आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअंबडमधील (जि. जालना) २० एकर २८ गुंठे जमिनीच्या खरेदी प्रकरणात ८१ शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यातील वीस शिक्षकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती. न्या. विभा कंकणवाडी आणि न्या. अभय वाघवसे यांनी खंडपीठात आलेल्या वीस शिक्षकांवर अंबड पोलिस ठाण्यात दाखल गुन्हा रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.
अंबड येथील सर्व्हे नं. १ मधील २० एकर २८ गुंठे जमिनीवरील प्लॉट ८१ शिक्षकांनी खरेदी करून घर बांधले होते. फिर्यादी आसाराम रामभाऊ खोले यांनी अंबड येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्याकडे दाद मागितली होती. न्यायालयाच्या आदेशाने अंबड पोलिस ठाण्यात १९ जुलै २०१७ रोजी गुन्हा दाखल झाला होता. खोटी कागदपत्रे सादर करून जमिनीचा ताबा घेतल्याचे फिर्यादीत म्हटले होते. २० शिक्षकांनी याविरोधात गुन्हा रद्दसाठी खंडपीठात अॅड. संभाजी टोपे यांच्या वतीने धाव घेतली होती. ही जमीन शरीफा हबीब यांची असून १९७७ मध्ये सईबाईच्या नावे झाली. त्यांनी अंकुशराव उबाळे यांना १९८५ मध्ये विकली. बोजा नसलेली वादविरहित जमीन असल्याचे लिहून दिले. १९९९ मध्ये सुभाष चाटे यांनी विकत घेतली. अकृषक परवाना घेऊन सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन केली. ही बाब दिवाणी स्वरूपाची असल्याचा युक्तिवाद टोपे यांनी केला. प्रकरणात पोलिसांनी न्यायालयात बी समरी दाखल केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.