आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संभाजीराजे छत्रपती यांचे युवकांना आवाहन:सारथी संस्थेतील राजकीय हस्तक्षेप मोडून काढा; शहरात सारथी कार्यालय, वसतिगृह उभारणार

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

मराठा समाजातील तरुणांसाठी स्थापन केलेल्या सारथी संस्थेतील राजकीय हस्तक्षेप मोडून काढा, असे आवाहन छत्रपती संभाजीराजे यांनी युवकांना केले. मराठा क्रांती मोर्चा, मराठा क्रांती ठोक मोर्चातर्फे शनिवारी सायंकाळी यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात छत्रपती संभाजीराजेंच्या उपस्थितीत युवक व विद्यार्थी संवाद परिषद झाली. त्यातील प्रश्नोत्तरात त्यांनी हे आवाहन केले. अशोक गाडे यांनी सारथीमधील राजकीय हस्तक्षेपाचा मुद्दा मांडला. त्यावर संभाजीराजे म्हणाले, या संस्थेला आम्ही स्वायत्तता मिळून दिली. आता राजकीय संघटनांचे हस्तक्षेप तुम्ही मोडून काढावे. यात काही मदत लागली तर मी तुमच्या पाठीशी सदैव उभा आहे. औरंगाबादेत सारथीचे कार्यालय, मराठा मुलांसाठी वसतिगृह उभारणीचा निर्णय झाला आहे, असेही ते म्हणाले.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगात पाचपैकी फक्त दोनच सदस्य आहेत. आयोगाच्या परीक्षा वारंवार पुढे ढकलल्या जातात, असे कृष्णा पाटील यांनी निदर्शनास आणून दिले. तेव्हा ते म्हणाले, सदस्य वाढवण्यासाठी पाठपुरावा केला जाईल. परीक्षा नियमित घेण्यासाठी पत्रव्यवहार करून मार्ग काढला जाणार आहे. महावितरणच्या भरतीत मराठा समाजाच्या उमेदवारांना न्याय मिळावा, २०१९मधील पीएसआय भरतीपासून ६० मराठा उमेदवार वंचित आहेत, असे रोहिणी काळे, ज्ञानेश्वर नाईकवाडे यांनी सांगितले. त्यावर पूर्ण माहिती द्या. हा प्रश्न सोडवण्यासाठी पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन छत्रपती संभाजीराजेंनी दिले.

२१८१ मराठा मुले भरती होऊनही वंचित आहेत. हा प्रश्न मंत्रिमंडळापर्यंत पोहोचवला आहे. दिल्लीकडे हा प्रश्न प्रलंबित आहे. लवकरच यावर मार्ग निघेल, असे ते म्हणाले. परिषदेचे आयोजक रमेश केरे पाटील औरंगाबादचे संभाजीनगर नामकरण करावे, क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे काम तातडीने सुरु करण्यासाठी मनपाला सूचना करावी, अशी मागणी केली.

कठोर कायदा हवा
महापुरुषांची बदनामी करणारे, चुकीचा इतिहास लिहिणाऱ्यांवर अंकुश ठेवण्यासाठी सरकारने कायदा कठोर करावा, अशी मागणी मी करणार आहे. गडकिल्ले संवर्धनासाठी आम्ही मोहीम राबवतोय, आपणही त्यात सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी सर्वांना केले.

बातम्या आणखी आहेत...