आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेळापत्रक कोलमडले:अर्धा ते आठ तास उशिराने धावताहेत बसेस

संतोष देशमुख | औरंगाबाद10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील दोन बसस्थानकांतून सुटणाऱ्या व इतर शहरांतून बसस्थानकात येणाऱ्या बसेस अर्धा ते आठ तास उशिराने धावत आहेत. वेळापत्रक कोलमडल्याने प्रवाशांचा वेळ वाया जात असून कामांचे नियोजन बिघडत आहे.

काेराेनानंतर सर्वच मार्गावर नियमित बस धावत आहेत. दैनिक दिव्य मराठी प्रतिनिधीने २० सप्टेंबर राेजी सिडको व मध्यवर्ती बसस्थानकात जाऊन बसेसच्या वेळा जाणून घेतल्या. तेव्हा अधिकारी, कर्मचाऱ्यांनी येईल दहा ते पंधरा मिनिटांत असे नेहमीचेच उत्तर दिले. मध्यरात्री १ ते दुपारी ३ वाजेपर्यंत बस केव्हा आली व सुटली याबाबत माहिती जाणून घेतली असता बीडची बस पहाटे ४.४० ऐवजी दुपारी १२.१५ आणि वसमत पुणे सकाळी ६.३० ऐवजी दुपारी २.३० वाजता म्हणजे ८ तास उशिराने आली. अमरावती-पुणे रात्री २ ऐवजी पहाटे ४ वाजता, सिल्लोड-नाशिक ८.३० ऐवजी २.३० वाजता, बुलडाणा-पुणे बसेसदेखील ४० मिनिट ते २ तास उशिराने धावल्या. अशाच प्रकारे बस उशिराने धावत असल्याचे दिसले.

एकाच मार्गावर दोन ते चार बसेस : मंगळवारी दुपारी २.४० ते २.४७ पर्यंत मध्यवर्ती बसस्थानकात नाशिकसाठी चार बसेस लागल्या होत्या, तर सिडको बसस्थानकात परतूर-पुणे, वसमत-पुणे, औरंगाबाद-लोणी रिसोड, औरंगाबाद-मेहकर, सुलतानपूर-रिसोडसाठी बस उभी हाेती. या सर्व बसेसच्या वेळेत किमान ३० मिनिटांचे अंतर हवे होते. मात्र, वेळेत बस लागत नाही. त्यामुळे एकाच वेळी दोन ते चार बस येतात. त्या सर्वांना प्रवासी मिळत नाहीत. याचा एसटी महामंडळाच्या उत्पन्नावरही परिणाम हाेताेय. एक बस हाऊसफुल्ल, दुसऱ्या बसला प्रवासी मिळत नसल्याने ती रिकामी धावते. वेळेत बस धावल्या तर सर्व बसला प्रवासी मिळतील व प्रवास सेवाही सुधारेल. याकडे महामंडळाने लक्ष देण्याची गरज असल्याचे एस. एम. दांडगे, बी. जे. पवार आदी प्रवाशांनी सांगितले.

ही आहेत बस वेळेत न धावण्याची कारणे
बस उशिरा का धावतात याबाबत काही चालक व वाहक, वाहतूक निरीक्षक, चौकशी कक्षात विचारणा केली तेव्हा गाड्या वेळेत मिळत नाहीत. वाहक-चालक अचानक रजेवर जातात. बसचा तांत्रिक बिघाड, खड्डेमय रस्ते, रस्त्यांची सुरू असलेली कामे, वाहतूक काेंडी, नियोजनशून्य कारभार अशी काही कारणे समाेर आली.

चौकशी करून जबाबदारी निश्चित करणार
बस वेळेतच सुटायला हव्यात. यामध्ये कसूर होत असेल तर त्याची सखोल चौकशी करून जबाबदारी निश्चित केली जाईल. - सचिन क्षीरसागर, विभाग नियंत्रक, औरंगाबाद विभाग.

बातम्या आणखी आहेत...