आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
औंढा नागनाथ तालुक्यातील उमरा शिवारात शनिवारी सकाळीच मजुरांच्या वेशात ९ जण फिरत होते. सकाळ असल्याने शिवारात कुणी नव्हते. दोन किलोमीटरची पायपीट केल्यावर त्यांचे लक्ष शेतात लावलेल्या तुरीच्या ओळीत गेले. तिथे त्यांना गांजाची झाडे आढळून आली. ज्याचे शेत होते त्याची माहिती घेत त्याला त्याच्या घरून ताब्यात घेतल्यानंतर शिवारातील आणखी दोन शेतात लावलेला गांजा पकडला. पथकाने दिलेल्या माहितीनुसार उमरा शिवारातून तीन तर नहाद शिवारातून ३० ते ४० किलोचा सुमारे १.२५ लाख रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी चौघा जणांना ताब्यात घेतले आहे.
आैंढा नागनाथ तालुक्यातील उमरा शिवारातील एका शेतात तुरीच्या ओळीत गांजाची झाडे असल्याची माहिती दहशतवाद विरोधी पथकाला मिळाली होती. त्यावरून पोलिस अधीक्षक योगेशकुमार, अपर पोलिस अधीक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक रामेश्वर वैंजने, सहायक पोलिस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर, कुरुंद्याचे सहायक पोलिस निरीक्षक सुनील गोपीनवार, उपनिरीक्षक सविता बोधनकर, जमादार गजानन निर्मले, जमादार रूपेश धाबे, महेश बंडे, अर्जुन पडघन, विजय घुगे यांच्या पथकाने आज पहाटेच मजुरांच्या वेशात तब्बल दोन किलोमीटर पायपीट करून शेतात पाहणी करण्यास सुरुवात केली.
यामध्ये विष्णू संभाजी बोंगाने यांच्या शेतात तुरीच्या ओळींमध्ये गांजाची झाडे असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पहाटेच पोलिसांनी विष्णू यास त्याच्या घरून ताब्यात घेतले. त्यानंतर त्याने परिसरात आणखी काही शेतात झाडे असल्याने त्याने सांगितले. त्यावरून पोलिसांनी आता उमरा शिवार पिंजून काढला. यामध्ये नरेंद्र सदाशिव राऊत, नवनाथ सोपान बोंगाने यांच्या शेतातील तुरीच्या पिकात गांजाची झाडे दिसून आली. पोलिसांनी त्यांनाही ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता त्यांनी गावातील एका मित्राकडून बी घेतले असून या वेळी पहिल्यांदाच झाडे लावल्याचे सांगितले.
दरम्यान, वसमत तालुक्यातील नहाद शिवारात एका शेतात झाडे असल्याची माहिती मिळाल्यानंतर एका पथकाने त्या शिवारात शोध घेतला यामध्ये अनंता बबनराव बोरगड याच्या शेतातून गांजाची झाडे जप्त करून त्यास ताब्यात घेतले आहे. या शेतातून जप्त केलेल्या गांजाच्या झाडांचे वजन सुमारे ३० ते ४० किलो असून त्याची किंमत १.२५ लाख रुपये असावी असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणात उमरा शिवारातील तिघांवर कुरुंदा तर नहाद शिवारातील एकावर हट्टा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला जात आहे.
झाडे उपटून पळण्याचा नरेंद्र राऊतचा प्लॅन फसला
या प्रकरणात पोलिसांनी विष्णू याची चौकशी केल्याची माहिती मिळताच नरेंद्र राऊत याने शेतात जाऊन गांजाची झाडे उपटून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र झाडे उपटत असतानाही पोलिसांच्या पथकाने त्यास ताब्यात घेतले अन् त्याचा पळण्याचा प्लॅन फसला.
तीन दिवसांपासून काढली जात होती गांजाची माहिती
या परिसरात गांजाची झाडे लावली जात असल्याची माहिती पोलिसांना होती. त्यावरून सहायक पोलिस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर, सुनील गोपीनवार, जमादार गजानन निर्मले यांनी तीन दिवसांपासून या भागात माहिती घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर गावापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या शेतात झाडे असल्याची माहिती मिळाली अन् पोलिसांनी कामगिरी फत्ते केली. विशेष म्हणजे या शेतांमध्ये दुचाकी, चारचाकी वाहनदेखील जात नाही.
यापूर्वीही झाडे केली होती जप्त
वसमत तालुक्यातील नहाद शिवारातून दोन वर्षांपूर्वी गांजाची झाडे जप्त करण्यात आली. काही दिवसांपूर्वीच कळमनुरी तालुक्यात आखाडा बाळापूर पोलिसांनी कुंभारवाडी शिवारातील शेतातून गांजाची झाडे जप्त केली.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.