आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
हिंगोलीच्या उद्योजकाकडून पोल्ट्री फिड साठी लागणारी १२३३ मेट्रीक टन ढेप खरेदी करून पैसे न देता ३.३५ कोटी रुपयांची फसवणुक केल्या प्रकरणी पुणे येथील साकार पोल्ट्री प्रायव्हेट लिमीटेड कंपनीच्या संचालक दांपत्यावर हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात बुधवार (ता. ७) सायंकाळी उशीरा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात आता आर्थिक गुन्हे शाखेने तपास सुरु केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार येथील औद्योगिक वसाहतीमध्ये ज्ञानेश्वर मामडे यांच्या मालकिची शिवा पार्वती पोल्ट्री फिड प्रायव्हेट लिमीटेड या नावाची कंपनी आहे. या ठिकाणी सोयाबीन पासून पोल्ट्री फिड साठी ढेप तयार केली जाते. सदरील ढेप राज्यभरातील विविध कंपन्यांना मागणी नुसार पुरवली जाते. त्यानुसार पुणे येथील साकार पोल्ट्री प्रा. लिमीटेड साकोरे नगर सोसायटी, लोहगाव पुणे या कंपनीने ढेपेचा पुरवठा करण्याचे मागणी शिवा पार्वती कंपनीकडे नोंदवली होती. त्यानुसार सन २०११ पासून त्यांचा व्यवहार सुरु झाला.
मात्र ता. २९ मार्च २०१७ ते ता. १४ जुलै २०१७ या कालावधीत साकार कंपनीला त्यांच्या मागणीनुसार ६७ ट्रक मध्ये १२३३ मेट्रीक टन ढेप पाठवली. या ढेपेची किंमत ३.३५ कोटी रुपये एवढी आहे. त्यांच्या मागणी नुसार ढेप पुरवठा केल्यानंतर संबंधीत कंपनीचे संचालक मंगेश केशव धुमाळ व शितल मंगेश धुमाळ यांनी पैसे देण्यास टाळाटाळ चालवली होती. सदर प्रकार लक्षात आल्यानंतर मामडे यांनी वेळोवेळी पुणे येथे कंपनीच्या कार्यालयात जाऊन मंगेेश धुमाळ यांना पुरवठा केलेल्या ढेपेचे पैसे देण्याची मागणी केली. मात्र त्याने पैसे देण्यास टाळाटाळ चालवली. त्यामुळे आपली फसवणुक झाल्याचे लक्षात आल्यानंतर मामडे यांनी गुरुवारी ता. ७ हिंगोली ग्रामीण पोलिस ठाणे गाठून रितसर तक्रार दाखल केली. यामध्ये साकार कंपनीच्या संचालकांनी ३.३५ कोटी रुपयांची फसवणुक केल्याचे तक्रारीत नमुद केले. यावरून शहर पोलिसांनी साकार पोल्ट्री प्रा. लि. साकोरेनगर सोसायटी, लोहगाव पुणे या कंपनीचे संचालक मंगेश धुमाळ व शितळ धुमाळ यांच्या विरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, सदर प्रकरण आर्थिकबाबींशी संबंधीत असल्याने प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला असून पोलिस अधिक्षक राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरक्षक एस. एस. दळवे पुढील तपास करीत आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.