आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फसवणूक:३० कोटींचा गंडा घालणाऱ्या अक्षय भुजबळवर अखेर गुन्हा; कमोडिटी ट्रेडिंगच्या नावाखाली फसवणूक, चार महिन्यांपासून गुंतवणूकदार त्रस्त

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
आरोपी अक्षय भुजबळ - Divya Marathi
आरोपी अक्षय भुजबळ
  • ‘दिव्य मराठी’च्या वृत्तानंतर तातडीने कारवाई

कमोडिटी ट्रेडिंग व शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवल्यास दुप्पट परतावा देताे, असे अामिष दाखवून राज्यातील ७०० पेक्षा अधिक लोकांची ३० कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या अक्षय उत्तम भुजबळ (रा. तळेगाव ढमढेरे, जि. पुणे) याच्यावर अखेर मंगळवारी रात्री छावणी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.

मागील चार महिन्यांपासून या प्रकरणातील तक्रारदार पोलिस आयुक्तालयात चकरा मारत होते. त्यांनी ९ फेब्रुवारीला पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांची भेट घेतली होती. “दिव्य मराठी’ने हे वृत्त प्रकाशित करताच पोलिस आयुक्तांनी तत्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.

फसवणूक झालेल्या लोकांचे प्रतिनिधी म्हणून सुनील त्र्यंबक राठोड (४०, रा. भानुदासनगर, सिडको) यांनी फिर्याद दिली. राठोड यांनी २०२० मध्ये भुजबळच्या जे.जी कमोडिटीजमध्ये ६.३० लाख रुपये गुंतवले होते. सुरक्षा म्हणून त्याने कोटक बँकेचे चेक दिले. एकदा त्याने २५ हजार परतावा दिला. त्यानंतर मात्र पैसे दिले नाही. मागील काही महिन्यांपासून त्याने संपर्कही तोडला हाेता. प्रियंका अक्षय भुजबळ, मंगल उत्तम भुजबळ, योगेश उत्तम भुजबळ (सर्व रा. तळेगाव ढमढेरे, ता. शिरूर, जि. पुणे) हे शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवल्यास १० ते २० टक्के परतावा देतो असे सांगत. पहिल्या टप्प्यात ६६ लोकांनी फसवणूक झाल्याची तक्रार दिली. हा आकडा सुमारे तीन कोटी रुपयांपर्यंत गेला आहे. तपास आर्थिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक दीपक लंके करीत आहेत.

आम्हाला न्याय मिळवून द्यावा

पाेलिसांनी गांभीर्याने तपास करून अाम्हाला न्याय मिळवून द्यावा, अशी भावना तक्रारदार विवेक पाटील यांनी व्यक्त केली. पुण्यात फसवणुकीचे गुन्हे दाखल झाल्यानंतरही अक्षय भुजबळने औरंगाबादसह मराठवाडा, खान्देश, विदर्भातील अनेकांची फसवणूक केली. त्यामुळे त्याला तत्काळ अटक करावी, अशी मागणी तक्रारदारांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...