आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहिंगोली ते कनेरगाव नाका मार्गावर माळहिवरा फाट्याजवळ रविवारी ता. 11 सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास बर्निंग ट्रकचा थरार गावकऱ्यांनी अनुभवला. चालत्या ट्रकला लागलेल्या आगीत ट्रकमधील औषधी, कपडा, इलेक्ट्रॉनिक्स साहित्य जळून मोठे नुकसान झाले आहे. माळहिवराफाटा येथील गावकरी व अग्नीशमनदलाने आग आटोक्यात आणली. याबाबत चालक गगनदिपसिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली येथून व्हिआरएल कंपनीचे दोन ट्रक औेषधी, कपडा, इलेक्टॉनिक्स वस्तु व इतर साहित्याचे डाग घेऊन हैदराबादकडे निघाले होते. आज सकाळी माळहिवरा फाटा पासून काही अंतरावर दोन्ही ट्रक चालकांनी चहा घेतला. त्यानंतर पुढील प्रवासाला निघाले.
एक ट्रक पुढे गेला तर दुसरा ट्रक (क्र.केए-25-डी-9436) पाठीमागून जात होता. मात्र हा ट्रक माळहिवरा फाट्या जवळ आल्यानंतर ट्रकच्या पाठीमागच्या बाजूने अचानक पेट घेतला. अवघ्या काही वेळातच आगीने रौद्ररुप धारण केले. ट्रकच्या पाठीमागून येणाऱ्या दुचाकी वाहन चालकाने ट्रक पेटल्याची माहिती दिल्यानंतर चालक गगनदिपसिंह व क्लिनर यांनी ट्रक थांबवून ट्रकमधून बाहेर पडले. त्यानंतर या घटनेची माहिती समोर धावणाऱ्या ट्रकचालकालाही दिली. दरम्यान, ट्रकमधील औषधी, कपडा साहित्यामुळे ट्रकमधून मोठ्या ज्वाला बाहेर पडल्या अन धुराचे लोट उठले होते. त्यानंतर ट्रक चालक व गावकऱ्यांनी मिळेल त्या साहित्याने आगीवर पाणी ओतण्याचा प्रयत्न केला.
मात्र इंधन टाकीचा स्फोट होण्याची भितीने गावकरीही ट्रक जवळ जात नव्हते. त्यानंतर या घटनेची माहिती पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे यांना मिळताच त्यांनी तातडीने हिंगोली नगर पालिकेच्या अग्नीशमन दल घटनास्थळी पाठविले. गावकरी व अग्नीशमनदलाच्या थकाने घटनास्थळी येऊन आगीवर नियंत्रण मिळविले. तो पर्यंत ट्रक मधील काही साहित्य जळून खाक झाले तर काही साहित्य पाण्याने भिजून खराब झाले. यामध्ये ट्रक व साहित्याचे मोठे नुकसान झाले. मात्र आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.