आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:निधन झालेल्या भावाच्या पत्नीच्या मोबाइलवर 15 अॅप डाऊनलोड करून दिरानेच उचलले 4.82 लाखांचे कर्ज

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

निधन झालेल्या भावाच्या पत्नीचा व पुतणीचा विश्वास जिंकून दिराने कॉल करणे, पैसे पाठवण्यासाठी मोबाइल हाताळणे सुरू केले. त्यांनीदेखील कधी संशय घेतला नाही. मात्र, त्यांच्या विश्वासाचा गैरफायदा घेत उमेश मधुकर पावडे (रा. ज्योतीनगर, उस्मानपुरा) याने तत्काळ ऑनलाइन कर्ज देणारे १५ अॅप डाऊनलोड करत तब्बल ४ लाख ८३ हजार रुपयांचे कर्ज घेऊन पसार झाला.

३८ वर्षीय तक्रारदार महिला सिडको परिसरात मेस चालवून कुटुंब चालवते. काही वर्षांपूर्वी त्यांच्या पतीचे निधन झाले. त्यानंतर शहरातच राहणाऱ्या सासरच्यांचा त्यांच्याशी फारसा संवाद राहिला नाही. त्यामुळे त्या तेव्हाच वेगळ्या राहू लागल्या. काही महिन्यांपासून त्यांच्या सासरकडचे पुन्हा संपर्कात आले. महिलेसह मुलीचे व सासरच्यांचे एकमेकांकडे येणे-जाणे, बोलणे सुरू झाले. त्यामुळे महिलेचा विश्वास बसला. त्यात दीर असलेल्या उमेशनेदेखील बोलणे सुरू केले. पतीचाच भाऊ असल्याने महिला व मुलीने त्याच्यावर विश्वास ठेवला. त्यामुळे उमेश बऱ्याचदा त्यांच्या घरी गेल्यानंतर त्यांचा कळत-नकळत मोबाइल हाताळायला लागला होता.

नाेटीस आल्यानंतर कळला खरा प्रकारकॉल करण्यासाठी, नेटवर्क नाही असे वेगवेगळे कारणे सांगत उमेश भावजयीचा मोबाइल घेत होता. यादरम्यान त्याने कर्ज देणारे अॅप इन्स्टॉल केले. सुरुवातीला काही हजारो रुपयांचे कर्ज घेतले. मात्र, पैशांची लालूच वाढत गेल्याने त्याने जवळपास ५० टप्प्यांमध्ये १५ च्या जवळपास अॅप इन्स्टॉल करत ४ लाख ८२ हजार ४६ रुपयांचे कर्ज घेतले. काही दिवसांनी त्याच्या भावजयीला अचानक नोटिसा येेणे सुरू झाले. आपण असे कुठलेही कर्जच घेतले नसल्याने त्यांनी सुरुवातीला दुर्लक्ष केले.

महिलेने पाेलिस आयुक्तांकडे तक्रार केल्यानंतर झाली कारवाई नोटिसांसोबत अनधिकृत अॅपकडून त्यांना सातत्याने कॉल, मेसेज सुरू झाले. नंतर उमेशनेच हा प्रकार केल्याचे समोर आले. कर्जाची रक्कम भावजयीच्या ऑनलाइन पेमेंट अॅपवर जमा होताच तो तेथून स्वत:च्या खात्यात पाठवत हाेता. भावजयी व पुतणीला हा प्रकार कळताच तो पसार झाला. उमेश गुलमंडीवरील एका कापड व्यापाऱ्याकडे कामाला होता. तेथेदेखील काही जणांकडून कर्ज घेतल्याचे पोलिसांना समजले. महिलेने आधी सिडको पोलिसांकडे तक्रार केली. मात्र, तेथे तक्रारीचे निरसन न झाल्याने तिने पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांच्याकडे तक्रार केली. गुप्ता यांच्या सूचनेवरून सायबर पोलिस ठाण्याचे निरीक्षक गौतम पातारे, सहायक निरीक्षक अमोल सातोदकर यांनी तपास करत सिडको पोलिसांना अहवाल सादर केला. त्यानंतर शनिवारी गुन्हा दाखल झाला.

बातम्या आणखी आहेत...