आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शक्तिप्रदर्शन जोरात पण पैठणची झोळी रिकामीच:मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून ठोस निधीची घोषणा नाही, फक्त समर्थकांना बळ

पैठण / रमेश शेळके17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राेहयाेमंत्री संदिपान भुमरे यांच्या पैठण मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सोमवारी जाहीर सभा झाली. यानिमित्ताने भुमरेंनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. मुख्यमंत्र्यांनीही जोरदार भाषणबाजी करून विरोधकांचा समाचार घेत आपल्या समर्थकांना बळ दिले. पण तालुक्यातील एकाही कामाची ठोस घोषणा केली नाही. वाढीव पाणीपुरवठा याेजना, संत ज्ञानेश्वर उद्यानासाठी निधी देऊ, पैठणी साडी क्लस्टर करू एवढेच माेघम आश्वासन देऊन शिंदेंनी काढता पाय घेतला. त्यामुळे पैठणकरांची मात्र घोर निराशा झाली.

मुख्यमंत्र्यांनी पैठण तालुक्यासाठी दोन हजार कोटी रुपयांचा निधी दिला आहे. ब्रह्मगव्हाण प्रकल्प योजनेसाठी निधी दिला. आता वाढीव पाणीपुरवठा निधी द्यावा, उद्यानासाठी निधी द्यावा, उपजिल्हा रुग्णालय द्यावे, शंभर खाटांचे रुग्णालय द्यावे आदी मागण्या राेहयाेमंत्री भुमरे यांनी सुरुवातीलाच केल्या होत्या. अनेक वर्षांपासून दुरवस्था झालेल्या संत ज्ञानेश्वर उद्यानासाठी महत्त्वाची घोषणा या सभेत होईल अशी अपेक्षा होती. स्वत: भुमरे यांनीही अनेकदा तसे सांगितले होते. पण केवळ सरकारी खर्चातून हे काम करू, एवढेच उत्तर देऊन मुख्यमंत्र्यांनी पैठणकरांच्या आशेवर पाणी फेरले.

वैधानिक विकास मंडळाचेही आश्वासन : मराठवाडा वैधानिक विकास महामंडळास मुदतवाढ देण्याच्या मागणीचे निवेदन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी मुख्यमंत्र्यांना दिले. त्यावर याबाबत सरकार सकारात्मक असून राज्यपालांशी आपण बोलू, असे आश्वासन शिंदेंनी दिले.

दानवेंनी ‘पैठणचा बोक्या’ म्हणताच टाळ्यांचा कडकडाट
या सभेत केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंचे भाषणही गाजले. शिंदे गटाच्या आमदारांवर ‘खोके’ घेतल्याचा उद्धव गटाकडून वारंवार आरोप केला जातो. त्याचा समाचार घेताना दानवे म्हणाले, ‘शिंदेंसोबत जाण्याचा भुमरेंचा निर्णय पैठणच्या लोकांना आवडलेला आहे. सभेतील गर्दी ही त्याची पावती आहे. आपला पैठणचा बोक्या खोक्यांवर विकला जाणार नाही, असा जनतेला विश्वास आहे,’ असे दानवेंनी म्हणताच गर्दीतून टाळ्यांचा कडकडाट झाला.

बातम्या आणखी आहेत...