आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Aurangabad
  • Budget 2022 | Business Man | Small Business Man |Aurangabad | Hope For The Industry, Disappointment For The Common Man, But Laying The Foundation For Infrastructure

व्यापारी नाराज:उद्योगांना आशा, सामान्यांची निराशा; पण पायाभूत सुविधांची पायाभरणी

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना नवी उभारी देणारा अर्थसंकल्प मंगळवारी (१ फेब्रुवारी) केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी जाहीर केला. त्यातील तरतुदी पाहता आगामी काळात औरंगाबादच्या कृषीसह सर्व उद्योगांना बळ मिळणार आहे. शिवाय पायाभूत सुविधांसाठी दूरगामी पायाभरणी होणार असल्याने विशिष्ट गतीने सामान्यांना त्याचा लाभ होईल. परंतु, तत्काळ निकषावर नोकरदार वर्गाची निराशा झाली असून व्यापारी, शेतकऱ्यांसाठीही यात काही नाही, असा सूर संबंधित क्षेत्रातील अभ्यासक, जाणकारांनी व्यक्त केला.

रेल्वेस्टेशन येथील सीएमआयए (चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चर असोसिएशन, चिकलठाणा येथील मसिआच्या (मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चर) सभागृहात उद्योजकांनी टीव्हीसमोर ठाण मांडत अर्थमंत्र्यांचे भाषण ऐकले. त्यातील तरतुदींवर चर्चात्मक अभ्यास करून मुद्दे मांडले. उद्योजक आणि अर्थकारण अभ्यासकांच्या मते हा अर्थसंकल्प उद्योगांना चालना देणारा आहे. याचा भरीव फायदा औरंगाबादला होईल. देशभरात येत्या २५ वर्षांत पायाभूत सुविधा दिसू लागतील. पण औरंगाबादेतील पर्यटनवाढीसाठी तरतूद नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. यंदा प्रथमच डाॅ. भागवत कराड यांच्या रूपाने केंद्रीय अर्थ राज्यमंत्रिपद औरंगाबादला मिळाल्याने मोठ्या आशा होत्या, मात्र त्या पूर्ण झाल्या नसल्याचेही सांगण्यात आले.

सिंगल विंडोची अंमलबजावणी प्रभावीपणे व्हावी

२५००० किमीचे रस्ते बनवण्याच्या संकल्पामुळे बांधकाम क्षेत्राला मार्केट मिळेल. रोजगार वाढेल. शेतीविषयक साहित्य उत्पादने करण्याऱ्या स्टार्टअप्समुळे शेती उत्पादन उद्योगांची भरभराट होईल. सिंगल विंडोची अंमलबजावणी किती प्रभावी होईल, त्यावर खूप काही अवलंबून आहे. नारायण पवार, अध्यक्ष, मसिआ

संरक्षण क्षेत्रातील उद्योजकांना लाभ पहिल्यांदा संरक्षण क्षेत्रातील ६८ टक्के खरेदी देशांतर्गत पुरवठादारांकडून केली जाणार आहे. औरंगाबादच्या उद्योजकांना याचा मोठ्या प्रमाणात लाभ होऊ शकतो. एमएसएमईंना ईसीजीएलएस योजनेत दिलेली सूट दिलासादायक आहे. एकूण हा अर्थसंकल्प कृषी, उद्योगासाठी चांगला आहे. अभय हंचनाळ, माजी अध्यक्ष, मसिआ

लोखंड, संरक्षण, सौरऊर्जेत मोठी रोजगारनिर्मिती कच्च्या मालावरील आयात कर कमी केल्याने औरंगाबाद, जालन्यात स्टील उद्योगाला मोठा फायदा हाेईल. कृषी, संरक्षण क्षेत्राशी निगडित उद्योगांनाही फायदा हाेईल. संरक्षण क्षेत्रातील उद्याेगांना औरंगाबादेत नक्कीच उभारी देईल. सौरऊर्जेतही मोठी रोजगार निर्मिती होईल. - नितीन गुप्ता, उपाध्यक्ष सीएमआयए

इंटरनेटचे जाळे सशक्त, पण आरोग्याकडे दुर्लक्ष इंटरनेटचे जाळे सशक्त करण्यावर यात भर दिलेला दिसतो. याशिवाय २५ हजार किलोमीटरचे रस्ते आणि ४०० रेल्वेगाड्यांमुळे पायाभूत सुविधा आगामी २५ वर्षांत अत्यंत महत्त्वाचे योगदान देतील. कृषी मालाच्या दळणवळणाला चालना, वेग मिळेल. मात्र, आरोग्याकडे दुर्लक्ष झालेले दिसते. डॉ. सुनील देशपांडे, कार्यकारी सदस्य, सीएमआयए

पोकळ घोषणांशिवाय काही नाही शेतीसाठी २४ तास वीज हवी आहे. त्याची अंमलबजावणी होत नाही. सिंचन व्यवस्था कुचकामी आहे, शेतमाल वाहतुकीसाठी पक्के रस्ते नाहीत. हमीभाव शेतकऱ्यांना मिळत नाही. अर्थसंकल्पात पोकळ घोषणांशिवाय काही नाही. विश्वंभर हाके, शेतकरी, आडगाव बु., ता. औरंगाबाद

कृषी विद्यापीठांसाठी तरतूदच नाही कृषी विद्यापीठांच्या बळकटीकरणासाठी तरतूद नाही. ग्रामीण भागातील रस्ते विकासाशिवाय शेतमाल मोठ्या बाजारपेठेत नेणे अशक्य आहे. सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देणे व शेतमालाला हमीभावाची हमी स्वागतार्ह आहे. झीरो बजेट शेती सरकारी योजनेतून करणे शक्य आहे. ड्रोनने फवारणी शेतकऱ्यांना कितपत परवडेल? डॉ. अशोक ढवण, कुलगुरू, कृषी विद्यापीठ, परभणी

अर्थसंकल्पात आमची झाेळी रिकामीच, जीएसटीमध्ये काहीच दिलासा नाही!

जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष विजय जैस्वाल यांच्या पुढाकाराने कुंभारवाडा येथील दुर्गा ब्यूटी अँड बँगल्सच्या दालनात व्यापाऱ्यांचे चर्चासत्र आयाेजित केले हाेते. या वेळी उपस्थित पदाधिकारी व व्यापाऱ्यांच्या अर्थसंकल्पाबाबत प्रतिक्रिया....

बळीराजासाठी मोठमोठ्या घोषणा बिनकामाच्या, जे हवे त्यापासून ठेवले जाते वंचित शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी रस्ते, पाणी, वीज यावर फारशी तरतूद नाही. ड्रोन शेतकऱ्यांना परवडणारे नाही. हमीभावाची बाजारात हमी नाही. तेलबियांचे उत्पादन व खाद्यतेल प्रक्रिया उद्योगासाठी ग्रामीण स्तरावर प्रकल्प राबवायला हवे. सौरऊर्जा योजना कागदावरच आहे. राजेश इंगळे, उद्यान पंडित पुरस्कारप्राप्त शेतकरी, खुलताबाद

बॅटरीवरील वाहनांना प्राेत्साहन दिल्याचा फायदा बॅटरीवरील वाहनांना प्रोत्साहन मिळणार असल्याने वाहन उद्योगांना फायदा होईल. चार्जिंग स्टेशन उभारणीत माेठ्या प्रमाणात स्टार्टअप्सना संधी आहेत. औरंगाबादेत ग्रीन मोबिलिटी मिशनची सुरुवात झाली असल्याने विशेष संधी आहेत. कौशल्य विकास साधून रोजगार निर्मितीची अपेक्षा आहे. सतीश लोणीकर, सचिव, सीएमआयए

उद्योगांची आर्थिक स्थिती सावरण्यावर भर कोरोनाचा फटका पडलेल्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांची आर्थिक स्थिती सावरण्यावर भर दिला आहे. अलॉय स्टीलवरील कर कमी केला आहे. एमएसएमईला जपानमधून कास्टिंग, लिनियर गाइड आयात करावे लागतात. तो कर कमी केल्याने उद्योगांना फायदा होईल. उत्पादन वाढेल. - शिवप्रसाद जाजू, अध्यक्ष, सीएमआयए

बातम्या आणखी आहेत...