आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तीर्णांचे प्रमाण वाढले:सीबीएसई दहावीच्या निकालात इंग्रजी विषयाची गुणवत्ता घसरली, शहरातील सर्व शाळांचा निकाल 100 टक्के

प्रतिनिधी | छत्रपती संभाजीनगर16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनने (सीबीएसई) शुक्रवारी दहावी आणि बारावीचे निकाल जाहीर केले. शहरात दहावीच्या २५ तर बारावीच्या फक्त ६ शाळा आहेत. दोन्ही वर्गांचा निकाल १०० टक्के लागला. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा विद्यार्थिनींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ६.०१ टक्क्यांनी वाढले आहे. विशेष म्हणजे, १०० टक्के निकाल लागूनही इंग्रजी विषयाची गुणवत्ता घसरली आहे. योग्य मूल्यांकन न झाल्यामुळे काही विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याचे मत शिक्षकांनी व्यक्त केले.

देशभरात यंदा ८७.३३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात ९०.६८ टक्के विद्यार्थिनी, तर ८४.६७ टक्के विद्यार्थी झाले आहेत. छत्रपती संभाजीनगर शहरात उत्तीर्णांचे प्रमाण मागील वर्षीच्या तुलनेत समाधानकारक आहे. सीबीएसईच्या २५ शाळांमधून २८०० विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. बारावीच्या ६ शाळांमधील ५५० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. दाेन्हीचे निकाल शंभर टक्के लागले आहेत. पोदार शाळेत ९० टक्के गुण घेणाऱ्यांचे प्रमाण यंदा जास्त आहे. अनिरुद्ध गायकवाड ९६.२ टक्के गुण घेऊन प्रथम तर ध्रुविका पंड्या हिने ९४.०२ गुण घेऊन द्वितीय क्रमांक मिळवला. रिव्हरडेल हायस्कूलच्या १२ वी विज्ञान शाखेतून हर्ष झाने ९४.४%, वाणिज्य शाखेतून शिवांश सिंग ९२.६% मिळवले.

दहावीच्या निकालात कमी गुण

मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना यंदाच्या दहावीच्या निकालात कमी गुण मिळाले आहेत. जेथे मुलांना ८० ते ९० गुणांची अपेक्षा होती, त्यांना ६० ते ७० गुण मिळाले. इतर सर्व विषयांत चांगले गुण असताना इंग्रजीत कमी गुण हे मूल्यांकन योग्य पद्धतीने न झाल्याने मिळाल्याचे दिसते, असे क्लोव्हरडेल स्कूलचे शिक्षक इफ्त कादरी यांनी सांगितले.