचवू शकलो नाही. का, तर दवाखान्यापर्यंत नेताच आलं नाही. एकाला साप चावलेला. त्यालाही कसं तरी दुचाकीवर बसवलं, पण दवाखान्याला जाईपर्यंत अर्ध्या रस्त्यातच तडफडून - तडफडून गेला. येताना निचेष्ट पडलेला पांढराफटक देह आणला. ती तडफड थांबलीय. आपण गाड्या काढल्या आणि कर्नाटकातल्या मानूरकडे जायला निघालो. तेव्हा घरातून आया-बाया पळत आलेल्या तुम्ही पाह्यल्या असतील. त्या का आल्या माहितंय? त्यांना भीती वाटली की, अजून कुणाला तरी काही तरी झालं काय? त्याला गाडीवर बसवून नेतायत काय?. आता हा तरी जिवंत येणार का? असंच वाटलं असेल बघा. सगळेच खोलात गेलेले. विचारशून्य झाल्यासारखं. डोक्यात भिरभिर सुरू. चहा आणला, पण कोणालाच गोड लागला नाही. आम्ही उठलो. नमस्कार, चमत्कार. गाडीत बसलो. सूर्य मावळतीला गेलेला. धक्क्यावर धक्के बसत होते. सगळ्यांचे चेहरे डोळ्यांसमोर तरळत होते. तडफड...तडफड...तडफड...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.