आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएन-३ या उच्चभ्रू वसाहतीमधील मुख्य रस्त्यावरील बंगला फोडून चोराने आठ तोळे सोने, चांदीचा ऐवज आणि १ लाख ७५ हजार रुपये रोख लंपास केले. ही घटना २९ नोव्हेंबर रोजी दुपारी साडेबारा ते तीनच्या दरम्यान घडली. चोराने तब्बल अडीच तास घरातील सर्व खोल्या, कपाटे फोडून हा प्रकार केला.
औद्योगिक वसाहतीत एफसीचे पुरवठादार, कंत्राटदार असलेले शिवाजी अवधूत चव्हाण (६८) कुटुंबासह एन-३ मधील जयदीप काॅम्प्लेक्सजवळ राहतात. नातीचे लग्न असल्याने रविवारी संपूर्ण कुटुंब त्यांच्या मूळ गावी कोल्हापूरला गेले होते. गुरुवारी सकाळी घरी परतल्यानंतर त्यांनी मुख्य दाराने प्रवेश केला. खालच्या मजल्यावरील बेडरूम, देवघरातील सर्व सामान अस्ताव्यस्त फेकलेले होते. वरच्या खोल्यांतही तशीच परिस्थिती पाहून चोरी झाल्याचे त्यांना कळाले. त्यांनी पुंडलिकनगर पोलिसांना माहिती दिली. उपायुक्त शीलवंत नांदेडकर, सहायक आयुक्त विशाल ढुमे, पुंडलिकनगरचे निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांच्यासह पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. ठसेतज्ज्ञ, श्वानपथकही दाखल झाले.
अडीच तास घरात वावर : छत्रपती महाविद्यालयाच्या पुढील परिसरातील मुख्य रस्त्यावर चव्हाण यांचे घर आहे. चहूबाजूंनी सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. चोराने भरदुपारी सव्वाबाराच्या सुमारास कंपाउंडवर चढून जाळी वाकवून प्रवेश केला. मागच्या दाराचे लॉक तोडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर टिकावाने बाहेरील वॉशिंग मशीनवर चढून छोट्या खिडकीची लोखंडी जाळी ताडून घरात प्रवेश केला. त्याने १२ वाजून १६ मिनिटांनी त्याने प्रवेश केला आणि दुपारी २.५० च्या सुमारास घराबाहेर पडला. मागील भागातील टेनिस कोर्टाची जाळी वाकवून तेथून पळाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला.
चोराने दोन दिवस केली घराची रेकी
चव्हाण यांच्या घरासमोरील रस्ता वर्दळीचा आहे. तरीही भरदुपारी चोर भिंतीवर चढून जाळी वाकवून आत घुसताना कुणाला दिसला कसा नाही, असा प्रश्न सर्वांनाच पडला. दोन दिवसांपासून त्याने घराची रेकी केल्याचेही समोर आले. काम करणाऱ्या महिलेने सोमवारी त्याला हटकलेही होते.
असा गेला ऐवज : वरच्या मजल्यावरील खोल्यांतून ७ तोळे वजनाच्या सहा बांगड्या, डायमंड रिंग, ३ ग्रॅमचे मंगळसूत्र, चांदीची २ ताटे व ३ वाट्या, १ लाख ७० हजार रुपये रोख तर तळमजल्यावरून ५ ग्रॅमची अंगठी, लक्ष्मीपूजेची सोन्याची ३ नाणी, चांदीचा करंडा, वाटी, २ मोठ्या समया, लक्ष्मीपूजेची चांदीची कॅश, चांदीची ६ लक्ष्मी यंत्रे, चांदीचे १ मोठे व १ लहान ताट.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.