आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकिराडपुरा भागात रामनवमीच्या आदल्या दिवशी झालेला किरकोळ वाद मिटल्यानंतर काही तासांत अफवा पसरवली गेली व शेकडोंचा जमाव मंदिराच्या दिशेने धावून आला. या तरुणांना चिथावणी देणाऱ्यांमध्ये स्वत:ला धर्माचा अभ्यासक सांगणारा, तसेच जमीन खरेदी-विक्रीचे काम करणारा एक व्यक्ती असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. मध्यरात्री तरुणांची माथी भडकावून त्याच्यासह इतरांनी पहाटे सहापर्यंत शहर सोडल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.
३० मार्च रोजी किराडपुऱ्यात किरकोळ वादाचे रुपांतर दंगलीत झाले. रात्री १२ च्या सुमारास दोन तरुणांच्या गटांत वाद सुरू झाला. पोलिसांनी मोठे प्रयत्न करून हा वाद मिटवला. दोन्ही गट नंतर तेथून निघून गेले. मात्र, याच वेळी काही समाजकंटकांनी त्याचा गैरफायदा घेतला. किराडपुरा परिसरातून तरुणांचे गट निघून गेल्यानंतर अर्ध्या तासामध्ये जिन्सी परिसरात अफवांचे पीक पसरवले गेले व पुढील अनर्थ घडला. यात प्रामुख्याने पोलिसांना लक्ष्य केले गेले. जवळपास पहाटे चार वाजता पोलिसांकडून दंगलीवर नियंत्रण मिळवण्यात आले.
आठ वर्षांपूर्वी शहरात स्थायिक : सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जमावाला उद्युक्त करणाऱ्यांची काही नावे पोलिसांनी निष्पन्न केली आहेत. यात ८ ते १२ जण असल्याची शंका आहे. त्यात प्रामुख्याने स्वत:ला धर्म अभ्यासक असल्याचे सांगणारा व्यक्ती आहे. ३० ते ३५ वर्षे वयोगटातील हा व्यक्ती इतर वेळी जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय देखील करायचा. चांगल्यापैकी उत्पन्न असलेला हा व्यक्ती मूळ बीड शहराचा रहिवासी आहे. आठ वर्षांपूर्वी तो जिन्सी भागात राहण्यासाठी आला होता. दंगलीच्या रात्री त्याची भूमिका महत्त्वाची होती. चार वाजता पोलिसांनी दंगलीवर नियंत्रण मिळवताच त्याच्यासह तरुणांची माथी भडकावणाऱ्यांनी काही तासांत शहर सोडल्याचे तपासात समोर आले आहे. काही पथके त्यांचा बाहेरील जिल्ह्यात शोध घेत आहे.
१६० अधिकारी, कर्मचारी, २४ तास तपास पोलिसांवर झालेल्या हल्ल्याने पोलिसांनी देखील आरोपींचा शोधण्याचा चंग बांधला आहे. जवळपास १६० कर्मचारी, अधिकारी दंगलीच्या तपासकामी २४ तास काम करत आहेत. एसआयटी व्यतिरिक्त गुन्हे शाखेचे ८० टक्के कर्मचारी, अधिकारी दंगलीच्या तपासात आहेत. शिवाय, १७ पोलिस ठाण्यांचा प्रत्येकी १ अधिकारी, दोन कर्मचारी यांची तपासासाठी नियुक्ती केली आहे.
किराडपुरा दंगलीमधील आठ आरोपींना ७ एप्रिलपर्यंत कोठडी दंगलीतील आणखी ८ आरोपींच्या विशेष तपास पथकाने सोमवारी रात्री मुसक्या आवळल्या. आरोपींना ७ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. एस. वानखडे यांनी बुधवारी (५ एप्रिल) रोजी दिले. सय्यद शहेबाज सय्यद जिलानी (२४, रा. शरीफ कॉलनी, कटकट गेट), शेख कलीम शेख सलीम (२५, रा. नेहरूनगर, कटकट गेट), शेख सोहेल शेख खाजा (२०, रा. गल्ली क्रमांक ४, किराडपुरा), आमेर सोहेल लतीफ खान (२४, रा. न्यू बायजीपुरा), अल खुतूब हबीब हमद (३०, रा. बायजीपुरा), हबीब हसन हबीब उमर (३६, रा. बायजीपुरा), राशेद दीप सालमीन दीप (२३, रा. इंदिरानगर, बायजीपुरा), सोहेल खान अमजद खान (२१, रा. इंदिरानगर, बायजीपुरा) अशी आरोपींची नावे आहेत. गुन्हा हा गंभीर स्वरुपाचा आहे. आरोपींचे आणखी कोण साथीदार आहेत, याची चौकशी करायची आहे. गुन्ह्यात वापरलेल्या लाठ्या-काठ्या, सळया हस्तगत करायच्या आहेत. त्याचप्रमाणे गुन्हा करण्यामागे आरोपींचा नेमका हेतू काय होता, याचा तपास बाकी असल्याने आरोपींना पाच दिवसांची पोलिस कोठडी देण्याची विनंती सहायक सरकारी वकील समीर बेदरे यांनी यांनी न्यायालयाकडे केली होती. त्यानंतर न्यायालयाने वरीलप्रमाणे आदेश दिले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.