आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकीय नेत्यांची मागणी:ऑनलाइन अर्ज गायब कसेॽ घरकुल याेजनेची आता सीबीआय चाैकशी करा

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील गोरगरिबांना घरकुल देण्यासाठी महापालिकेने अर्ज मागवले होते. त्यानुसार सहा वर्षांपूर्वी ऑनलाइन प्रक्रिया पार पडली. राज्य व केंद्र सरकारकडे घरकुलांचा प्रस्तावही पाठवण्यात आला. आता अर्जदारांची कागदपत्रे, यादीच उपलब्ध नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत दिव्य मराठीने १२ डिसेंबरच्या अंकात वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर सर्व स्तरांतून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. शहरातील प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांनी या प्रकरणाची सीबीआय चौकशी करून दोषी अधिकारी, कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करून निलंबनाची मागणी केली. ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर डेटा कसा गायब होऊ शकतो, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

गोरगरिबांची थट्टा राज्य व केंद्र सरकार योजनांनुसार नागरिकांनी अर्ज केले. त्यांचा डेटा कुठे गेला, याचा प्रशासकांनी शोध घ्यावा. तो मिळाला नाही तर दोषींवर कारवाई करावी. कागदपत्रेच नाहीत, असे सांगणे म्हणजे गोरगरिबांची थट्टा आहे. याचा प्रशासनाला जाब विचारू. - राजेंद्र जंजाळ, शहराध्यक्ष, शिंदे गट शिवसेना.

आंदाेलन करणार घरकुलांची यादी व कागदपत्रेच मनपाकडे नाहीत हा अतिशय लाजिरवाणा प्रकार आहे. याची सीबीआय चौकशी करावी. याविरोधात आम्ही आंदोलन छेडणार आहोत. कारण मनपाने गोरगरिबांची फसवणूक केली आहे. - ख्वाजा शरफोद्दीन, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

अन्याय होणार नाही दोन दिवसांपासून नागपूरला आहे. घरकुलांबाबत मला फारशी माहिती नाही. उद्या आलो की मनपाने घरकुलासाठी कशा पद्धतीने प्रक्रिया राबवली होती, याची माहिती घेतो. गरिबांवर अन्याय होऊ देणार नाही. - शिरीष बोराळकर, शहराध्यक्ष, भाजप.

वशिलेबाजी असावी घरकुल अर्जात नातेवाइकांची वशिलेबाजी असावी. त्यामुळे हा डेटा गायब केल्याची शंका आहे. आम्ही प्रशासकांना निवेदन देणार आहोत. गोरगरिबांना लवकरात लवकर घरकुल मिळावे, या दृष्टीने मनपाने पाऊल उचलावे. - बाळासाहेब थोरात, शहराध्यक्ष, उद्धव ठाकरे शिवसेना गट.

निकषात न बसणाऱ्या ठेकेदाराला काम दिले घरकुलाचे काम भ्रष्ट पद्धतीने निकषात न बसणाऱ्या ठेकेदाराला दिले हाेते. यात मनपाच्या बड्या अधिकाऱ्यांची मिलीभगत होती. त्यामुळे यादी व कागदपत्रे गायब होणे हा गंभीर प्रकार घडला. - शारेक नक्षबंदी, शहराध्यक्ष, एमआयएम

कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन करणार शहरातील ५२ हजारांहून अधिक गरजू लाेकांचा डेटा गायब हाेणे हा महापालिकेच्या गलथान कारभाराचा उत्तम नमुना आहे. दोषींवर कारवाई न केल्यास आम्ही तीव्र आंदाेलन छेडू. -शेख युसूफ, शहराध्यक्ष, काँग्रेस

बातम्या आणखी आहेत...