आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अहवाल:प्रभाग रचनेच्या आक्षेपांत हद्दवाद गाजला ; आराखडा 2 जून रोजी झाला होता प्रसिद्ध

औरंगाबाद3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचनेच्या आराखड्यावरील दाखल झालेल्या ३२४ आक्षेपांवर बुधवारी सकाळी १०:३० वाजता मौलाना अबुल कलाम आझाद संशोधन केंद्रात सुनावणी झाली. यात तब्बल २८६ जणांनी प्रभागाच्या हद्दी चुकीच्या असल्याचा आक्षेप नोंदवला, तर काहींनी मनारसारख्या हद्दी करून घेतल्याचा आरोपही या वेळी केला.

नागरिकांनी घेतलेले आक्षेप, हरकती आणि सुधारणांची नोंद घेतली असून त्यासंबंधीचा अहवाल ३० जून रोजी राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाने सुनावणीसाठी नियुक्त केलेले राज्याचे नोंदणी महानिरीक्षक श्रावण हर्डीकर यांनी दिली.

मनपाने प्रारूप प्रभाग रचनेचा आराखडा २ जून रोजी प्रसिद्ध केला. या आराखड्यावर १६ जूनपर्यंत आक्षेप मागवले होते. २२ जून ही तारीख निश्चित करून श्रावण हर्डीकर, राज्य निवडणूक आयोगाचे अमोल कनसे, विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिनिधी, मनपा प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांच्या उपस्थितीत सायंकाळी ६ वाजता सुनावणी पूर्ण झाली.

जागेवर जाऊन सर्वेक्षण करा : अधिकाऱ्यांनी गुगल नकाशाचा वापर करून कार्यालयातच प्रभाग रचना आराखडा तयार केला. त्यामुळे प्रभागाची व्याप्ती व नकाशात ताळमेळ बसत नाही. व्याप्तीतील अनेक वसाहती दुसऱ्याच प्रभागात आहेत, तर काही वसाहतींची नावे नसल्याचे या वेळी समोर आले. महापालिकेने प्रारूप प्रभाग रचना करताना प्रत्यक्ष स्थळपाहणी न करता गुगल मॅपवरून ही रचना तयार केली आहे. त्यामुळे हद्दीतील वसाहती, रस्ते, नाले, नदी हे लँडमार्क दाखवले नसल्याचे सर्वाधिक आक्षेप असल्याचे निदर्शनास आले. आता प्रत्यक्ष जागेवर जाऊन सर्वेक्षण करावे व लँडमार्क दाखवावे अशी सूचना हर्डीकर यांनी केली.

बातम्या आणखी आहेत...