आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हातपंप पाण्यासोबत आग ओकत असल्याचा व्हिडीओ व्हायरल:तो चमत्कार नव्हे तर रासायनिक अभिक्रिया- शहाजी भोसले

मनोज साखरे I औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मध्यप्रदेश मधील छतरपूरच्या बक्सवाहा तालुक्याच्या कचार गावात बुधवारी हातपंप पाण्यासोबत आग ओकत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. जे घडले ते लोकांनी पाहिले आणि काही लोक या बाबीला चमत्कार असल्याचे मानत आहेत, यावर तो चमत्कार नाही केवळ रासायनिक अभिक्रीया आहे, असा निष्कर्ष 'अनिंस'चे राज्यसरचिटणीस आणि बुवाबाजीविरुद्ध शास्त्रीय कारणांसह प्रयोग उलगडून दाखवणारे शहाजी भोसले यांनी केला आहे. या घटनेबाबत त्यांनी सविस्तर निवेदन केले.

चमत्कार नव्हे केवळ अभिक्रीया

शहाजी भोसले म्हणाले, छतरपूरच्या बक्सवाहा तालुक्यात जेही घडले तो चमत्कार नाही. लोकांनी अशा अंधश्रद्धेला थारा देऊ नये. जगातील कोणताही चमत्कार एक तर रासायनिक अभिक्रीया, भौतिक अभिक्रीया किंवा हातचलाखी तरी असू शकते तो मुळीच दैवी चमत्कार नसतो. याच आधारावर तज्ञांच्या मते हे मिथेन वायूमुळे घडण्याची शक्यता आहे.

पाण्यावर दिवा पेटवण्यासारखाच प्रकार

शहाजी भोसले म्हणाले की, समाजात अनेकजण पाण्यावर अग्नी पेटवतात. पण, याचा कार्यकारणभाव शोधून काढायला हवा. ती केवळ एक अभिक्रीया आहे हे मी शास्त्रीय पद्धतीने पटवून देण्याचे काम करतो.

तो प्रकार असा आहे..

शहाजी भोसले म्हणाले, मी जो पाण्याचा दिवा पेटविण्याचा प्रयोग करतो, त्या प्रयोगानुसार दिव्यात पाणी (H2O) आणि कॅल्सियम कार्बाईड (CaC2) यांची रासायनिक अभिक्रीया घडवून आणली जाते. ती अभिक्रीया होत असताना ऍसिटलीन (C2H2) नावाचा गॅस तयार होतो व तो गॅस पेटवला जातो.

CaC2 + 2H2O → Ca(OH)2 + C2H2

खरं तर हा व्हिडीओ अवघ्या 26 सेकंदाचा आहे. त्यात हातपंपाच्या पाईपाचे तोंड उघडे दिसत आहे. त्यातून कोणी महाभागाने कॅल्सियम कार्बाईड जर टाकले असेल तरी ही अभिक्रीया घडू शकते असं माझं मत आहे.

वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगा

शहाजी भोसले म्हणाले, असे चमत्कार, अफवांवर विश्वास ठेवू नका, त्यामागील वैज्ञानिक दृष्टिकोन बघावा. आपल्या शिक्षणमुल्यात, संविधानातही वैज्ञानिक दृष्टीकोनाला महत्व दिले गेले आहे. वैज्ञानिक दृष्टीकोन आणि चमत्कार या नाण्याच्या दोन बाजू आहेत. रासायनिक, भौतिक अभिक्रिया हातचालाखीच चमत्कारामागे असते. त्यामुळे समाजाने डोळस होण्याची गरज आहे.

बातम्या आणखी आहेत...